Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट मार्गदर्शन: शेअर कधी विकायचे?

शेअर मार्केट मार्गदर्शन: शेअर कधी विकायचे?

कशी ओळखावी स्टॉक विकायची नेमकी वेळ... जाणून घ्या

शेअर बाजारात प्रवेश करणाऱ्या नवख्या मंडळीच्या मनात स्टॉक कधी विकायचा आणि लाभ कसा मिळवायचा असे अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. आपल्याला अभिमन्यूची गोष्ट माहितच असेल. चक्रव्यूह भेदण्याची कला त्याला ठावूक होती, मात्र तेथून बाहेर पडण्याचे तंत्र त्याच्याकडे नव्हते. अशी स्थिती स्टॉकमध्ये प्रवेश करतानाची असते. त्यामुळे चांगला परतावा मिळण्यासाठी योग्य वेळेची जाण असणे गरजेची आहे. ती कशी ओळखावी?

जेव्हा स्टॉकमध्ये मोठा बदल होतो

शेअरमध्ये चढउतार नेहमीच होत राहतात. काल उच्चांकी भाव असणारा शेअर काही आठवड्यात नीचांकी पातळीवर येतो आणि कालांतराने पुन्हा वधारतो. अशावेळी आपण खरेदी केलेल्या स्टॉकमधून चांगला परतावा देणारी स्थिती निर्माण झाली असेल तर त्यावेळी बाहेर पडणे हिताचे ठरते. कालांतराने त्या शेअरचा भाव पडल्यानंतर पुन्हा खरेदी करता येतो.

चांगला स्टॉक मिळतो तेव्हा

सध्याच्या स्टॉकपेक्षा एक चांगला स्टॉक मिळत असेल आणि तो सातत्याने चांगली कामगिरी करत असेल तर अशा वेळी त्या स्टॉकबाहेर पडणे महत्त्वाचे ठरते. महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याकडे गुंतवणुकीसाठी अतिरिक्त पैसा नसेल तर अशा वेळी जुना स्टॉक विकून चांगली कामगिरी करणार्या स्टॉककडे लक्ष द्यावे आणि संधी साधावी.

पैशाची गरज असताना

आपल्या बचत खात्यात पैसे ठेवण्यासाठी शेअर विकू नका. जेव्हा आपल्याला नवीन घर, मोटार, मुलांचे शिक्षण यासाठी पैशाची गरज असते, तेव्हाच शेअर्सची विक्री करावी. अर्थात, आपल्याला पैशाची गरज भासते तेव्हा स्टॉकमधून बाहेर पडण्याचा काळ चांगलाच असतो असे नाही.

घसरणाऱ्या फंडचे तंत्र

बाजारात खूप वाढ झाली आणि एक निश्चित पातळी गाठल्यानंतर वेगाने त्याची घसरण होते तेव्हा त्यास करेक्शन असे म्हणतात. उदा. शेअर बाजार सतत चार दिवस वाढत असेल आणि पाचव्या दिवशी घसरण होत असेल तर त्याला करेक्शन म्हणतात. वेळोवेळी बाजारात करेक्शन येत राहते. बाजार मजबुतीसाठी असे करेक्शन महत्त्वाचे ठरते. त्यामुळे आपण खरेदी केलेल्या शेअर्समध्ये सतत 4 ते 5 दिवस वाढ होत असेल तर चौथ्या दिवशी त्यातून बाहेर पडणे हितकारक ठरते. अर्थातच हा ढोबळ मानाने काढलेला अंदाज आहे, हे लक्षात ठेवावे.

हेही लक्षात ठेवा

बरेचदा कंपन्यांकडून डिव्हिडंड म्हणजे लाभांशाची घोषणा केली जाते. ही घोषणा होते तेव्हा आपल्याकडे त्या कंपनीचा समभाग असेल तरच तो लाभांश आपल्याला मिळतो. त्यामुळे आपण घेतलेले शेअर्स विकण्याचा निर्णय घेताना सदर कंपनीचा लाभांशाचा विचार नाही ना किंवा त्यांनी तशी घोषणा केलेली नाही ना याची खातरजमा करुन घ्या. ज्यादिवशी आपण शेअर विकणार आहात त्यादिवशी सदर कंपनीशी अथवा त्या क्षेत्राशी संबंधित सकारात्मक बातमी नाही ना याचीही खातरजमा करा. अन्यथा आपण विकल्यानंतर तो समभाग वाढू शकतो.

शक्यतो शेअरमध्ये केलेली गुंतवणूक ही दीर्घकालीन दृष्टिकोनातून करावी. तसे करण्याने अधिक लाभ पदरात पडतो. यासाठी आपल्या महिन्याच्या पगारातील ठरावीक रक्कम बाजूला काढत ती आपली नाही असे समजावे आणि त्यातून शेअर्स खरेदी करुन ठेवावेत. कालांतराने त्याचे मूल्य हमखास वाढलेले असते. मधल्या काळात आपल्याला डिव्हिडंड, बोनस शेअर यांचा लाभही मिळालेला असतो.