• 26 Mar, 2023 15:13

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Destination Wedding : महाराष्ट्रातली कुठली पर्यटन स्थळं डेस्टिनेशन वेडिंगसाठी लोकप्रिय आहेत? नक्की किती खर्च येतो.

Destination Wedding

Best Places for Destination Weddings in Maharashtra: हल्ली मराठी लोकही डेस्टिनेशन वेडिंगला पसंती देऊ लागले आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया डेस्टिनेशन वेडिंगचं नियोजन कसं करायचं? महाराष्ट्रातल्या कुठच्या ठिकाणांना लोकांची पसंती आहे. आणि त्यासाठी येणारा खर्च नेमका किती?

पर्यटन क्षेत्रात रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण करण्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प-2023 कसा फायदेशीर ठरेल याबद्दल अलीकडेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले होते.

'मिशन मोडमध्ये देशातील पर्यटनाचा विकास' या विषयावर प्रधानमंत्री मोदी यांनी पर्यटन क्षेत्रात रोजगार आणि गुंतवणुकीच्या कोणकोणत्या संधी आहेत याची माहिती दिली. ते म्हणाले की, 'आऊट ऑफ द बॉक्स' (Out of the Box) योजना आणि 'दीर्घकालीन दृष्टी' पर्यटन क्षेत्राला नवीन उंची गाठण्यास मदत करणार आहे. भारतीयांनी हे क्षेत्र गांभीर्याने घेतले पाहिजे असेही ते म्हणाले. 

याच पार्श्वभूमीवर ,महाराष्ट्रात डेस्टिनेशन वेडिंगचा काय ट्रेंड आहे हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला. याबद्दल सविस्तर माहिती तुम्ही या लेखात वाचणार आहात!

पर्यटनात डेस्टिनेशन वेडिंग्सला प्रचंड वाव

देशभरात गेल्या काही वर्षांपासून तरुणाईमध्ये डेस्टिनेशन वेंडिंगचे प्रमाण वाढले आहे. आपल्या आयुष्यातील महत्वाचे क्षण अविस्मरणीय करण्यासाठी लोक लग्नासाठी हा पर्याय निवडत आहेत. मोजक्या वऱ्हाडी मंडळींसह एखाद्या प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक ठिकाणी लग्नसमारंभ आयोजित केले जातात.

अशा प्रकारच्या विवाह सोहळ्यांसाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात. अशा प्रकारच्या लग्नसमारंभात काय कमी, काय जास्त अशा सगळ्या लहान-सहान गोष्टी बघण्याची गरज नसते.आपल्याला जे जे काही हवं असे ते वेंडिंग प्लॅनरला सांगितलं की संपलं. तेच सगळ्या गोष्टींची व्यवस्था बघतात. अर्थात त्याचे पैसे ते घेणारच असतात!

उच्च मध्यमवर्गाला देखील याचे आकर्षण

गेल्या काही वर्षांत उच्च मध्यमवर्गाची आर्थिक स्थिती सुधारली आहे. हौस म्हणूनही डेस्टिनेशन वेंडिंगचे पर्याय निवडले जातात. एका रिपोर्टनुसार डेस्टिनेशन वेडिंग साठी राजस्थानमधील जयपूर, उदयपूर आणि जोधपूर या स्थळांना पसंती दिली जात आहे. तेथील प्रेक्षणीय स्थळे, ऐतिहासिक राजवाडे तरुणाईला भुरळ घालत आहे. 

लग्न समारंभाच्या निमित्ताने दोन राज्यांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण देखील वाढते आहे. अशीच ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे आपल्या आजूबाजूला देखील आहेत, परंतु डेस्टिनेशन वेंडिंगच्या हिशोबाने ही स्थळे विकसित केली गेलेली नाहीत. परंतु  येणाऱ्या काळात पर्यटन आणि डेस्टिनेशन वेंडिंग या दोन्ही गोष्टी सोबत होतील अशी चिन्हे आहेत.

बॉलिवूड कलाकारांना देखील भुरळ 

निवांत ठिकाणी आपल्या जीवनातील महत्वाचे क्षण साजरे करता यावेत यासाठी मीडियापासून दूर राहून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांचे विवाह सोहळे उरकले आहेत.

