गदर 2 सिनेमा सुपरहीट ठरल्यानंतर या सिनेमातील हिरो अभिनेते सनी देओल यांचा भाव वाढला आहे. एका रिपोर्टनुसार सनी देओल यांनी नवीन सिनेमासाठी तब्बल 45 ते 50 कोटी रुपये मानधनाची मागणी एका दिग्दर्शकाकडे केली आहे. 11 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज झालेल्या गदर 2 ने आतापर्यंत 400 कोटींची कमाई केली आहे.
सनी देओल मागील अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासून अलिप्त होते. गदर 2 सिनेमातून त्यांनी धडाक्यात रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले. गदर 2 मध्ये सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या जोडी पुन्हा हीट ठरली. सर्वच गटातील प्रेक्षकांनी गदर 2 ला प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
चित्रपट समिक्षक केआरके यांनी सनी देओल यांनी मानधन वाढवल्याचा दावा केला आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी सनी देओल यांनी नव्या सिनेमासाठी किमान 50 कोटी रुपयांच्या मानधनाची मागणी केली आहे.
बॉलिवुडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये शाहरुख खान, सलमान खान यांच्याबरोबर आता सनी देओल यांचेही नाव जोडले गेले आहे.
सनी देओल यांचा मुंबईतील बंगल्याचा लिलाव
बँक ऑफ बडोदाने 56 कोटींचे कर्ज थकवल्याबद्दल अभिनेते सनी देओल यांचा मुंबईतील सनी व्हीला या बंगल्याचा लिलाव जाहीर केला होता. मात्र लवकरात लवकर थकीत कर्ज फेडण्याचे आश्वासन सनी देओल यांनी दिल्यानंतर बँकेने बंगला लिलाव करण्याची प्रक्रिया स्थगित केली होती.
गदर 2 सिनेमाने 400 कोटींचा टप्पा ओलांडला
गदर 2 सिनेमाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. 11 ऑगस्ट 2023 रोजी गदर 2 देशभरात रिलीज झाला होता. तेव्हापासून 15 दिवसांत या सिनेमाने 425 कोटींची कमाई केली आहे. पहिल्याच आठवड्यात गदर 2 ने अॅडव्हान्स बुकिंगचेही रेकॉर्ड मोडले. एका पोर्टलनुसार सातव्या दिवशी गदर 2 साठी 3 लाख 13 हजार 30 तिकिटांचे अॅडव्हान्स बुकिंग झाले होते. यामुळे मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन थिएटरवाल्यांना संजिवनी मिळाली.