हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडने टेक्समॅको रेल अॅंड इंजिनीयरिंग लिमिटेड या कंपनीशी जागतिक दर्जाच्या अॅल्युमिनियमचे रेल्वे मालडबे विकसित करण्यासाठी भागीदारी केली आहे. यातून भारतीय रेल्वेला शून्य कर्ब उत्सर्जन उद्दिष्टे आणि परिचालन कार्यक्षमता वाढवण्याचे लक्ष्य साध्य करण्यास मदत होणार आहे.
मालवाहतुकीत 45% बाजारहिस्सा साध्य करण्याच्या उद्देशाने 2027 पर्यंत मालवाहतूक क्षमता दुप्पट करून 3000 मिलियन टनांपर्यंत पोहोचविण्याचे लक्ष्य भारतीय रेल्वेने "मिशन 3000 एमटी"द्वारे निर्धारीत केले आहे. हे महत्त्वाकांक्षी लक्ष्य पूर्ण करण्यासाठी, रेल्वे मालडब्यांच्या रचनेत सुधारणा करण्यासाठी रेल्वेकडून सक्रियपणे प्रयत्न सुरू आहेत.
रेल्वेमधील या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, हिंडाल्को आणि टेक्समॅको यांनी संधी शोधण्यासाठी ही भागीदारी केली आहे, ज्यात हिंडाल्को तिच्या अद्वितीय अॅल्युमिनियम मिश्र धातुंचे विविध प्रकार, शीट्स आणि प्लेट्स, तसेच फॅब्रिकेशन आणि वेल्डिंग यांचे कौशल्य प्रदान करेल.
कंपनीने गेल्या वर्षी प्रस्तुत केलेला अंतर्गत वापरासाठी अॅल्युमिनियम मालडबा (फ्रेट रेक) हा 180 टन इतका हलका आहे आणि त्याची भारवहन क्षमता देखील 19% जास्त आहे. तुलनेने नगण्य झीज होऊन ते कमी ऊर्जेचा वापर करते.
या भागीदारीबद्दल भाष्य करताना, हिंडाल्को इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक सतीश पै म्हणाले, “भारतातील पहिला अॅल्युमिनियम रेक प्रस्तुत करून, आम्ही उच्च भारवहन क्षमता आणि अॅल्युमिनियम रेकमुळे शक्य झालेले कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जन कमी करण्याचे फायदे दाखवून दिले आहेत.
टेक्समॅको रेल अँड इंजिनीयरिंग लिमिटेडचे उपाध्यक्ष इंद्रजित मुखर्जी, म्हणाले, "ही भागीदारी नाविन्यपूर्ण आणि शाश्वत उत्पादने तयार करण्यासाठी उद्योगाचा कार्बन प्रदूषण प्रभाव कमी करण्यासाठी आणि सकारात्मक पर्यावरणीय परिणाम घडवण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अधिक बळकट करेल."
टेक्समॅको रेल अँड इंजिनीयरिंग लिमिटेडचे उपव्यवस्थापकीय संचालक सुदिप्त मुखर्जी पुढे म्हणाले, "कमी कार्बन फूटप्रिंटसह कार्यक्षम रोलिंग स्टॉक सादर करण्याच्या प्रयत्नात भारतीय रेल्वेला पाठबळ उभे करण्याच्या दृष्टीने या भागीदारीमध्ये प्रचंड क्षमता आहे.
उच्च-गुणवत्तेच्या अॅल्युमिनियम मालडबे, कोच, मोठे कंटेनर आणि घटक बनवू शकणारी स्वदेशी सुविधा केंद्र सरकारच्या फ्रेट कॉरिडॉरच्या जलद-गती विकासाला पूरक ठरेल ज्याचा उद्देश कार्यक्षमता वाढवणे आणि मालवाहतुकीचे दर कमी करणे असे आहे.
टेक्समॅको रेल अॅंड इंजिनिअरिंगचा शेअर तेजीत
रेल्वे क्षेत्रातील कंपन्यांना मोठी कंत्राटे मिळाली आहेत. त्याशिवाय या क्षेत्रातील गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. शेअर मार्केटमधील आकडेवारीनुसार 1 एप्रिलपासून टेक्समॅको रेल अॅंड इंजिनिअरिंग हा शेअर 169% ने वाढला आहे. ज्युपिटर वॅगनचा शेअर 153% आणि टिटागढ रेलसिस्टमचा शेअर 149% वाढ झाली.