Sunil Shetty investment in ReGrip: बॉलिवूडमधील अभिनेता सुनील शेट्टी याने गाडीचे जुने टायर रिसायकल करणारी स्टार्टअप कंपनी रिग्रिप (ReGrip) कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक करत असताना सुनील शेट्टी याने रिसायकलवर भर देत भारतातील कचरा कमी करून जुन्या टायर्सचे आयुष्य वाढवून निसर्गाचा समतोल राखून भविष्यातील तरूणांसाठी एक चांगले आणि स्वच्छ जीवनमान तयार करण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याचे सांगितले.
रिग्रीप या कंपनीची स्थापना 2021 मध्ये गुरूग्राम येथे झाली आहे. या कंपनीने जुन्या टायर्सचे आयुष्य वाढवून ते आणखी मजबूत करण्याची प्रक्रिया तयार केली आहे. हे पुनर्निर्माण केलेले टायर सुरक्षित तर आहेत; पण त्याचबरोबर त्याची किंमतसुद्धा नवीन टायरच्या तुलनेत अर्धी आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे.
रिग्रीप कंपनी
रिग्रीप कंपनी ही जुने आणि खराब झालेल्या टायर्सची दुरूस्ती करून ते पुन्हा सुरक्षितरीत्या वापरता येईल, यावर काम करते. तसेच यांनी तयार केलेले टायर हे नवीन टायरच्या तुलनेत अर्ध्या किमतीत उपलब्ध आहेत. रिग्रीपकडे उपलब्ध असलेले टायर्स लहान आणि मध्यम आकाराच्या वाहतूक करणाऱ्या गाड्यांसाठी वापरले जातात.
अभिनेता सुनील शेट्टी याने नुकतीच रिग्रीप कंपनीच्या गुरुग्राम येथील फॅक्टरीला भेट दिली. यावेळी त्यांनी रिग्रीपचे संस्थापक डायरेक्टर तुषार सुहालका आणि मुख्य गुंतवणूकदार महावीर प्रताप शर्मा यांची भेट घेतली.
रिग्रीप कंपनीला भेट दिल्यानंतर सुनील शेट्टी यांनी या नवीन कल्पनेचे भरभरून कौतुक केले. तसेच यातून येणाऱ्या पिढीसाठी एक चांगले जग निर्माण करू शकतो. असा विश्वास व्यक्त केला. तसेच यामध्ये टायर्सचे फक्त रिसायकल होते, एवढेच नाही तर यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच एक कचरा कमी करून त्यापासून टिकाऊ, सुरक्षित आणि स्वस्त टायरची निर्मिती करणे ही एक नवसंकल्पना आहे. ज्याची आपल्याला गरज आहे, असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले.
सुनील शेट्टी - अभिनेता कम बिझनेसमॅन
सुनील शेट्टी हा हिरो कमी आणि बिझनेसमन अधिक आहे. तो एक पॉपकॉर्न एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या नावाने एक प्रोडक्शन हाऊस चालवतो. त्याचे स्वतःचे हॉटेलदेखील आहे. खंडाळ्यात त्याचे फार्महाऊस आहे. मिडिआमधील रिपोर्ट्सनुसार त्याची एकूण संपत्ती 100 कोटीहून अधिक आहे.
हेल्थकेअर व्हेंचरमध्येही गुंतवणूक
लोकांची जीवनशैली (Lifestyle) सुधारण्यासाठी आरोग्य (Health) आणि फिटनेस (Fitness) क्षेत्राची मदत घेत ललित धर्मा यांनी स्थापन केलेल्या द बायोहॅकर या हेल्थकेअर व्हेंचरमध्येही सुनील शेट्टी याने नुकतीच गुंतवणूक केली आहे.