Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Group Dividend: टीसीएसनं केली लाभांशाची घोषणा, पहिल्या तिमाहीत कमावला 11074 कोटी नफा

Tata Group Dividend: टीसीएसनं केली लाभांशाची घोषणा, पहिल्या तिमाहीत कमावला 11074 कोटी नफा

Image Source : www.moneycontrol.com

Tata Group Dividend: टाटा समूहाची आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं 2024 या आर्थिक वर्षासाठी भागधारकांना लाभांश जाहीर केला आहे. 12 जुलैला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत लाभांशाला मंजुरी देण्यात आली.

आयटी क्षेत्रातली दिग्गज कंपनी टीसीएसनं (Tata Consultancy Services) एप्रिल-जून तिमाहीचे निकाल जाहीर केले. जूनच्या तिमाहीत कंपनीनं 11,074 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. निकाल बाजाराच्या अंदाजापेक्षा फारसे चांगले नाहीत. असं असतानाही कंपनीनं लाभांश (Dividend) जाहीर केला आहे. जवळपास 900 टक्के अंतरिम लाभांश जाहीर करण्यात आला आहे.

प्रति इक्विटी शेअर 9 रुपये

टीसीएसनं आर्थिक वर्ष 2024साठी गुंतवणूकदारांना प्रति इक्विटी शेअर 9 रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. कंपनीच्या शेअरचं दर्शनी मूल्य 1 रुपया आहे. अशाप्रकारे गुंतवणूकदारांना लाभांशातून 900 टक्के उत्पन्न मिळणार आहे. डिव्हिडंड रेकॉर्ड तारीख 20 जुलै 2023 अशी निश्चित करण्यात आली आहे. तर लाभांश 7 ऑगस्ट 2023 रोजी दिला जाणार आहे.

पहिल्या तिमाहीचे निकाल

टीसीएसनं आर्थिक वर्ष 2023-24च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. निकाल बाजाराच्या अंदाजापेक्षा कमकुवत आहेत. एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 11074 कोटी रुपये इतका होता. त्यात तिमाहीच्या आधारावर घट झाल्याचं दिसतं. मार्चच्या तिमाहीत कंपनीला 11,392 कोटी रुपये इतका नफा झाला होता. पहिल्या तिमाहीत एकत्रित उत्पन्न 59,381 कोटी रुपये इतकं होते. अंदाज 59,650 कोटी रुपये इतका होता. मार्चच्या तिमाहीत एकत्रित उत्पन्न 59381 कोटी रुपये होतं. यामध्ये किंचित घट झाल्याचं दिसून आलं आहे. आता कंपनीनं प्रति शेअर 9 रुपये इतका अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.

एचसीएलचाही लाभांश जाहीर

टीसीएससह एचसीएलनंही लाभांशाची घोषणा केली आहे. 2024 च्या पहिल्या तिमाहीत एचसीएलचा निव्वळ नफा वार्षिक 7.6 टक्क्यांनी वाढून 3,534 कोटी रुपये झाला आहे. तिमाही आधारावर, कंपनीच्या नफ्यात 11.3 टक्के घट झाल्याचं दिसून आलं आहे. मागच्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 3,983 कोटी रुपये इतका होता. दरम्यान, एचसीएलनं 10 रुपये प्रति शेअर लाभांश जाहीर केला आहे.

(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)