आषाढी वारीच्या (Pandharpur Ashadhi Wari) निमित्तानं एसटी महामंडळातर्फे विशेष अशा बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. साधारणपणे 5000 एसटी बसेसचं नियोजन वारी सुरू होण्याच्या आधीच करण्यात आलं होतं. ही सुविधा 25 जूनपासून ते 5 जुलैपर्यंत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे या गाड्यांना पथकरातून सूट (Exemption from road tax) मिळणार आहे. एकूणच एसटी महामंडळानं वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटीचं नियोजन केलं आहे. राज्यभरातून तब्बल 5000 अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
Table of contents [Show]
रिंगण सोहळ्यासाठीदेखील अतिरिक्त बसेस
माऊलींचा रिंगण सोहळा 27 जूनला वाखरीला होणार आहे. त्यासाठी अतिरिक्त 200 बसेसची सेवा पुरवली जाणार आहे. पंढरपुरात राज्यभरातूनच नाही तर विविध राज्यातूनही भाविक दाखल होत असतात. त्या कुणाचीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळेच विविध आगारातून बसेस सोडण्याचं नियोजन आहे. एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून देखील तात्पुरत्या बसस्थानकं उभारली जाणार आहेत. त्यात चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) आणि विठ्ठल कारखाना याठिकाणी तात्पुरती स्थानकं उभारली जाणार आहेत. यासंदर्भात सीएमओनं 15 मेला एक ट्विटदेखील केलं होतं.
#पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाने केलेल्या बस सेवेच्या नियोजनाचा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज आढावा घेतला. श्री क्षेत्र पंढरपूर यात्रेकरिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 15, 2023
दि. २५ जून ते… pic.twitter.com/G2JMsdKbiU
कोणत्या विभागातून किती बसेस?
एसटी महामंडळाच्या एकूण सहा विभागातून बसेस सोडण्याचं ठरवण्यात आलं आहे. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती अशा विभागांतून बसेस सोडण्यात येणार आहेत. विभागवार आकडेवारीवर नजर टाकल्यास पुणे आणि औरंगाबाद विभागातून सर्वाधिक प्रत्येकी 1200, नाशिक विभागातून 1000, अमरावती विभागातून 700, मुंबई विभागातून 500 तर नागपूर विभागातून 100 अशा बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. नाशिक आणि मराठवाड्यातून अधिक भाविकांची गर्दी पाहता याठिकाणांहून जादा गाड्यांची व्यवस्था असणार आहे.
पैशांची बचत
आपल्या शेतीची कामे उरकून वारीत सहभागी होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. खासगी वाहनांतून वारीतून परतीच्या प्रवासावेळी अनेकवेळा अव्वाच्या सव्वा दर आकारला जातो. त्यामुळे एसटीनं सुरक्षित तसंच कमी पैशांत प्रवासाची सुविधा महामंडळाचा देण्याचा प्रयत्न आहे.
ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सवलत
एसटीचं यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांना प्रवासात तिकीटाचा अर्धा आकार पडतो. त्यामुळे अतिरिक्त वाया जाणाऱ्या पैशांची बचत होणार आहे. तर 75 वर्षांवरच्या नागरिकांना एसटीचा प्रवास मोफत असणार आहे. 65 वर्ष वयावरील नागरिकांनाही अर्ध्या तिकीटात प्रवासाची मुभा आहे. या सवलतीमुळे प्रवाशांचा आणि वारीच्या काळात सर्वांचाच प्रतिसाद उत्तम मिळणार असून एसटीच्या महसुलात प्रचंड वाढ अपेक्षित आहे.
पथकरात सवलत
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 1 जून 2023ला एक बैठक झाली. यात आषाढी वारीसंदर्भात विविध विभागांना निर्देश देण्यात आले. त्यात एक महत्त्वाचा आदेश म्हणजे एसटी महामंडळ बसेसना करातून सूट होय. राज्यभरातून पंढरपूरकडे आता 5000 बसेस येणार आहेत. याशिवाय नियमित बसेसही आहेत. या सर्वांना पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व पथकर नाक्यांवर (टोल) पथकर माफी नसलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकरातून सूट मिळणार आहे. ज्ञानयोगी संकेतस्थळावर यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात 13 जून 2023ला परिपत्रक काढण्यात आलं.
एसटीचा महसूल वाढणार
राज्यभरातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविक तसंच वारकऱ्यांना संबंधित जिल्ह्यातल्या, शहरातल्या सर्व पोलीस ठाण्यानी, वाहतूक विभागातर्फे भाविकांच्या मागणीनुसार पथकर माफ म्हणजेच टोल फ्री पासचं वाटप करण्यात यावं, असं या आदेशात म्हटलं आहे. यामुळे टोलच्या अतिरिक्त शुल्कापासूनही वारकऱ्यांची सुटका होणार आहे. एकूणच यंदा एसटीचा महसूल दरवर्षीपेक्षा अधिक वाढणार आहे. 5 जुलैनंतरच यासंदर्भातली आकडेवारी समोर येईल.