Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून नफा कमवायचाय? 'या' पाच स्टेप्स फॉलो करा

Mutual Fund Investment

अनेकांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची इच्छा तर असते मात्र, नक्की काय करावे हे समजत नाही. हजारो स्कीम्स, विविध AMC त्यांच्याद्वारे करण्यात येणारे दावे यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार गोंधळून जातो. मात्र, जर दीर्घ काळात चांगला परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही काही स्टेप्स फॉलो करायला हव्यात. त्या आपण या लेखात पाहू.

Mutual Fund Investment: मागील काही वर्षात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शेअर मार्केट, आणि म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीत जोखीम असली तरी आकर्षक परतावा मिळत असल्याने नागरिकांचा ओढा या पर्यायांकडे आहे. मात्र, बाजारात हजारो म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत. क्वांट, इंडेक्स, डेब्ट, मिड कॅप, स्मॉल कॅप सह अनेक फंड असून सर्वसामान्य गुंतवणूकदाराचा चांगला फंड निवडताना गोंधळ उडतो. नफा कमावण्याचं आणि संपत्ती निर्माण करण्याचा पर्याय म्हणून म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडे पाहण्यात येते.

गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या टिप्स फॉलो करा

गुंतवणुकीचे ध्येय आणि जोखीम घेण्याची क्षमता तपासा

कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणुकीचे ध्येय आणि तुमची जोखीम घेण्याची क्षमता तपासा. नुकतीच नोकरी लागलेला तरुण आणि निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याची जोखीम घेण्याची क्षमता वेगवेगळी असेल. तसेच तुमचे भविष्यातील आर्थिक निर्णय काय असतील त्यानुसार गुंतवणुकीचे पर्याय निवडा. जर भविष्यात तुम्हाला घर घ्यायचे असेल किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर किती पैशांची गरज लागू शकते याचा अंदाज बांधा. त्यानुसार दर महिन्याला गुंतवणूक करा.

तुमचे गुंतवणुकीचे ध्येय तीन कॅटेगरीत विभागू शकता. शॉर्ट टर्म (तीन वर्षांपर्यंत) मीड टर्म (पाच वर्षांपर्यंत) आणि लाँग टर्म (पाच वर्षांपेक्षा जास्त) अशी विभागणी तुम्ही करू शकता. तसेच मुलांचे शिक्षण, घर, व्यवसाय सुरू करणे, परदेश पर्यटन अशा पर्ययाांपैकी जे महत्त्वाचे असेल त्यासाठी आधी गुंतवणूक करावी. सहाजिकच मुलांचे शिक्षण हा एक महत्त्वाचा विषय आहे. आलिशान कार घेण्यापेक्षा राहण्यासाठी स्वत:चे घर घेणे महत्त्वाचे असेल. जास्त जोखीम घेण्याची तयारी म्हणजेच जास्त परताव्याची शक्यताही असते. मात्र, किती जोखीम घेऊ शकते, हे व्यक्तीपरत्वे बदलू शकते.

म्युच्युअल फंड स्कीमचा अभ्यास (Things to remember before investing In MF)

तुमच्या ध्येयाशी सुसंगत अशा म्युच्युअल फंड स्कीमचा अभ्यास केला तर योग्य राहील. तुमचे गुंतवणुकीचे ध्येय, जोखीम घेण्याची क्षमता ओळखून योग्य फंडात केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. म्युच्युअल फंडाचे गुंतवणूक ध्येय, जोखीम, शुल्क, फंड मॅनेजर, अॅसेट मॅनेजमेंट कंपनी, अॅसेट क्लास, फंड मॅनेजमेंट कंपनीकडे असलेले पोर्टफोलिओ याचा सविस्तर अभ्यास करा. एकाच पर्यायात गुंतवणूक न करता, बाँड्स, स्टॉक्स सारख्या पर्यायांचाही विचार करायला हवा.

योग्य फंडाची निवड करा (Tips to invest in Mutual fund)  

दीर्घ काळात चांगला परतावा देणाऱ्या फंडाची निवड करा. सोबतच फंड मॅनेज करणारी टीम किती अनुभवी आहे हे सुद्धा पहा. स्टॉक फंड, डेब्ट फंड, इंडेक्स फंड, इंटनॅशनल फंड असे विविध पर्याय तुमच्या समोर असतील. (Mutual fund investment risk) त्यातील योग्य पर्यायाची निवड करा. उदा. जर पुढील दोन वर्षांचे तुमचे गुंतवणुकीचे ध्येय असेल तर डेब्ट म्युच्युअल फंडात गुंतवणूक योग्य राहील, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

गुंतवणुकीवर लक्ष ठेवा 

तुम्ही जे काही ध्येय ठरवले होते, त्यानुसार फंड कामगिरी करत आहे की नाही यावर लक्ष ठेवा. AMC कडून आकारले जाणारे शुल्क, फंडाची कामगिरी कशी आहे हे तपासा. तुम्ही गुंतवणूक केलेला एखादा फंड चांगली कामगिरी करत नसेल तर लगेच पैसे काढून घेऊ नका. त्यामागे इतर अनेक कारणे असू शकतात. अर्थव्यवस्थेची स्थिती, जागतिक घडामोडी, एखाद्या क्षेत्रातील पडझड कारणीभूत असू शकते. त्यामुळे तुमचा फंड ज्या श्रेणीतील आहे, त्या बेंचमार्कवरुन फंडाच्या कामगिरीची तुलना करा. 

कोणत्याही निर्णयापर्यंत पोहचण्याआधी वाट पाहा. बाजारातील विविध स्थित्यंतरातून तुमची गुंतवणूक गेल्यानंतर निर्णय घ्या. थोडक्यात, घाईघाईने निर्णय न घेता काही वेळ जाऊ द्या. नाहीतर तुम्ही गुंतवणूक काढून घेतल्यानंतर फंडाची कामगिरी सुधारली तर पश्चाताप करायची वेळ येऊ नये.

पोर्टफोलिओमध्ये समतोल साधा

दीर्घ काळात तुम्ही गुंतवणूक केलेल्या फंडाची कामगिरी बदलू शकते. त्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ बिघडू शकतो. विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक असायला हवी. तुम्ही सिलेक्ट केलेल्या कंपन्यांमध्ये विविधता असायला हवी. असे नसेल तर त्याचा आढावा घेत राहा. त्यानुसार पोर्टफोलिओ बदलत राहा. उदाहरणार्थ, जर आठ वर्षांपूर्वी तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल आणि दोन वर्षानंतर तुम्हाला पैशांची गरज लागणार आहे. तर हळूहळू तुम्ही गुंतवणूक डेब्ट किंवा लिक्विड फंडात वळवायला हवी. मात्र, असे करताना बाजारातील स्थिती ध्यानात घ्यायला हवी. नाहीतर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी होऊ शकते. 

(डिसक्लेमर: शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जाते. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)