Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Think Tank Behind Budget 2023: भारताचे बजेट तयार करणारी 'टीम निर्मला सीतारामन' जाणून घ्या

Think Tank Behind Budget 2023

Think Tank Behind Budget 2023: येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत आर्थिक वर्ष 2023-2024 साठीचा अर्थसंकल्प सादर करतील. केंद्रातील भाजप सरकारसाठी हा सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. भारत जी-20 देशाच्या समूहाचे अध्यक्षपद भूषवत आहे. त्यामुळे यंदाचे बजेट मांडताना सरकारला अर्थव्यवस्थेतील सर्वच घटकांना खूश करावे लागेल.

देशांतर्गत महागाईने सरकारचा आर्थिक ताळमेळ बिघडवला आहे. चीनमधील कोरोनोचे संकट, जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचा वाढता प्रभाव, सेंट्रल बँकांची व्याजदर वाढ या घटकांचा विचार करुन सरकारने आगामी बजेटमध्ये सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असेल. साधारणपणे सहा महिने आधी बजेट तयार करण्याची प्रक्रिया सुरु होते. अर्थमंत्र्यांबरोबरच अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार यांच्या समन्वयातून आणि उद्योगांच्या अपेक्षांचा विचार करुन केंद्रीय अर्थसंकल्पला मूर्त रुप दिले जाते.

यंदा भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यातच भारताकडे जी-20 परिषदेचे अध्यक्षपद आहे. त्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष, जी-20 देशांचे अध्यक्षपद याच्याशी संबधित घोषणा बजेटमध्ये दिसून येतील. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात देशभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्याबाबत (अमृतकाल) अनेक घोषणा करण्यात आल्या होत्या.

निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत बजेट सादर करतील. अर्थमंत्री म्हणून सीतारामन या चौथ्यांदा बजेट सादर करतली. संरक्षण आणि उद्योग विभागाच्या माजी मंत्री असलेल्या सीतारामन यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. संकट काळात कोणत्या क्षेत्राला किती मदत करायची आणि किती महत्व द्यायचे हे कोरोनो संकटात सीतारामन यांनी दाखवून दिले होते. भारताशी सीमेवर कुरापती करणाऱ्या शेजारी राष्ट्रांना आर्थिक झटका देण्याची संधी सीतारामन बजेटमधून साधतील, असे बोलले जाते. मागील तीन बजेटमध्ये सीतारामन यांनी सरकारची आर्थिक बाजू सांभाळली होती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुडबुकमध्ये निर्मला सीतारामन यांचा समावेश आहे.

टी.व्ही सोमनाथन (TV Somanathan)

भारताचे अर्थ सचिव टी.व्ही सोमनाथन हे सरकारच्या खर्चाची बाजू सांभाळतात. सोमनाथ हे  1987 च्या बॅचचे तामिळनाडू केडरचे सनदी अधिकारी आहेत. यापूर्वी ते कंपनी व्यवहार मंत्रालयाचे सह सचिव होते. याशिवाय पंतप्रधान कार्यालयात त्यांनी 2015 ते 2017 या काळात काम केले आहे. सोमनाथन यांच्या नेतृत्वात अर्थ मंत्रालयाने विक्रमी भांडवली खर्च केला होता. सोमनाथन यांनी इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टरेट मिळवली असून ते चार्टर्ड अकाउटंट देखील आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध मासिक, वृत्तपत्रांमध्ये सार्वजनिक धोरणे आणि वित्त या विषयांवर 80 हून अधिक लेख लिहले आहेत.

अजय सेठ (Ajay Seth)

आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव असलेले अजय सेठ यांचे बजेट तयार करण्यात महत्वाचे योगदान आहे. बजेटची जुळवणी करताना सर्व माहिती संकलित करुन आकडेवारी एकत्र करणे आणि अंतिम आराखडा तयार करण्याचे काम अजय सेठ यांच्या नेतृत्वात पार पडले. मितभाषी असलेले अजय सेठ यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले असून मॅनेजमेंटमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली आहे. 1987 च्या बॅचचे कर्नाटक केडरचे ते सनदी अधिकारी आहेत. अजय सेठ यांच्यावर जी-20 मधील केंद्रीय बँकांचे गव्हर्नर आणि अर्थमंत्र्यांच्या  परिषदेचे सह अध्यक्षपदाची जबाबदारी आहे.

