Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. एसआयपीमधून गुंतवणूक करणे सोपे तर आहेच, पण त्याचबरोबर त्यातून रिटर्नसुद्धा चांगले मिळत आहेत. आज आपण अशाच काही इक्विटी फंडांनी दिलेल्या रिटर्नबाबत जाणून घेणार आहोत.
मागील 3 ते 5 वर्षांतील काही इक्विटी फंडांचा परतावा पाहिला असता, त्यातील काही फंडांनी 15 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिल्याचे दिसून आले. यात प्रामुख्याने लार्ज-मिड-स्मॉल कॅप, मल्टी कॅप, लार्ज आणि मिड कॅप या फंडांचा विचार केला आहे. या फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 3 आणि 5 वर्षांच्या कालावधीत चांगला परतावा मिळाल्याचे दिसून येते.
3 ते 5 वर्षांत 15 टक्के रिटर्न
म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही दीर्घकालीन गुंतवणूक मानली जाते. दीर्घकाळासाठी केलेल्या गुंतवणुकीवर म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले आहेत. यातील आपण ठराविक 12 स्कीमबद्दल अधिका माहिती जाणून घेणार आहोत. या 12 योजनांमध्ये स्मॉल कॅप, मिड कॅप, मल्टी कॅप, फोकस फंड, ईएलएसएस आणि लार्ज व मिड कॅप कॅटेगरीतील फंडचा समावेश आहे. ज्यांनी 3 आणि 5 वर्षांच्या कालावधीत 15 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स दिले आहेत. लार्ज कॅप, व्हॅल्यू फंड आणि कोन्ट्रा फंडांनी 15 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न दिले नाहीत.
क्वॉन्ट टॅक्स प्लॅनने दिला 30 टक्के परतावा
तीन वर्षांच्या कालावधीत क्वॉन्ट टॅक्स प्लॅन फंडाने (Quant Tax Plan) सर्वाधिक म्हणजे 30.46 टक्के रिटर्न दिले आहेत. त्यानंतर क्वॉन्ट अॅक्टिव्ह फंडाने 28.52 टक्के आणि कोटक स्मॉल कॅप फंडाने 26.91 टक्के रिटर्न्स दिले आहेत. तर 5 वर्षांच्या कालावधीत एसबीआय स्मॉल कॅप फंडाने (SBI Small Cap Fund) सर्वाधिक 18.97 टक्के रिटर्न्स दिले आहेत. त्यानंतर क्वॉन्ट टॅक्स प्लॅनने 18.81 टक्के आणि मिराई असेट इमर्जिंग ब्ल्यूचीप फंडाने 18.20 टक्के रिटर्न्स दिले आहेत.
इक्विटी फंडमध्ये असे काही फंडसुद्धा आहेत. ज्यांनी 3 किंवा 5 वर्षांच्या कालावधीसाठी 15 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स दिले आहेत. पण दोन्ही कालावधीत 15 टक्के रिटर्न देणाऱ्या योजनांमध्ये वरील 12 फंडांचा समावेश होतो. ज्या फंडांचा यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. त्यात 3 वर्षांच्या कालावधीसाठी घेतलेल्या फंडाचा कालावधी ऑगस्ट 2020 ते ऑगस्ट 2023 असा होता. तर 5 वर्षांच्या फंडांचा कालावधी ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 2023 इतका होता. अशाप्रकारे सर्वच फंड दोन्ही कालावधीत अपेक्षित परतावा देतील. हे सांगता येत नाही.
(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)