  • कतरीना कैफ आणि विकी कौशल यांनी राजस्थानमधील सवाई माधोपुर येथे त्यांचा शाही विवाह केला होता.
  • प्रियांका चोप्रा आणि निकी जॉनस यांचा विवाह जोधपूर येथे पार पडला होता.
  • राजकुमार राव आणि पत्रलेखा पॉल यांचा विवाह चंदीगडच्या एका शाही हॉटेलमध्ये पार पडला होता.
celebrities-wedding.jpg

अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी डेस्टिनेशन वेंडिंग करत एक ट्रेंड सेट केला आहे. आपल्या आवडत्या कलाकारांचे अनुकरण करत बजेटमध्ये बसेल असे डेस्टिनेशन वेडिंग स्थळ लोक शोधताना दिसतायेत. याद्वारे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, केटरर्स, डेकोरेशन आदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. याचा सरळसरळ फायदा हा तिथल्या स्थानिक नागरिकांना रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून होत आहे. 

नेमका हाच विषय लक्षात घेऊन सदर विषयाला पर्यटन क्षेत्राशी जोडून आर्थिक विकास कसा साधता येईल याविषयी सरकारी स्तरावर उपाययोजना आखल्या जात असल्याचे सरकारने म्हटले आहे.

महाराष्ट्रातील डेस्टिनेशन वेंडिंगसाठी कुठली स्थळे लोक निवडतात हे जाणून घेण्यासाठी महाMoney ने महाराष्ट्रातील काही वेंडिंग प्लॅनर आणि टूर प्लॅनरशी संपर्क केला. महाराष्ट्रात हळूहळू डेस्टिनेशन वेंडिंगचा ट्रेंड सुरू होतो आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

पुण्यातील 'पी स्क्वेयर' या पर्यटन व्यवसायात कार्यरत असलेले प्रगत पडघन म्हणाले की, मुंबई-पुण्याच्या बाहेर जाऊन लग्न सोहळे आयोजित करावेत असं लोकांना वाटू लागलं आहे. परंतु यातील बहुतांश लोक हे श्रीमंत कुटुंबातील आहेत. मध्यमवर्गातील लोक अनावश्यक खर्च टाळण्यात अजूनही अग्रेसर आहेत. सध्या देशातील 'मिलेनियम' मंडळी लग्नाला आली आहेत. 

वाढती महागाई, नोकरी-धंद्याची लटकती तलवार अशी सगळी पार्श्वभूमी असलेले मिलेनियम साध्या-सोप्या लग्नसमारंभाला पसंती दर्शवतात. परंतु पूर्वापार श्रीमंत असलेले उद्योगपती, व्यावसायिक हौस म्हणून खर्च डेस्टिनेशन वेंडिंगचा पर्याय निवडतात. पैकी मराठी लोक डेस्टिनेशनला पसंती देत नाहीत, 100 पैकी 2 डेस्टिनेशन विवाह हे मराठी कुटुंबातील असतात अशी माहिती देखील प्रगत पडघन यांनी दिली.

मुंबईतील वेंडिंग प्लॅनर सचिन चंदेल यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्यामते मुंबईतील लोक डेस्टिनेशन वेंडिंगसाठी मुंबईच्या आसपास जाणे पसंद करतात. कर्जत, पालघर, इगतपुरी याठिकाणी नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट सुरू झाले असून तिथे जाणे लोक पसंत करतात. 

प्रवासाचा खर्च आणि वेळ वाचवण्यासाठी लोक मुंबईच्या आसपास लग्नासाठी जागा शोधतात असेही चंदेल म्हणाले. सोबतच यात मराठी ग्राहक फार कमी प्रमाणात असतात असेही मत त्यांनी नोंदवले. सध्या लग्न साधेपणाने करून रिसेप्शनवर अधिक पैसा खर्च केला जातो असे ते म्हणाले.

महाराष्ट्रातील डेस्टिनेशन वेंडिंगसाठी निवडली जाणारी स्थळे

महाबळेश्वर, पाचगणी

mahabalehswar-pachghani.jpg
Source: www.ramsukhresorts.com


सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी ही स्थळे डेस्टिनेशन वेंडिंगसाठी सध्या निवडली जातात. पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणांचा विकास झाल्यामुळे मूलभूत सोयीसुविधा येथे उपलब्ध आहेत. या ठिकाणी मोठमोठी हॉटेल्स, रिसॉर्ट सुरू झाले असून 500 लोक राहू शकतील अशा क्षमतेची रिसॉर्ट देखील येथे उपलब्ध आहेत. 

400-500 लोकांसाठी जेवण, निवास, संगीत, रिसेप्शन असे कार्यक्रम असलेला विवाह सोहळा पार पाडण्यासाठी 35-40 लाख खर्च अपेक्षित आहे.

