भारतातील काही नामांकित कंपन्या आणि त्यांच्या सीईओंच्या पगारावर नजर टाकली तर मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी एकाही सीईओने पगाराचा दहा अंकी आकडा गाठलेला दिसत नाही.
आपल्याकडे इंजिनिअरिंग, आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांमुळे आता 7 आकडी पगार थोडाफार अंगवळणी पडू लागला आहे. पण ग्रामीण भागाचा विचार केला किंवा काही ठराविक सेक्टरमधील नोकऱ्या पाहिल्या तर पगाराचा आकडा हा आजही 5 किंवा 6 अंकी असल्याचेच दिसून येते. आज आपण अशा काही नामांकित कंपन्यांच्या सीईओचे 2023 मधील पगार जाणून घेणार आहोत.
2023 मध्ये कंपन्यांच्या नफ्यात घट
2023 मध्ये निफ्टी 500 (Nifty 500) कंपन्यांच्या यादीतील कंपन्यांच्या नफ्यामध्ये 8.5 टक्के म्हणजे साधारण 11 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. त्या तुलनेत 2022 मध्ये या कंपन्यांच्या नफ्यामध्ये 50 टक्क्यांनी वाढ झाली होती. यामुळे अर्थातच या कंपन्यांच्या सीईओच्या पगारामध्ये यावर्षी कपात झाल्याचे दिसून येते. यावर्षी एकाही सीईओने 100 कोटींचा टप्पा गाठलेला दिसत नाही.
हिरो मोटोकॉर्पचे पवन मुंजाळ पहिल्या क्रमांकावर
शेअर मार्केटमधील टॉप 500 कंपन्यांमधील हिरो मोटोकॉर्पचे (Hero MotoCorp's) सीईओ पवन मुंजाळ यांचा आर्थिक वर्ष 2023 मधील पगार 99.55 कोटी रुपये आहे. मुंजाळ यांच्या पगारामध्ये यावर्षी 18 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा वार्षिक पगार 99.55 कोटी रुपये झाला असून, ते 2023 च्या सीईओंच्या यादीत पगाराच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहेत.
मागील वर्षी HCL Technologiesचे सी विजयकुमार यांचा पगार जवळपास 125 कोटीच्या घरात होता. त्यामध्ये यावर्षी 77 टक्क्यांनी म्हणजे जवळपास 28.4 कोटींनी कपात झाली आहे. मागील वर्षी कंपनीला झालेल्या फायद्यामुळे इन्सेंटीव्हमुळे पगारातही वाढ दिसून येत होती. त्याचप्रमाणे जेएसडब्ल्यू स्टीलचे सज्जन जिंदाल यांनाही मागील वर्षी कंपनीला झालेल्या फायद्याचा लाभ मिळाला होता. तो यावर्षी कमी झाल्याचे दिसून येते.
दुसऱ्या क्रमांकावर विप्रोचे थेरी डेलापोर्टे हे आहेत. त्यांचे यावर्षीचे पॅकेज 82.41 कोटी आहे. जे मागील वर्षी 79.81 कोटी होते. त्यांच्या पॅकेजमध्ये यावर्षी वाढ झाली आहे. दिवी लॅबोरेटरीजचे मुरली के दिवी यांचे मागील वर्षीचे पॅकेज 110.41 कोटी होते. ते यावर्षी 70.49 कोटींवर आले आहे.
नामांकित आयटी कंपन्यांच्या नफ्यात घट
आयटी फील्डमधील टॉपच्या कंपन्यांनी यावर्षी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात कपात केली. यामध्ये एचसीएल टेक, इन्फोसिस, विप्रो आणि टेक महिंन्द्रासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे मिड-टिअर आयटी कंपन्या जसे की, बिर्लासॉफ्ट, सोनाटा सॉफ्टवेअर, या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात दुपटीने वाढ केली. पर्सिसटन्ट सिस्टम कंपनीचे सीईओ संदीप कार्ला यांच्या मानधनात यावर्षी 32 टक्क्यांनी वाढ झाली असून त्यांचा पगार 67.7 कोटी झाला आहे.
2023 मध्ये सीईओंच्या मानधनात कपात होण्यामागे सध्याची बेताची आर्थिक स्थिती आणि कंपन्यांच्या नफ्यामध्ये झालेली घट कारणीभूत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे तर 1 रुपयाच्या वेतनावर काम करत आहेत. त्याचप्रमाणे कोटक महिन्द्राचे संचालकही किमान वेतनावर काम करत आहेत
Ref: cnbctv18.com