Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

विजेची उपकरणं वापरताना घ्या ही काळजी, कमी येईल तुमचे बिल आणि होईल पैशांची बचत

विजेची उपकरणं वापरताना घ्या ही काळजी, कमी येईल तुमचे बिल आणि होईल पैशांची बचत

वॉशिंग मशिन, फ्रीज, ओव्हन, टिव्ही यांसारख्या विजेच्या उपकरणांमुळेच ४० टक्के बिल येते. अशी घ्या विजेवर चालणाऱ्या उपकरणांची काळजी, यामुळे होईल विजेची आणि बिलाचीही बचत.

आमच्या घरातील विजेचे बिल खूपच जास्त येतं असे अनेकजण सांगत असतात. विजेचे बिल अधिक आल्याने अनेकवेळा तुमच्या मासिक आर्थिक नियोजनावर देखील परिणाम होतो. त्यामुळे घरातील विजेचे बिल कमी आले पाहिजे यासाठी सगळेच नेहमी प्रयत्न करत असतात. तुमचे विजेचे बिल कमी आले पाहिजे यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देणार आहोत. वॉशिंग मशिन, फ्रीज, ओव्हन, टिव्ही यांसारख्या विजेच्या उपकरणांमुळे तुमचे ४० टक्के बिल येते. त्यामुळे या गोष्टी वापरताना काही काळजी घेतली तर तुमचे बिल नक्कीच कमी होईल.

एखाद्या खोलीत कोणीही नसेल तर त्या खोलीतले लाईट, पंखे बंद करावेत हे आपल्याला लहानपणापासूनच सांगितले जाते. त्यामुळे गरज नसताना पंखे, लाईट बंद केले तर आपण खूप सारी वीज वाचवू शकतो. त्यामुळे तुमचे विजेचे बिल कमी येऊ शकते. तसेच घरात एलईडी बल्ब, वीज वाचवणारी उपकरणे वापरावीत यामुळे बिल कमी येते.

वॉशिंग मशिन
अनेक घरांमध्ये दररोज वॉशिंग मशिन लावली जाते. पण तुमच्या घरात केवळ दोन-तीन व्यक्तीच राहात असतील तर दररोज मशिन लावण्यापेक्षा एक दिवस आड वॉशिंग मशिन लावण्याचा प्रयत्न करा. घरात लोक कमी असतील तर कपडे देखील कमी असतात. कधी कधी तर एखाद-दोन कपड्यांसाठी देखील मशिन लावली जाते. त्यापेक्षा कमी कपडे असतील तर ते हाताने धुऊन घ्या. तसेच वॉशिंग मशिनचे काम झाल्यानंतर मशिनचा स्वीच लगेचच बंद करावा. कोणतीही वीज उगाचच वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी.

फ्रीज
फ्रीजची सतत उघडझाप केल्यामुळे फ्रीजचे जास्त बिल येते. त्यामुळे जेवण बनवताना कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत, त्या वस्तू एकाच वेळी काढून ठेवाव्यात. तसेच घरात लहान मूल असेल तर फ्रीजला कुलूप लावून ठेवावे, अन्यथा लहान मूल सतत फ्रीजची उघडझाप करेल आणि त्यामुळे विजेचे बिल अधिक येईल.

ओव्हन
ओव्हनमध्ये पदार्थ शिजायला ठेवल्यानंतर पदार्थ शिजला की नाही हे पाहाण्यासाठी अनेकवेळा ओव्हनचे दार सतत उघडायची अनेकजणांना सवय असते. यामुळे प्रचंड वीज खर्च होते. त्यापेक्षा ओव्हनचे दार काचेचे असल्याने आपण त्यात डोकवून पदार्थाकडे लक्ष देऊ शकतो. तसेच ओव्हनमध्ये पदार्थ शिजवत असताना आपल्याला जितके पदार्थ शिजवायचे आहेत ते एकत्रच ठेवायचा प्रयत्न करा, अन्यथा जास्त वीज खर्च होईल.

इस्त्री
इस्त्री करताना केवळ एखाद्या कपड्याला इस्त्री करण्याऐवजी दहा-बारा कपड्यांना एकत्र इस्त्री करा. एकदा इस्त्री तापली की त्या उष्णतेत अनेक कपडे इस्त्री करता येतात आणि वीज वाचते.

टिव्ही
अनेकजणांना केवळ रिमोटने टीव्ही बंद करण्याची सवय असते. ते टिव्हीचा मुख्य स्वीच तसाच सुरू ठेवतात. रिमोटने टिव्ही बंद झाला असला तरी मुख्य स्वीच सुरू असल्याने त्यातून वीजप्रवाह सुरू राहातो. हा प्रवाह कमी प्रमाणात असला तरी याचा विजेच्या बिलावर परिणाम होतो.

एसी
एसी वापरताना एसीचे तापमान २४ अंश सेल्सिअसच्या खाली असू नसे. यामुळे विजेचे बिल अधिक येते.