All about stock dividend: शेअर बाजारात ट्रेडींग करताना किंवा शेअर बाजारासंबंधित वाचन, श्रवण करताना डेव्हिडंट, शेअर बायबॅक, स्टॉक स्प्लिट असे शब्द अनेकदा आपल्या कानी पडतात. मागच्या वर्षी, जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी लिस्टेड कंपनी अॅमेझॉनने (Amazon) आपला स्टॉक स्प्लिट केला. पण, हे स्टॉक स्प्लिट अर्थात विभाजन म्हणजे नेमके काय? गुंतवणूकदारांसाठी हे इतके विशेष का आहे? कंपन्या का आणि कशासाठी त्यांच्या स्टॉक स्प्लिट करतात? असे सगळे प्रश्न तुमच्याही मनात येत असतील, तर याच लेखातून आपण या सर्व प्रश्नांची समजून घेऊयात.
स्टॉक स्प्लिट म्हणजे काय? (What is a stock split?)-
स्टॉक स्प्लिट म्हणजे शेअर डिव्हिजन. सोप्या शब्दात सांगायचे तर, कोणत्याही एका शेअरचे दोन किंवा अधिक भाग करणे होय. स्टॉक स्प्लिटद्वारे, कंपन्या त्यांचे शेअर्स एकापेक्षा जास्त शेअर्समध्ये विभागले जातात. पण कंपन्या असे का करतात? तर यावर बाजारातील तज्ज्ञ विवेक नाडकर्णी सांगतात की, सहसा जेव्हा एखाद्या कंपनीचा शेअर खूप महाग असतो तेव्हा छोटे गुंतवणूकदार त्यात गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करतात. अशा परिस्थितीत, या छोट्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी, कंपनी स्टॉकचे विभाजन करते. बाजारातील मागणी वाढवण्यासाठी अनेक वेळा कंपन्या स्टॉक स्प्लिट करतात.
याचा शेअरधारकांना फायदा होता का? (Does it benefit shareholders?)-
जर एखाद्या कंपनीच्या स्टॉकचे मूल्यांकन जास्त झाले असेल तर स्टॉकचे दोन भाग केले जातात. एखाद्या कंपनीने स्टॉक स्प्लिट केल्यास, शेअरधारकांना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक शेअरसाठी एक अतिरिक्त शेअर दिला जातो. हे समभागधारकाच्या आधीपासून असलेल्या शेअर्सच्या संख्येच्या दुप्पट होतात. समजा एखाद्या शेअरहोल्डरकडे कंपनीचे 400 शेअर्स आहेत आणि कंपनीने स्टॉक स्प्लिट करून एका शेअरला दोन भागात वाटले तर, शेअरहोल्डरकडे कंपनीचे 800 शेअर्स होतील. तथापि, याचा त्याच्या गुंतवणुकीच्या मूल्यावर परिणाम होणार नाही. याचे कारण असे की, स्टॉक स्प्लिटसह, प्रत्येक शेअरचे मूल्य निम्मे होते, असे नाडकर्णी यांनी समजावले.
कंपनीवर काय परिणाम होतो? (What will be the effect on the company)-
स्टॉक स्प्लिटमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये तरलता (Liquidity) येते. लहान गुंतवणूकदारांचा कल शेअर्सकडे वाढतो. किंमत कमी असली तरी शेअर्समध्ये तेजी येण्याची शक्यता वाढते. अल्पावधीसाठी कंपनीचे शेअर चढत्या क्रमाने वर जाऊ लागतात. बाजारात कंपनीच्या शेअर्सची संख्या वाढते. तथापि, याचा कंपनीच्या बाजार भांडवलावर परिणाम होत नाही.
स्टॉक स्प्लिटमुळे कंपनीच्या शेअर्सची किंमत कमी होते. कंपनीने मूल्यांकनाच्या बाबतीत स्टॉक खूपच स्वस्त केला आहे. त्यामुळे लहान गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करणे सोपे जाते. अशा स्थितीत मागणी वाढली की शेअरचे भाव पुन्हा वाढतात. त्या स्टॉकमध्ये काही दिवस किंवा आठवडेतरी किमान वाढ दिसून येते.