टाटा समूह लवकरच ॲपलचा भारतातील आयफोन निर्मिती कारखाना ताब्यात घेणार आहे. हा करार अंतिम टप्प्यात असून ऑगस्ट महिनाअखेरीस ही डील होणार आहे. या डीलनंतर भारतात आयफोन बनवणारी पहिली कंपनी म्हणून टाटा कंपनी ओळखली जाणार आहे. सध्या ॲपलच्या मोबाईल फोनची निर्मिती कर्नाटकातील ‘विस्ट्रॉन’ ही कंपनी करते. या कंपनीचा ताबा टाटा समूह घेणार आहे. याबाबतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून फक्त औपचारीकता बाकी आहे. यानंतर कुठल्याही भारतीय उद्योगाची 100% गुंतवणूक असलेली कंपनी आयफोन हा मोबाईल बनवणार आहे.
600 दशलक्ष डॉलर्सची डील
विस्ट्रॉन आणि टाटा समुहात झालेल्या या कराराचे किंमत 600 दशलक्ष डॉलर्स असल्याचे बोलले जात आहे. विस्ट्रॉन कंपनीत सद्यस्थितीत जवळपास 10,000 कर्मचारी काम करत आहेत. टाटा कंपनीने अधिग्रहण केल्यानंतर हे कर्मचारी कायम राहणार आहेत. कामात कुठलाही बदल होणार नाहीये.
सध्या विस्ट्रॉनमध्ये आयफोन 14 या स्मार्टफोनचे उत्पादन घेतले जात आहे. मार्च 2024 पर्यंत 18 लाख डॉलर किमतीचे आयफोन बनविण्याचे कंपनीचे उद्दिष्ट्य आहे. आता कंपनीचे टाटा समूह अधिग्रहण करत असल्याने त्यांना हे लक्ष गाठावे लागणार आहे.
केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्वीट करत ‘टाटा’ आणि ‘ॲपल’ समूहाला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी पीएलआय योजनेचे हे यश आहे असे त्यांनी म्हटले आहे.
Bringing national champions into Global Electronics Value chains is a key policy objective of Hon’ble PM @narendramodi ji’s visionary PLI scheme.
— Rajeev Chandrasekhar ?? (@Rajeev_GoI) July 11, 2023
This news about @TataCompanies getting one step closer to manufacturing the iconic iPhone for global markets is very positive…
चीनशी स्पर्धा
कोरोना साथीच्या दरम्यान तेथील ॲपल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांमध्ये कर्मचाऱ्यांशी दुर्व्यवहार केला जात होता, त्यांना लॉकडाऊन असतानाही कामावर लावले जात होते अशा तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे चीनच्या या निर्णयामुळे ॲपलवर देखील टीकेची झोड उठली होती. त्यांनतर चीनमध्ये ॲपलचे उत्पादन देखील घटले होते. यानंतर कंपनीने चीनमधून निर्मिती कारखाने हलवण्याचा निर्णय घेतला होता.
याच प्रक्रियेचा भाग म्हणून भारतात आता आयफोनची निर्मिती होणार आहे. उद्योगजगतात या डीलकडे एक महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून बघितले जात आहे. चीनची मक्तेदारी मोडीत काढून आंतराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कंपन्या जम बसवू लागल्या आहेत.