Personal Finance: वाढती महागाई आणि जगभर सुरू असलेल्या आर्थिक मंदीच्या चर्चांमुळे सध्या पर्सनल फायनान्सला घेऊन सर्वजण चिंतेत आहेत. विशेष करून मिलेनिअल्स. मिलेनिअल्स पिढी ही त्यांच्या अगोदरची म्हणजे जेनेक्स (GenX) आणि जेनझी (Gen Z) या दोन पिढींच्या कात्रीत सापडली आहे. एकीकडे अगोदरच्या पिढीने प्रामाणिकपणे पारंपरिक पद्धतीने गुंतवणूक करून आपल्या मुलांसाठी बचतीची तरतूद करून ठेवली. त्याउलट सध्याची Gen Z पिढी पारंपरिक गुंतवणुकीला झुगारून नवनवीन पद्धतींचा अवलंब करत आहे.अशावेळी मिलेनिअल्सला पर्सनल फायनान्स मेन्टेंन कसे ठेवायचे हा प्रश्न पडत असेल तर त्यांच्यासाठी आम्ही काही सोप्या पद्धती घेऊन आलो आहोत. त्याच्या मदतीने तुम्ही तुमचे पर्सनल फायनान्स व्यवस्थितपणे हाताळू शकता.
Table of contents [Show]
हे मिलेनिअल्स काय आहे?
पर्सनल फायनान्समधील काही नियमांकडे वळण्यापूर्वी आपण Millennials, Gen X आणि Gen Z हे काय आहे? हे अगदी थोडक्यात समजून घेऊ. मिलेनिअल्स पिढी म्हणजे साधारण 1981 ते 1996 या दरम्यान जन्मलेली पिढी आणि आणखी खोलात जाऊन सांगायचे झाले तर सध्याच्या घडीला ज्यांचे वय 27 ते 42 या दरम्यान आहे, त्यांना मिलेनिअल्स म्हटले जाते. तसेच 1965 ते 1980 या दरम्यान जन्मलेल्या पिढीला Gen X तर 1997 ते 2012 या कालावधीतील पिढीला Gen Z म्हटले जाते.
प्रत्येकाची वैयक्तिक स्वप्ने असतात. ती पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज भासते. अशावेळी कोणाला कमीतकमी कालावधीत पैसे दुप्पट करून हवे असतात. तर कोणाला गुंतवलेल्या पैशांवर जास्त परतावा हवा असतो. मग यासाठी तुम्हाला फायनान्समधील काही बेसिक नियम माहिती असायलाच हवेत. जसे की, किती पैसे, किती वर्षात डबल होऊ शकतात, हे जाणून घ्यायचे असेल तर नियम 72 मधून हे तुम्ही समजून घेऊ शकता. उदाहरणार्थ, 8 टक्के व्याजदराने तुम्ही पैसे गुंतवले तर ते किती वर्षात दुप्पट होतील. यासाठी तुम्ही फक्त 72 ला 8 ने भागा, उत्तर येईल 9. म्हणजेच 8 टक्के व्याजदराने तुम्ही जर पैसे गुंतवले तर ते डबल होण्यासाठी 9 वर्षांचा कालावधी लागेल. अशाचप्रकारे 7 टक्के व्याजदर घेतला तर पैसे डबल होण्यासाठी 10 वर्षांचा कालावधी लागू शकतो.
लाईफ इन्शुरन्स
लाईफ इन्शुरन्स हा पर्सनल फायनान्समधील खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण आपले जीवन सुरक्षित असेल तर आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित राहील. यासाठी नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी स्वत:ची टर्म इन्शुरन्स पॉलिसी काढणे गरजेचे आहे. तुमचे वार्षि उत्पन्न जर 6 लाखाचे असेल तर तुमचा लाईफ इन्शुरन्स कव्हर हा किमान 60 ते 70 लाखांचा असणे आवश्यक आहे.
नियम 70 ने गुंतवणुकीचे मूल्यमापन करा
तुम्ही केलेली गुंतवणूक योग्य परतावा देत आहे की नाही. याचा वेळोवेळी आढावा घेणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही सध्या सुरू असलेल्या महागाईच्या दराने 70 ला भागा. त्यातून तुम्हाला केलेल्या गुंतवणुकीचे सध्याचे मूल्य कळेल. यातून तुम्ही गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय निवडून त्यातून चांगला परतावा देणाऱ्या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकता.
खर्च आणि बचतीसाठी 50-30-20 नियमाचा वापर करा
50-30-20 हा फायनान्समधील खूपच बेसिक आणि महत्त्वाचा नियम आहे. या नियमाचा उपयोग तुम्हाला खर्च, बचत आणि इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी होऊ शकतो. यासाठी तुमचे जे उत्पन्न आहे. ते तुम्ही 3 पद्धतीने विभागून महिन्याचा जमा-खर्च यांचा मेळ घालून बचत सुद्धा करू शकता. एक तुमच्या महिन्याच्या एकूण उत्पन्नातील 50 टक्के रक्कम ही अत्यावश्यक गोष्टींवर खर्च करा. जसे की, किराणा माल, घराचे भाडे किंवा बॅंकेचा हप्ता आदीसाठी. त्यानंतर पगारातील 30 टक्के रक्कम ही तुमच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी म्हणजेच मौजमजा करण्यासाठी वेगळी काढून ठेवा आणि उरलेली 20 टक्के रक्कम चांगल्या ठिकाणी गुंतवा. रक्कम गुंतवण्यासाठी म्युच्युअल फंड एसआयपी, मुदत ठेवी, इक्विटी मार्केट असा कोणत्याही योजनांचा वापर करू शकता.
40 टक्क्यांपेक्षा जास्त ईएमआयवर खर्च करू नका
एकूण मिळणाऱ्या पगारातील 40 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम ईएमआयवर खर्च करू नका. फायनान्समधील हा सुद्धा एक बेसिक नियम मानला जातो. तुम्हाला जेवढा पगार मिळतो, त्यातून फक्त 40 टक्क्यांपर्यंत तुम्ही तो ईएमआयवर खर्च करा. तो त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुमचे आर्थिक गणित बिघडू शकते. उदाहरणार्थ तुम्हाला महिन्याला 50 हजार रुपये पगार आहे. तर तुमचा महिन्याचा ईएमआय हा 20 हजारांपर्यंतच असायला हवा.
वैविध्यपूर्ण गुंतवणूक करा
गुंतवणुकीच्या अनेक योजना मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणत्या योजनेत किती गुंतवणूक करायची, याचे भान असायला हवे. एकाच योजनेत सर्व गुंतवणूक करण्याची चूक करू नका. यामुळे तुम्हाला झाला तर फायदा नाही तर मोठे नुकसान सहन करावे लागेल. यासाठी वैविध्यपूर्ण गुंतवणूक करणे सोयिस्कर ठरू शकते.