भारतीय आयकर नियम 80G नुसार धर्मादाय संस्थांना देणगी दिल्यास प्राप्तीकरातून 50 ते 100 टक्के सवलत दिली जाते. या कर सवलतीचा अनेक लोक फायदा घेताना दिसतात.थेट प्राप्तीकर भरण्याऐवजी सामाजिक आणि धार्मिक संस्थांना देणगी देण्यास लोक पसंती दर्शवतात. परंतु आता जवळपास 8000 जणांना याबाबत प्राप्तीकर विभागाने नोटीस पाठवली आहे. धर्मादाय संस्थाना देणगी देण्याच्या नावाखाली करचोरी केल्याचा ठपका या लोकांवार लावला असून याबाबत त्यांना विचारणा करण्यात आल्याचे समजते आहे.
कमाईपेक्षा अधिक देणगी
या संपूर्ण प्रकरणात प्राप्तीकर विभागाला समजलेली मुख्य माहिती म्हणजे कमाईपेक्षा अधिक देणगी दिल्याची प्रकरणे. प्राप्तिकर विभागाला डेटा अॅनालिटिक्सवरून अशी माहिती मिळाली आहे की, प्रत्यक्ष कमाईचे स्त्रोत दाखवलेले असताना त्यातून होणाऱ्या कमाई पेक्षा अधिक रक्कम संस्था-संघटनांना दान म्हणून देण्यात आली आहे. जाहीर केलेल्या कमाईच्या स्त्रोताव्यतिरिक्त हा पैसा आला कुठून याची विचारणा प्राप्तीकर विभागाने केली आहे.
सोबतच या प्रकरणात ज्या कर व्यवस्थापकांनी म्हणजेच सीए किंवा त्यासंबंधित संस्थांनी करचोरीत सहभाग घेतला आहे त्यांची देखील तपासणी केली जात असल्याचे प्राप्तीकर विभागाने म्हटले आहे. ही सर्व प्रकरणे 2017-18 ते 2020-21 या आर्थिक वर्षातील आहेत.
अशी होते करचोरी
धर्मादाय संस्थांना देणगी देऊन करचोरी कशी केली जाऊ शकते असा अनेकांन प्रश्न पडला असेल. अशा करचोरी प्रकरणात सबंधित व्यक्ती धर्मादाय संस्थांशी आधीच बोलणी करून ठेवतात. याद्वारे ठरवलेली रक्कम संस्थेला देणगी म्हणून दिली जाते, त्यानंतर थोड्या कालावधी नंतर देणगीच्या पैशातून काही रक्कम वजा करून पैसे रोख स्वरूपात पुन्हा देणगीदाराला दिली जाते. अशाप्रकारे करचोरी करण्यासाठी धर्मादाय संस्थांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे हे प्राप्तीकर विभागाच्या निदर्शनास आले होते.
आयकर नियमांनुसार, धर्मादाय ट्रस्टला दिलेल्या देणग्या करमुक्त आहेत. अशा स्थितीत अनेकांनी बनावट देणग्या दाखवून करमाफी घेतल्याचा संशय प्राप्तीकर विभागाला आहे.प्राप्तीकर विभागाने याआधी सुद्धा संबंधित धर्मादाय आयुक्तांना अशा संस्था-ट्रस्टवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
50 ते 100% कर सवलतीची मिळते सूट
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया (Family Planning Association of India), रेडक्रॉस सोसायटी ऑफ इंडिया (Redross Society of India), कुटुंब नियोजनाचा प्रचार करणारी सरकारी संस्था किंवा खेळांचा प्रचार-प्रसार आणि प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना देणगी दिल्यास, दिलेल्या देणगीवर 100% कर सवलत मिळते. तसेच धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या मंदिर, मशिदी, गुरुद्वारा आणि इतर धार्मिक स्थळांना देणगी दिल्यास 50 टक्के कर सवलत मिळविण्याची मुभा आहे.