लहान मुलांना त्यांच्या भाषेत किंवा त्यांच्या कलेने शिकवलेलं लवकर समजत. कर या विषयावर आपण त्यांच्याशी चर्चा करायला गेल्यास ते जड शब्द ऐकून मुले दुसऱ्या मिनिटाला पळून जातील. मुलांना हसत खेळत टॅक्सचे महत्व समजावण्यासाठी प्राप्तिकर विभाग (Income Tax Department) प्रयत्न करत आहे. मुलांचे आवडते खेळ, कोडी आणि कॉमिक्सचा अनोखा उपयोग करण्याचं केंद्र सरकारने निश्चित केलं आहे. टॅक्ससारख्या (Tax) तज्ज्ञांनाही किचकट वाटणा-या विविध बाबी सुलभ करण्यासाठी या मुलांच्या आवडत्या माध्यमाद्वारे टॅक्स साक्षरता (Tax Literacy) करणारं पाऊल उचलण्यात आलं आहे. उन्हाळी सुट्ट्या संपल्या तरीही मुलांना खेळ, कोडी आणि कॉमिक्सचे आकर्षण नेहमीच असते. सरकारच्या प्राप्तीकर विभागाने (Income Tax) नेमके हेच ओळखून मुलांमध्ये कर साक्षरता प्रसार (Tax Literacy) करण्याचे निश्चित केलं आहे.
आझादी का अमृत महोत्सव आयकॉनिक वीकमध्ये उपक्रमाची सुरुवात
या उपक्रमाची सुरुवात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 12 जून रोजी (रविवारी) केली. पणजी येथील आझादी का अमृत महोत्सव आयकॉनिक वीकच्या (Iconic week) समारोप समारंभात उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी या उत्पादनांच्या पहिल्या सेटचे वाटप केले. देशाच्या दृष्टीने पुढची 25 वर्षे हा अमृतकाळ असेल आणि नव भारताला आकार देण्यासाठी युवक महत्त्वाची भूमिका बजावतील, असं त्यांनी यावेळी म्हंटल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (Central Board of Direct Tax - CBDT) मजकुरावर आधारित साहित्य, जनजागृती चर्चासत्रं आणि कार्यशाळा या पलीकडे जाऊन कर साक्षरतेच्या प्रसारासाठी एक अभिनव मोहिम आखली आहे. टॅक्स आकारणीशी संबंधित संकल्पना मांडण्यासाठी विविध बैठे खेळ, कोडी अशी अनेक उत्पादने आणली आहेत.
सीबीडीटीची मुलांसाठी उत्पादनं
साप-शिडी आणि कर (Snakes, ladders & Taxes)
या बैठ्या खेळात कर आणि आर्थिक व्यवहाराशी संबंधित सकारात्मक आणि नकारात्मक सवयींचा परिचय करून दिला जातो. सकारात्मक सवयींना शिडीद्वारे पुरस्कृत केले जाते तर नकारात्मक सवयींना साप दंड करतात`.
बिल्डिंग इंडिया (Building India)
हा सहयोगी खेळ पैसे देण्याची महत्त्वाची संकल्पना मांडतो. पायाभूत सुविधा (Infrastructure) आणि सामाजिक प्रकल्पांवर (Social Projects) आधारित 50 मेमरी कार्ड वापरून हा खेळ खेळला जातो. कर आकारणी ही पद्धती सहयोगी असून ती स्पर्धात्मक निश्चितच नाही हा संदेश या खेळाद्वारे दिला जातो.
इंडिया गेट - 3D कोडे (India Gate 3D Puzzle)
या खेळामध्ये 30 तुकड्यांचा समावेश आहे. प्रत्येकामध्ये विस्तृत माहिती देण्यात आली आहे. कर आकारणीशी संबंधित विविध अटी आणि संकल्पनांबद्दलचे तुकडे एकत्र जोडल्यावर इंडिया गेटची त्रि-आयामी रचना तयार होते. आणि कर निर्मिती होते, असं दर्शविण्यात आलं आहे. कर हे राष्ट्रबांधणीतील सर्वोत्कृष्ट योगदान आहे, असा संदेश त्यातून दिला गेला आहे.
डिजिटल कॉमिक बुक (Digital Comic Books)
प्राप्तीकर विभागाने लोट पोट कॉमिक्स यांच्या सहकार्याने हे कॉमिक्स तयार केले आहे. मुले आणि तरुणांमध्ये उत्पन्न आणि कर आकारणीच्या संकल्पनांबद्दल जागरूकता पसरवणे यासाठी ही पुस्तकं तयार केली आहेत. आबालवृद्धांमधील लोकप्रिय मोटू-पतलूच्या कार्टून पात्रांनी त्यांच्या आकर्षक संवादांमधून याबाबतचे संदेश दिले आहेत.
कुठे मिळणार खेळाचे साहित्य
प्राप्तीकर विभागाची कार्यालये देशभरात विविध ठिकाणी आहेत. त्यामुळे ही उत्पादने सुरुवातीला प्राप्तीकर विभागाद्वारे शाळांमध्ये वितरित केली जातील. या खेळांचे पुस्तकांच्या दुकानातून वितरण करण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असल्याने दुकानांनमध्ये हे खेळाचे साहित्य मिळणार नाही.
शालेय आणि वयाच्या एका ठरावीक टप्प्यात कर साक्षरतेविषयीचे धडे मुलांना आयुष्याच्या लवकरच्या टप्प्यात दिले गेल्याने प्रत्यक्ष रोजगार वा नोकरीसाठीच्या उमेदवारीप्रसंगी त्यांना अधिक सुलभता येईल, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे. शिवाय कराबाबतची कल्पना स्पष्ट होत असल्याने शैक्षणिक पर्यायांची निवड आणि दैनंदिन व्यवहाराचा मार्ग अशा उपक्रमातून अधिक सुलभ ठरेल, अशी प्रतिक्रिया काही शिक्षकांनीही व्यक्त केली.