SIP Investment: म्युच्युअल फंड योजनांमधील जवळपास 19 म्युच्युअल फंड योजनांनी मागील 5 वर्षात सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅनमधून (SIP) गुंतवणूकदारांना जवळपास 20 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 34.24 टक्के परतावा हा क्वांट स्मॉल कॅप फंडने (Quant Small Cap Fund) दिला आहे. त्यानंतर तेवढ्याच कालावधीत निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंडने 26.20 टक्के परतावा दिला आहे.
म्युच्युअल फंड योजनांमध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये गुंतवणूक करता येते. यात प्रामुख्याने कंपन्यांच्या भांडवली आकारमानानुसार लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप असे तीन प्रकार पडतात. यातील स्मॉल कॅप योजनांमधील म्युच्युअल फंड कंपन्यांनी मागील 5 वर्षात चांगला परतावा दिला आहे. जवळपास 11 स्मॉल कॅप फंडांनी 20 ते 34 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. स्मॉल कॅप फंडमध्ये क्वांट सह निप्पॉन, कोटक स्मॉल कॅप, एचएसबीसी स्मॉल कॅप, आयसीआयसीआय प्रुडेन्टिशिअल स्मॉल कॅप, डीएसपी स्मॉल कॅप, युनिअन आणि फ्रॅन्कलिन फंड हाऊसच्या स्मॉल कॅपने चांगला परतावा दिला आहे. तर इतर स्किमने एसआयपीच्या माध्यमातून जवळपास 20 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिल्याचे दिसून आले आहे. यामध्ये मिड कॅप फंड, मल्टी कॅप, ईएलएसएस, कॉन्ट्रा फंड आणि फ्लेक्सी कॅप फंडचा समावेश आहे.
वर नमूद केलेल्या म्युच्युअल फंड योजनांनी दिलेला परतावा हा मागील 5 वर्षातील आहे. म्हणजेच इक्विटी मार्केटमध्ये एसआयपीच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक ही चांगला परतावा देऊ शकते, असे यातून दिसून येते.
एसआयपी म्हणजे काय?
एसआयपी म्हणजे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ज्याला मराठीत पद्धतशीर गुंतवणूक योजना म्हणतात. या योजनेद्वारे गुंतवणूकदार नियमित पद्धताने म्हणजे प्रत्येक दिवशी, आठवड्याला, महिन्याला, 3 किंवा 6 महिने किंवा 1 वर्षाने गुंतवणूक करू शकतो. एसआयपीमुळे किमान रकमेसह गुंतवणूक करता येते. त्यात जोखीम सुद्धा तुलनेने कमी होते. तसेच एसआयपीमुळे Compounding Interest चा गुंतवणूकदाराला लाभ मिळतो.
(डिसक्लेमर: शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. ‘महामनी’ वेबपोर्टल शेअर्स, म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)