बँकांची कर्जे महाग होत असतानाचा सामान्य गुंतवणूकदारांना देखील आता गुंतवणुकीवर जादा व्याज मिळणार आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी 31 मार्च 2023 रोजी अल्प बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट,किसान विकास पत्र, पोस्टाच्या बचत योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ठेव योजना आणि सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 0.70% ने वाढवण्यात आला आहे. 1 एप्रिल ते 30 जून या तिमाहीसाठी सुधारित व्याजदर लागू होतील, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. यापूर्वी जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी अल्प बचतीच्या योजनांचा व्याजदर 0.20% ते 1.10% वाढवण्यात आला होता.
देशातील वाढती महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरवाढीचा सपाटा लावला आहे. यामुळे बँकांच्या सर्वच कर्जांच्या व्याजदरात वाढ झाली. दुसऱ्या बाजूला बँकांनी ठेवींचे व्याजदर देखील वाढवले आहेत. परिणामी सरकारला देखील अल्प बचत योजनांच्या व्याजदरात वाढ करावी लागली आहे. पोस्टातील बहुतांश योजना या कर बचतीसाठी देखील महत्वाच्या आहेत. सलग दुसऱ्या तिमाहीत व्याजदर वाढल्याने महागाईने हैराण झालेल्या गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला.
अल्प बचत योजनांचे नवे व्याजदर 1 एप्रिल 2023 ते 30 जून 2023 या तिमाहीसाठी लागू होतील. पोस्टातील एक वर्ष मुदतीच्या ठेवींचा व्याजदर आता 6.8% इतका वाढला आहे. त्यात 0.20% वाढ झाली.यापूर्वी तो 6.6% इतका झाला आहे. 2 वर्षांच्या ठेवींवर आता गुंतवणूकदारांना 6.9% व्याज मिळणार आहे. 3 वर्षांसाठी ठेवींवरील व्याजाचा दर 7% असेल. 5 वर्षांच्या मुदत ठेवींचा व्याजदर 7.50% इतका वाढवण्यात आला आहे. त्यात थेट 0.5% वाढ करण्यात आली.
ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनेच्या व्याजदरात 0.20% वाढण्यात आला. जेष्ठांना आता बचतीमधून 8.20% व्याज मिळणार आहे. हा व्याजदर तिमाही स्तरावर दिला जाईल. पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेचा व्याजदर 1 एप्रिल 2023 पासून 7.4% व्याज मिळणार आहे. यापूर्वी तो 7.1% होता. त्यात 0.30% करण्यात आली.
राष्ट्रीय बचत पत्रामधील (National Savings Certificate VIII Issue) गुंतवणूक आता आणखी आकर्षक झाली आहे. सरकारने या गुंतवणुकीचा व्याजदर 7.70% इतका वाढवला आहे. त्यात 0.70% वाढ केली आहे. जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीसाठी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर 7% व्याज मिळत होते.
किसान विकास पत्रामधील गुंतवणुकीवर 7.5% व्याज दिले जाणार आहे.किसान विकास पत्राचा गुंतवणूक कालावधी 115 महिने करण्यात आला आहे. यापूर्वी तो 120 महिने होते.मुलींच्या भविष्याकरिता केल्या जाणाऱ्या गुंतणुकीवर आता जादा व्याजदर मिळेल. सरकारने सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8% केला आहे. 1 ऑक्टोबर 2022 ते 31 मार्च 2023 असा सलग दोन तिमाही सुकन्या समृद्धी योजनेतील व्याजदर 7.6% स्थिर ठेवण्यात आला होता.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर पुन्हा एकदा जैसे थे
अल्प बचतीमधील महत्वाची गुंतवणूक योजना असलेल्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)चा व्याजदर पुन्हा एकदा 7.1% वर जैसे थेच ठेवले आहे.पीपीएफचा व्याजदर 1 ऑक्टोबर 2022 पासून 7.1% इतका आहे. पीएफवर गेल्या वर्षी 8.1% व्याजदर होता. नुकताच पार पडलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या(EPFO) विश्वस्तांच्या बैठकीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) वर्ष 2022-23 साठी 8.15% व्याजदर देण्याची शिफारस सरकारकडे करण्यात आली आहे.