Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Group: आयफोन बनवण्याच्या शर्यतीत टाटा समूह आघाडीवर! लवकरच अ‍ॅपलसोबत करार होण्याची शक्यता

Tata Group: आयफोन बनवण्याच्या शर्यतीत टाटा समूह आघाडीवर! लवकरच अ‍ॅपलसोबत करार होण्याची शक्यता

Tata Group: टाटा समूह भारतात आयफोन बनवणारी पहिली कंपनी बनण्याच्या शर्यतीत सध्या आघाडीवर आहे. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेकडून टाटा समूहाबाबत ही मोठी बातमी समोर आली आहे. टाटा ग्रुप भारतात आयफोन बनवणारी पहिली कंपनी बनू शकते, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. टाटा ग्रुपचा अ‍ॅपलसोबतचा लवकरच करार होऊ शकतो.

टाटा ग्रुप हा देशातला पहिला आयफोन बनवणारा समूह ठरू शकतो. अ‍ॅपल फोन बनवण्‍यासाठी भारतात सध्या तीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत. विस्ट्रॉन (Wistron), पेगाट्रॉन (Pegatron) आणि फॉक्सकॉन (Foxconn) यांचा यात समावेश आहे. अ‍ॅपल आधीच भारतात आयफोन 13 (iPhone 13), आयफोन (iPhone 12) आणि आयफोन (iPhone SE) यासह विविध मॉडेल्सचे आयफोन तयार करते.

आता काय होणार?

टाटा समूह एक मोठा करार करणार आहे. टाटा समूह विस्ट्रॉन कॉर्पचं कर्नाटकातलं उत्पादन युनिट खरेदी करण्याची शक्यता आहे. अ‍ॅपलचा आयफोन या युनिटमध्येच तयार होतो. हा करार 5000 कोटींचा असल्याची चर्चा आहे.

अधिकृत प्रतिक्रिया नाही

टाटा विस्ट्रॉन आणि अ‍ॅपलनं या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. अलीकडे, आयफोननं घोषणा केली होती, की ते भारतात नवीन लाँच केलेल्या आयफोन 14चं (iPhone 14) उत्पादन चेन्नईतल्या फॉक्सकॉनच्या (Foxconn) श्रीपेरुम्बुदुर फॅसिलिटीमध्ये करणार आहे.

काय म्हटलं होतं अ‍ॅपलनं?

कंपनीनं जारी केलेल्या निवेदनात असं सांगण्यात आलं आहे, की आम्ही आयफोन 14 भारतात तयार करण्यास उत्सुक आहोत. नवीन आयफोन (iPhone 14) लाइनअप नवं तंत्रज्ञान आणि अद्ययावत सुरक्षा फीचर्सनी सुसज्ज आहे. भारतात आयफोन 14ची निर्मिती पेगाट्रॉन आणि फॉक्सकॉनमध्ये केली जात आहे.

चीनवरचं अवलंबित्व कमी

टाटा समूह 2023च्या अ‍ॅपल आयफोन 15 सिरीजमधले 5 टक्के फोन बनवेल, अशी अपेक्षा आहे. फॉक्सकॉन, लष्करे आणि पेगाट्रॉन यांसारख्या इतर कंपन्यांचा त्यात प्राथमिक हिस्सा असेल. एकूणच कंपनी आपल्या आयफोनच्या उत्पादनासाठी चीनवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी देशात आयफोन 15 सिरीज तयार करण्याचा विचार करत आहे.

भारतातल्या उत्पादनाचे फायदे

टाटा ग्रुपच्या या डीलनंतर आयफोनचं उत्पादन भारतात सुरू झालं तर त्याचे फायदेच आहेत. पहिला फायदा म्हणजे आयफोन 15ची डिलिव्हरी जलद होऊ शकते. दुसरं, जे आयफोन बाहेरून येत होते, ते आता भारतात मिळाल्यानं त्यांच्यावर लावण्यात आलेल्या करात सवलत मिळणार आहे. त्यामुळे उत्पादनाला गती मिळण्याबरोबरच किंमतदेखील स्वस्त होईल.

टाटाची घोडदौड

टाटा मागच्या 155 वर्षांपासून दैनंदिन जीवनातल्या विविध वस्तूंचं उत्पादन करत आहे. त्यात खाद्यपदार्थांपासून ते अद्ययावत तंत्रज्ञानानं युक्त असलेल्या वस्तूंचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांत समूहानं इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं आणि ई-कॉमर्समध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे. टाटा समूहासाठी हे एक नवीन क्षेत्र आहे. आयफोन चेसिस किंवा यंत्राचा मेटल बॅकबोन बनवणारे त्यांचे शेकडो कारखाने आधीच आहेत.