महाराष्ट्रातून उद्योग धंदे गुजरातला पळवण्याचे प्रकार सुरु असतानाचा आता मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांसाठी सूरतमधीन डायमंड बोर्सने खुली ऑफर दिली आहे. मुंबईतला व्यवसाय बंद करुन सूरतमध्ये शिफ्ट करणाऱ्या डायमंड मर्चंट्सना सूरत डायमंड बोर्समध्ये वर्षभराचा मेटेनन्स माफ केला जाणार आहे. अशा प्रकारच्या प्रलोभनांमुळे सूरत डायमंड बोर्स आणि मुंबईतील भारत डायमंड बोर्स ही दोन प्रमुख केंद्र आमनेसामने आली आहेत.
मुंबई प्रमाणेच गुजरातमधील सूरत शहरात अनेक वर्षांपासून हिरे व्यापार आहे. कच्चे हिरे, त्यांना पॉलिश करणे, पैलू पाडणे यापासून हिऱ्यांचे दागिने तयार केले जातात. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलनात भारत डायमंड बोर्स हे खास हिरे उद्योगासाठी तयार केलेले बिझनेस सेंटर आहे. त्यापूर्वी दक्षिण मुंबईतील चर्नी रोड येथील पंचरत्न ही इमारत हिरे उद्योगाचे केंद्र होते.
दरम्यान, सूरत येथे नव्याने डायमंड मार्केट या वर्षाअखेर सुरु होणार आहे. सूरत डायमंड मार्केटने (Surat Diamond Bours) हिरे व्यापाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आमिषे दाखवली आहेत. ज्यामुळे सूरत डायमंड बोर्स आणि भारत डायमंड बोर्स यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
सूरत डायमंड बोर्समध्ये येणाऱ्या हिरे व्यापाऱ्यांना वर्षभर मेंटेनन्स माफ करण्याची ऑफर देण्यात आली आहे. मुंबईतून व्यापार गुंडाळून सूरतमध्ये स्थलांतर करणाऱ्या हिरे व्यापाऱ्यांसाठी ही खास सवलत देण्यात आली आहे.
सूरत डायमंड बोर्सकडून मुंबईतून व्यापार बंद करुन येणाऱ्या व्यापारांचा विशेष उल्लेख केला जाणार आहे. त्यांना सूरत डायमंड बोर्सचे आघाडीचे सभासद अशा प्रकारची उपमा देणार असल्याचे सूरत डायमंड बोर्सने म्हटले आहे.
सूरत डायमंड बोर्सच्या या स्ट्रॅटेजीवर मुंबईतील भारत डायमंड बोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आक्षेप घेतला आहे. सूरतमध्ये अद्याप 10% कार्यालयांचे काम पूर्ण झालेले नाही. मात्र तरिही मुंबईतील व्यापाऱ्यांना आमिषे दाखवली जात असल्याबद्दल भारत डायमंड बोर्सचे उपाध्यक्ष मेहुल शहा यांनी नाराजी व्यक्त केली.
शहा म्हणाले की सूरतमधील हिरे व्यापारी सूरत डायमंड बोर्समध्ये सहभागी होत नसताना मुंबईतील व्यापाऱ्यांना प्रलोभने दाखवण्याचे कारण काय? भारत डायमंड बोर्सने कोणत्याही व्यापाराला व्यवसाय बंद कर आणि मुंबईत ये असे आवाहन केलेले नाही, असे शहा यांनी सांगितले.
जागतिक पातळीवरी हिरो व्यापारातील 70 ते 80% योगदान भारतीय डायमंड उद्योगाचे आहे. दोन प्रमुख डायमंड मार्केट ही गरज भागवत आहेत. अशावेळी एकमेकांमध्ये स्पर्धा करण्याचे कारण नाही, असे शहा यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वर्षभरासाठी मेंटेनन्स फ्री ही सवलत जे सूरत डायमंड बोर्सचे सभासद आहे त्यांच्यासाठी असल्याचे सूरत डायमंड बोर्सच्या मॅनेजिंग कमिटीचे सदस्य दिनेश नवादिया यांनी स्पष्ट केले. हा निर्णय कमिटीने घेतला आहे. प्रत्येकाला पुढे जाण्याचा अधिकार आहे. असा निर्णय घेणे गैर नाही, असे त्यांनी सांगितले.
डायमंड हब पंचरत्नमध्ये 5000 कोटींची उलाढाल
- दक्षिण मुंबईत चर्नी रोड येथील पंचरत्न इमारतील हिरे उद्योगाचे केंद्र होते.
- 1975 साली पंचरत्न या गगनचुंबी इमारतीची उभारणी करण्यात आली होती.
- यात सुरुवातीला सहाव्या मजल्यापर्यंत हिरे व्यापाऱ्यांसाठी गाळे होते.
- नव्वदच्या दशकात या इमारतीतीन कोट्यावधी रुपयांची हिरे व्यापाराची उलाढाल होत होती.
- जेव्हा हिरे उद्योगाला सोन्याचे दिवस आले होते तेव्हा इथली वार्षिक उलाढाल 5000 कोटी रुपयांवर गेली होती, असे जाणकार सांगतात.
- हिरे उद्योगाचा वर्ष 2000 नंतर प्रचंड विस्तार झाला. हिरे व्यापाऱ्यांसाठी या इमारतीतील जागा कमी पडू लागली.
- पुढे वांद्रे कुर्ला संकुलनात भारत डायमंड बोर्स असे नवीन सुसज्ज डायमंड मार्केट उभारण्यात आले.
- पंचरत्नमधील बहुतांश हिरे व्यापाऱ्यांनी बीकेसीमधील भारत डायमंड बोर्समध्ये आपली कार्यालये स्थलांतरित केली.
- अनेकांनी इथली जागा निवासी वापरासाठी विक्री केली. आता पंचरत्न एक रेसिडेंन्शिअल कॉम्प्लेक्स बनले आहे.