केंद्र सरकारने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना सरत्या वर्षात खूशखबर दिली. सरकारने अल्प बचतीच्या योजनांच्या व्याजदरात वाढ केली. पोस्टाच्या बचतीच्या योजनांपासून ज्येष्ठ नागरिकांच्या गुंतवणूक योजनांचा व्याजदर 1.10% पर्यंत वाढवण्यात आला आहे. महागाईने हैराण झालेल्या गुंतवणूकदारांना यामुळे दिलासा मिळाला.
अल्प बचत योजनांचे नवे व्याजदर जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीसाठी लागू होतील. रिझर्व्ह बँकेने महागाई नियंत्रणासाठी मागील वर्षभरात रेपो दरात वाढ केली होती. त्यामुळे बँकांनी देखील कर्जदर आणि ठेवीदरांत वाढ केली होती. आता केंद्र सरकारने याला अनुसरुन अल्प बचतीच्या योजनांचा दर वाढवला आहे.
एक वर्ष मुदतीच्या ठेवींचा व्याजदर आता 6.6% इतका झाला आहे. यापूर्वी तो 5.5% इतका होता. पाच वर्षांच्या मुदत ठेवींचा व्याजदर 7.0% इतका वाढवण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनेच्या व्याजदरात 0.4% वाढण्यात आला. जेष्ठांना बचतीमधून 8.0% व्याज मिळणार आहे. पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेचा व्याजदर वाढवण्यात आला आहे. पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेवर आता 7.1% व्याज मिळणार आहे. यापूर्वी तो 6.6% होता.
राष्ट्रीय बचत पत्रावर आता 7.0% आणि किसान विकास पत्रामधील गुंतवणुकीवर 7.2% व्याज दिले जाणार आहे. किसान विकास पत्राचा गुंतवणूक कालावधी 120 महिने करण्यात आला आहे. यापूर्वी तो 123 महिने होते. अल्प बचतीचे सुधारित व्याजदर 1 जानेवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीसाठी लागू असतील, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.
सुकन्या समृद्धी आणि पीपीएफ योजनांबाबत व्याजदर जैसे थे
अल्प बचतीच्या योजनांचे व्याजदर वाढवले असले तरी सुकन्या समृद्धी योजना आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)चा व्याजदर जैसे थेच ठेवले आहे. सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर 7.6% कायम आहे. पीपीएफचा व्याजदर 7.1% ठेवण्यात आला आहे. पीएफवर गेल्या वर्षी 8.1% व्याजदर होता. चालू आर्थिक वर्षासाठी पीपीएफवर अजून व्याजदर ठरवण्यात आलेला नाही. गेल्या वर्षाच्या तुलेनत व्याजदर कमी असल्याने पीएफ धारकांची निराशा झाली.