• 04 Oct, 2022 16:29

Tokenization : ऑनलाईन पेमेंटच्या नवीन नियमांमुळे ग्राहकांमध्ये चिंता!

Debit And Credit Card Rules

Online Payment Rules: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) 1 जुलैपासून ऑनलाईन पेमेंटसाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डांच्या व्यवहारांसाठी टोकनायझेशन (Tokenization RBI) नियम लागू होणार आहेत? जाणून घेऊया याबद्दल संपूर्ण माहिती.

Debit And Credit Card Rules : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) डेबिट आणि क्रेडिट कार्ड यांच्या वापरातील धोके कमी करण्यासाठी या कार्डांचे टोकनायझेशन (Card Tokenization RBI Circular) करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जुलै, 2022 पासून कार्डांचे टोकनायझेशन सुरू होणार आहे. यामुळे क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील महत्त्वाची माहिती गुन्हेगारांच्या हाती लागणार नाही आणि त्यामुळे क्रेडिट आणि डेबिट कार्डावरील व्यवहार अधिक सुरक्षित होणार आहेत. एकूणच जुलै महिना क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी नवे बदल घेऊन येणारा ठरणार आहे.

टोकनायझेशन म्हणजे काय? What is Tokenization?

क्रेडिट किंवा डेबिट कार्डावरील नाव, नंबर, मुदतपूर्तीची तारीख आदी महत्त्वाच्या माहितीचे रूपांतर टोकन नावाच्या पर्यायी कोडने किंवा विशिष्ट कोडमध्ये परावर्तीत करणाऱ्या प्रक्रियेला टोकनायझेशन म्हणतात. टोकनायझेशनच्या मदतीने कार्डधारकाला त्याच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे सर्व तपशील शेअर करण्याची गरज नाही.


टोकनायझेशन प्रणाली किती सुरक्षित?

प्रत्येक कार्डधारक, टोकनसाठी विनंती करणारा आणि व्यापारी असे प्रत्येकासाठी युनिक टोकन असणार आहे. हा युनिक टोकन तयार झाल्यानंतर टोकनयुक्त कार्ड मूळ कार्ड क्रमांकाच्या जागी वापरले जाऊ शकतो. ऑनलाईन पेमेंटसाठी ही पद्धत अत्यंत सुरक्षित मानली जाते.
आरबीआयच्या मते, ऑनलाईन पेमेंट करताना प्रत्यक्षात क्रेडिट किंवा डेबिट कार्डचे तपशील संबंधितांबरोबर शेअर केले जात नाहीत. कार्डधारक टोकनयुक्त कार्डचे पुन्हा मूळ तपशीलांमध्ये रूपांतर करू शकतो. त्याला डी-टोकनायझेशन म्हणतात.

डी-टोकनायझेशन म्हणजे काय? What is D-Tokenization?

टोकन किंवा कोड यांचे रूपांतर पुन्हा मूळ म्हणजे संवेदनशील माहितीत करणाऱ्या प्रक्रियेला डी-टोकनायझेशन म्हणतात.

card tokenization rbi circular


टोकनायझेशनचे फायदे काय?

टोकनायझेशन कार्डने केलेले ऑनलाईन पेमेंट हे वापरकर्त्याची माहिती संरक्षित करते. टोकनायझेशनमुळे ऑनलाईन व्यवहार करताना कार्डावरील मूळ तपशील टोकनने बदलली जाते. त्यामुळे माहिती चोरणाऱ्यांच्या कारवाईला आळा बसणार आहे. प्रत्येक ग्राहकासाठी युनिक टोकन असणार आहे. यापूर्वी, शॉपिंग साईटवर ऑनलाईन पेमेंट करताना ग्राहकाला क्रेडिट किंवा डेबिट कार्डची माहिती शेअर करावी लागत होती. यातून गैरप्रकार होण्याची शक्यता खूप होती. पण आता टोकनायझेशनमुळे ग्राहकाला आपल्या कार्डची माहिती द्यावी लागणार नाही. यामुळे ऑनलाइन पेमेंटद्वारे फसवणूक करणाऱ्यांपासून ग्राहकांचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे.

टोकनायझेशन व डी-टोकनायझेशनसाठी शुल्क आहे का?

नाही, टोकनायझेशन व डी-टोकनायझेशनसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. ही निशुल्क सेवा आहे. तसेच टोकनायझेशन करून घेणं हे सक्तीचे नाही, ऐच्छिक आहे. म्हणजे यासाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही. पण ग्राहकांनी सुरक्षितेसाठी टोकनायझेशन करून घेणं फायद्याचं ठरू शकतं.

टोकनायझेशन कार्ड कसे मिळू शकते?

ग्राहक एकावेळी कितीही कार्डसाठी टोकनायझेशनसाठी विनंती करू शकतो. यासाठी ग्राहक कोणत्याही पद्धतीचा वापर करू शकतो. लॅपटॉप, डेस्कटॉप, मोबाईल फोनद्वारे ही सुविधा घेता येऊ शकते.