विधानसभा निवडणुकीत भाजपची लाट रोखत कॉंग्रेसला सत्तेत आणणाऱ्या दोन ज्येष्ठ नेत्यांकडे कर्नाटकाचे नेतृत्व सोपणवण्याचा निर्णय कॉंग्रेस पक्ष श्रेष्ठींनी घेतला आहे. लवकरच कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के शिवकुमार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. कॉंग्रेसचे दोन्ही पॉवरफुल नेते अशी ओळख असलेल्या सिद्धरामय्या आणि डी.के शिवकुमार हे संपत्तीच्याबाबतीत देखील ताकदवान आहेत.
सिद्धरामय्या आणि डी.के शिवकुमार यांनी यापूर्वी कर्नाटकच्या मंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री असलेले सिद्धरामय्या प्रदेशचे सर्वात जुने अनुभवी नेते आहेत. ते वरुणा मतदार संघातून निवडून आले आहेत. सिद्धरामय्या यांना 60% मते मिळाली. सिद्धरामय्या हे लवकरच कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
संपत्तीचा विचार केला तर एकदा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या सिद्धरामय्या यांच्याकडे एकूण 51 कोटींची संपत्ती आहे. (Siddaramaiah NetWorth) त्यांची पत्नी पार्वती यांच्याकडे 21 कोटींची संपत्ती आहे. सिद्धरामय्या यांच्याकडे 9 कोटींची स्थावर मालमत्ता असून पत्नीकडे 20 कोटींची प्रॉपर्टी आहे. निवडणूक शपथपत्रानुसार सिद्धरामय्या आणि त्यांच्या कुटुंबावर 23 कोटींचे कर्ज आहे.
सिद्धरामय्या यांनी विविध बिझनेसमधून उत्पन्न येत असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या पत्नी पार्वती या प्रसिद्ध वायएस डायग्नोस्टीक प्रा. लि च्या संचालक असून दोन कंपन्यांमध्ये पार्टनर आहेत.
कर्नाटक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के शिवकुमार हे कनकपुरा मतदार संघातून विक्रमी मतांनी निवडून आले आहेत. यंदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रानुसार शेती आणि बिझनेस हे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असल्याचे म्हटले आहे.
शिवकुमार यांची एकूण संपत्ती 1413 कोटी इतकी आहे.(DK Shivakumar NetWorth) सिद्धरामय्या यांच्या तुलेनत डी. के शिवकुमार यांची संपत्ती 2800% पेक्षा जास्त आहे. डी.के शिवकुमार सर्वाधिक श्रीमंत राजकीय नेत्यांपैकी एक ओळखले जातात. डी.के शिवकुमार यांची 12 बँक अकाउंट्स आहेत. डी.के शिवकुमार यांच्यावर 225 कोटींचे कर्ज आहे.
शिवकुमार यांच्या नावे 8.3 लाखांची इनोव्हा कार आहे. डी. के शिवकुमार यांच्या नावे एकूण 1214.93 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. त्यांची पत्नी उषा यांच्या नावे 113.38 कोटींची संपत्ती आहे. मुलगा आकाश याच्या नावे 54.33 कोटींची संपत्ती आहे. वर्ष 2014-2018 या वर्षात कर्नाटकात कॉंग्रेस सत्तेत होती.तेव्हा डी. के शिवकुमार यांनी वेगवेगळ्या खात्यांचे मंत्रिपद भूषवले होते.
पाच वर्षात शिवकुमार यांची संपत्ती प्रचंड वाढली
डी. के शिवकुमार यांच्या संपत्तीत मागील पाच वर्षात 68% ने वाढ झाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार डी. के शिवकुमार आणि त्यांच्या कुंटुंबाची एकूण संपत्ती 1413 कोटी इतकी आहे. 2013 मध्ये शिवकुमार यांच्याकडे एकूण 251 कोटींची संपत्ती होती. वर्ष 2018 मध्ये त्यांच्या संपत्तीत दुपटीने वाढ झाली. त्यांनी सादर केलेल्या निवडणूक शपथपत्रानुसार त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती 840 कोटी इतकी होती.