Smart Tips for Wealth Creation: नोकरी किंवा व्यवसाय करत असताना प्रत्येकाला एक ठराविक उत्पन्न मिळत असते. मात्र, मागील काही दिवसांपासून तुम्ही पाहत आहात की अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रात अस्थिरता निर्माण झाली आहे. उद्योग व्यवसायांमध्ये मंदी, स्पर्धा वाढत आहे, परिणामी कंपन्यांकडून नोकरकपात सुरू आहे. महागाईसुद्धा वेगाने वाढत आहे. त्यामुळे तुमचे उत्पन्न जरी वाढले असले तरी खर्च करण्यासाठी कमी पैसा राहत असेल. बाजारातील अस्थिरतेमुळे अनेक कंपन्या पगारवाढही कमी करत आहेत. अशा परिस्थितीत योग्य गुंतवणूक करून संपत्ती निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. तुम्ही दीर्घकाळातील गुंतवणुकीतून 40% पर्यंत संपत्ती वाढवू शकता.
तुमच्या भविष्याचे आणि कुटुंबाचे नियोजन करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा तीन मुद्दे लक्षात घ्यायला हवे. एक म्हणजे तुम्ही आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यासाठी काय नियोजन केले आहे? दुसरे म्हणजे तुमची बचत किती आहे आणि ती कुठे गुंतवली आहे, जी तुम्हाला लगेच मिळेल. तिसरे म्हणजे दीर्घकालीन, मध्यम, अल्पकालीन गुंतवणुकीचे नियोजन तुम्ही कसे केले आहे.
आणीबाणीच्या परिस्थितीचे नियोजन कसे कराल?
तुमचे आणि कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विमा ही अत्यावश्यक बाब आहे. अन्यथा आणीबाणीच्या काळात तुम्हाला बचतीमधून पैसे खर्च करण्याची वेळ येईल. आरोग्यावरील खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा पुरेसा आरोग्य विमा असणे अत्यंत गरजेचे आहे. काही हजारांच्या प्रिमियमध्ये तुम्ही लाखो रुपयांचे संरक्षण मिळवू शकता. कोणतीही आणीबाणी सांगून येत नाही. अनेक जण विमा घेण्यास टाळाटाळ करतात.
अचानक जर कुटुंबियांवर किंवा तुमच्यावर रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली आणि विमा नसेल तुम्ही अडचणीत येऊ शकतात. अनेकांकडे पुरेसा आणीबाणी फंड नसतो. अशा वेळी नातेवाईकांकडे पैसे मागण्याची वेळ येते. त्यापेक्षा विमा फायद्याचा ठरतो. तसेच कमावत्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स असणे गरजेचे आहे. अकाली मृत्यू झाल्यास कुटुंबियाना आर्थिक मदत होईल. तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या दहा पट जीवन विमा असावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात. त्यानुसार तुम्ही योग्य टर्म इन्शुरन्स घ्यावा. असे करताना प्युअर टर्म प्लॅन घ्यावा. गुंतवणूक प्लॅन त्यामध्ये समाविष्ट करु नये. युलिप, एनडाऊमेंट योजनांतील गुंतवणूक टाळलेले योग्य राहील.
स्टॉक आणि म्युच्युअल फंडमध्ये किती जोखीम घ्यावी?
स्टॉक आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना जोखीम किती घ्यावी, हे अनेकांना समजत नाही. त्यासाठी तुम्ही एक फॉर्म्युला वापरू शकता. हा फॉर्म्युला अनेक गुंतवणूक तज्ज्ञ सांगतात. 100 वजा तुमचे वय. उदाहरणार्थ, तुमचे वय 30 असेल तर 100-30 म्हणजेच 70% रक्कम तुम्ही इक्विटीमध्ये गुंतवू शकता. जसे वय वाढत जाते तसे जोखीम घेण्याची क्षमता कमी होत जाते. उतार वयात सुरक्षित पर्यायांत केलेली गुंतवणूक योग्य ठरेल. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमधील जोखीम कमी करण्यासाठी तुम्ही रेडिमेड बास्केटमध्ये किंवा पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करू शकता. विविध गुंतवणूक कंपन्यांची अशी अॅप्स बाजारात उपलब्ध आहेत. एकाच क्षेत्रात गुंतवणूक न करता कंपन्यांमध्ये क्षेत्रांमध्ये विविधता ठेवली तर जोखीम कमी होते.
म्युच्युअल फंड
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून तुम्ही दीर्घकाळात चांगला परतावा मिळवू शकता. ब्रोकर, अॅग्रीगेटरकडून म्युच्युअल फंड योजना घेण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट पद्धतीने थेट अॅसेट मॅनेजमेंट कंपनीत गुंतवणूक केलेली योग्य राहील. कारण, ब्रोकर आणि थर्ट पार्टीला तुम्हाला 1 ते 2% द्यावे लागते. हे शुल्काचे पैसे वाचतील. एक दोन टक्के कमी वाटत असले तरी दीर्घकाळातील गुंतवणुकीत ही रक्कम मोठी असू शकते. त्यामुळे स्वत: अभ्यास करून गुंतवणूक करा.
ऑटो स्वीप फॅसिलिटी
जर तुम्ही पैसे बचत किंवा चालू खात्यामध्ये ठेवत असाल तर ऑटो स्वीप फॅसिलिटी वापरा. याद्वारे तुमच्या बचत खात्यातील पैशांवर पाच ते सहा टक्के व्याज मिळू शकते. ऑटो स्वीपमुळे तुमचे खाते मुदत ठेवींसारखे काम करते. तसेच तुम्ही खात्यातून कधीही पैसे काढू शकता.
शेअर मार्केटमधील गुंतवणूक
Stock lending and borrowing पद्धतीद्वारे तुम्ही शेअर्समधून व्याजही कमावू शकता. 10% पर्यंत व्याज यातून मिळू शकते. तसेच चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करून तुम्ही संपत्ती निर्माण करू शकता. तात्पुरत्या शेअर बाजारातील चढउताराकडे दुर्लक्ष करून विविध क्षेत्रातील चांगल्या कंपन्या निवडून तुम्ही गुंतवणूक करू शकता.
सोन्यातील गुंतवणूक
भारतीयांकडून सोने खरेदीली खूप महत्त्व दिले जाते. मात्र, दुकानात जाऊन सोने खरेदी करण्याशिवाय डिजिटल आणि सॉव्हरिन गोल्ड असे पर्यायही तुमच्याकडे उपलब्ध आहेत. यातील डिजिटल गोल्ड पद्धतीद्वारे सोने खरेदी फायद्याची ठरत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. कारण यावर विविध शुल्क लागू केलेले असतात. त्याऐवजी सॉवरिन गोल्ड (सार्वभौम गोल्ड) बाँडमधील गुंतवणूक फायद्याची ठरते. जर तुम्ही 1 लाख रुपयांचे सॉवरिन गोल्ड बाँड खरेदी केले तर त्यावर तुम्हाला अडीच टक्के व्याजही मिळू शकते.
निवृत्तीनंतरचे नियोजन
तरुण वयातच निवृत्तीचे नियोजन सुरू करायला हवे. पहिली नोकरी लागल्यानंतर राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक सुरू करायला हवी. भविष्य निर्वाह नधी (PF) पेक्षा तीन ते चार टक्के जास्त व्याजदर NPS योजनेतील गुंतवणुकीतून मिळू शकतो. ही रक्कम तुम्हाला निवृत्तीनंतरचे खर्च भागवण्यासाठी कामाला येईल.
(डिसक्लेमर: शेअर बाजार/म्युच्युअल फंड, SIP मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)