तुहीनकांत पांडे (Tuhin Kanta Pandey)

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (Department of Investment and Public Asset Management) विभागाचे सचिव असलेले तुहीनकांत पांडे यांच्यावर निर्गुंतवणुकीची मोठी जबाबदारी आहे. मागील तीन वर्ष सरकारला निर्गुंतवणुकीचे लक्ष्य पूर्ण करता आलेले नाही. वर्ष 2022 मध्ये एअर इंडियाची विक्री आणि एलआयसीमधील अशंत: हिस्सा विक्री वगळता पांडे यांच्या विभागाने फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. सरकारला दरवर्षी निर्गुंतवणुकीचे टार्गेट कमी करावे लागले होते. यंदाच्या बजेटमध्ये पांडे यांचा विभाग काय शिफारस करणार याकडे गुंतवणूकादारांचे डोळे लागले आहेत.

संजय मल्होत्रा (Sanjay Maljotra) 

महसूल विभागातील एक महत्वाचे अधिकारी संजय मल्होत्रा हे 1990 च्या बॅचचे राजस्थान केडरचे सनदी अधिकारी आहेत. नुकताच मल्होत्रा यांची आर्थिक व्यवहार विभागातून महसूल विभागात बदली करण्यात आली होती. महसुली तूट वाढू नये यासाठी महसूल विभागाला योग्य नियोजन करावे लागते. यात महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा कस लागतो. आरईसी या सरकारी कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक राहिलेल्या मल्होत्रा यांनी कर महसूल वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा फायदा झाला होता. यंदांच्या बजेटमध्ये सरकारकडून राज्यांना दिल्या जाणाऱ्या जीएसटी परताव्याबाबत बजेटमध्ये जी घोषणा होते त्यात मल्होत्रा यांची भूमिका दिसून येईल.  

विवेक जोशी (Vivek Joshi)

अर्थ खात्यातील सर्वात मोठे आणि महत्वाच्या अर्थिक व्यवहार सचिव पदी विविके जोशी यांची 19 ऑक्टोबर 2023 रोजी नियुक्ती झाली. महसूल सचिव तरुण बजाज यांनी निवृत्ती घेतल्यानंतर  अर्थ खात्यात मोठे फेरबदल झाले होते. त्यानंतर जोशी यांच्याकडे आर्थिक व्यवहार विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. 1989 च्या बॅचचे हरियाणा केडरचे सनदी अधिकारी असलेल्या विवेक जोशी यांनी जिनेव्हामधून आंतरराष्ट्रीय अर्थविषयात पीएचडी आणि एम.ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. आयआयटी रुरकीमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. वर्ष 2014 पासून ते अर्थ खात्यात काम करत असल्याने बजेट तयार करण्याचे बारकावे त्यांना चांगलेच माहित आहेत.

व्ही अनंत नागेश्वरन (V Anantha Nageswaran)

गेल्या वर्षी बजेट सादर होण्यापूर्वी व्ही. अनंत नागेश्वरन यांची केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आर्थिक वर्ष 2023-2024 चे बजेट तयार करण्याबरोबच आर्थिक पाहणी अहवाल तयार करण्याचे काम नागेश्वरन यांच्या नेतृत्वात पार पडले आहे. मॅसिच्युसेट्स अॅम्हेरेस्ट विद्यापीठातून नागेश्वरन यांनी फायनान्समध्ये पीएचडी मिळवली आहे. आयआयएम अहमदाबादमधून त्यांनी एमबीए केले आहे. यूबीएस, क्रेडिट सूस सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांमध्ये काम करण्याचा त्यांना 17 वर्षांचा अनुभव आहे.