इगतपुरी

igatpuri.jpg
Source: www.dewdrops.co.in


नाशिक आणि मुंबईपासून जवळ असलेले इगतपुरी हे ठिकाण देखील डेस्टिनेशन वेंडिंगसाठी सध्या निवडले जात आहे. मुंबई-आग्रा हायवेवर असलेले हे ठिकाण प्रवासाच्या दृष्टीने सोयीस्कर असून सोयीसुविधांनी परिपूर्ण आहे. असे असले तरी तिथे स्थानिक वेंडिंग प्लॅनर उपलब्ध नसून मुंबई किंवा नाशिकहून त्याची व्यवस्था करावी लागते. 

तर जागांचा विचार करता इगतपुरी हे ठिकाण कमी खर्चिक आहे. 400-500 लोकांच्या दोन दिवसांसाठी असलेल्या लग्नसमारंभाला 20-30 लाख खर्च अपेक्षित आहे.

अलिबाग

alibag.jpg
Source: www.curlytales.com


मुंबईपासून जवळ असलेले हे आणखी एक ठिकाण आहे. रस्त्याने आणि समुद्रमार्गे येथे पोहोचता येते. अलिबागमध्ये अलीकडच्या काळात अनेक 3 स्टार,5 स्टार हॉटेल्स सुरू झाले आहेत. पर्यटकांचा येथे कायम वावर असतो. त्यामुळे इथे देखील पर्यटकांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. 

खाजगी रिसॉर्ट, होम स्टे, हॉटेल्स येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून वेगवेगळ्या ठिकाणांसाठी वेगवेगळे दर आहेत. 400-500 वऱ्हाडी मंडळींचा विचार केला तर कमीत कमी 30-40 लाखांपर्यंत बजेट असायला हवे.

रत्नागिरी, दापोली 

ratnagiri.jpg
Source: www.weddingwire.in


अलीकडच्या काळात समुद्रकिनारी विवाह करण्याचा देखील ट्रेंड सुरू आहे. त्यापैकी रत्नागिरी आणि दापोली ही ठिकाणे निवडली जात आहे. महाबळेश्वर, पाचगणी, अलिबाग आणि इगतपुरी सारख्या सुविधा येथे नसल्या2 तरी उत्तम व्यवस्था येथे होऊ शकते. 

3 स्टार आणि 5 स्टार हॉटेल्स मर्यादित असले तरी रिसॉर्ट ही संकल्पना येथे जोर धरू लागली आहे. 400-500 मंडळींचा विचार करता टापटीप सुविधा असलेल्या विवाहाचा खर्च 20-25 लाखांपर्यंत जाऊ शकतो.

औरंगाबाद

aurangabad.jpg
Source: www.mangalamweddingdestination.com


मराठवाडा हा प्रदेश कायम दुष्काळासाठी ओळखला जात असला तरी वेरूळ, अजिंठा, घृष्णेश्वर आदी ऐतिहासिक पर्यटनस्थळांमुळे औरंगाबादला एक जागतिक ओळख प्राप्त झाली आहे. येथे देखील मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, रिसॉर्ट उपलब्ध असून वेंडिंग प्लॅनर आणि टूर ऑपरेटर देखील चांगली सुविधा पुरवतात. वेरूळ-अजिंठा लेण्यांच्या सान्निध्यात लग्नविवाह पार पाडण्याचा ट्रेंड आता इथे सुरू झाला आहे. 

अजिंठा-वेरूळ येथील लेणी युनेस्कोच्या ताब्यात असल्याने तिथे समारंभांना परवानगी नाही. परंतु औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील लेणी परिसरात विवाह पार पाडतात. येणाऱ्या काळात औरंगाबाद हे स्थळ देखील डेस्टिनेशन वेंडिंगसाठी मोक्याचे ठिकाण असेल असे म्हटले जात आहे. येथे 400-500 लोकांची उपस्थिती लक्षात घेता दोन दिवसांसाठी कमीत कमी 20 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

सोबतच लोणावळा, सापुतारा (नाशिक), पालघर या ठिकाणांना देखील पसंती दिली जात आहे. परंतु गजबजलेली ठिकाणे डेस्टिनेशन वेंडिंगसाठी लोक आता टाळू लागली आहेत. देशभरात डेस्टिनेशन वेंडिंगसाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार होत असताना महाराष्ट्रात मात्र पैसे वाचवण्यावर तरुणाई भर देते आहे असे एकंदरीत चित्र पहायला मिळते आहे.