Used Car Loan Interest rate: वाहन खरेदी जोमात असून नव्या कारसोबत जुन्या कार खरेदी-विक्रीचे मार्केटही तेजीत आहे. पुणे, मुंबई, दिल्लीसह देशातील आघाडीच्या शहरात हा ट्रेंड आहे. जुनी कार खरेदी करायचा विचार करत असाल तर कार लोन मिळेल. मात्र, नव्या कार लोनच्या तुलनेत जुन्या कार लोनवर जास्त व्याजदर आकारले जाते.
नव्या कारच्या तुलनेत जुन्या कारची किंमत कमी झालेली असते. तसेच कारचा घसारा आणि रिसेल व्हॅल्यूही कमी झाल्याने बँक जास्त व्याज आकारते. तसेच कर्जफेडीचा कालवधीही 5 वर्ष इतका ठेवते. त्यामुळे ओल्ड कार लोन हे जास्त आकर्षक ठरत नाहीत. तसेच जुनी कार खरेदीसाठी कार लोन घेण्यापेक्षा इतर काय पर्याय आहे ते सुद्धा या लेखात पाहूया.

जुन्या कार खरेदीसाठी लोन घेण्याचे तोटे?
जास्त व्याजदर म्हणजे जास्त इएमआय?
जुनी कार लोनवर घेताना बँक जास्त व्याजदर आकरते. त्यामुळे कर्जदारील EMI चा बोजाही वाढतो. सोबतच इतर शुल्कही कर्ज मंजूर होताना लागू होतात. सर्वसाधारणपणे 9.25% पासून पुढे जुन्या कारवरील व्याजदर सुरू होतात. काही बँका तर 16% पेक्षा जास्त व्याजदर आकारतात.
किती टक्के कर्ज मंजूर होऊ शकते?
नवी कार घेताना 85 टक्क्यांपासून ते 100% पर्यंत लोन मंजूर होऊ शकते. म्हणजेच तुम्ही 12 लाख रुपयांची नवी कार घेताना 12 लाख रुपये कर्ज मंजूर होऊ शकते. मात्र, जुनी कार लोनवर खरेदी करताना 60% ते 85% पर्यंत कर्ज मिळते. त्यामुळे उर्वरित रक्कम तुम्हाला खिशातून घालावी लागेल.
कमी कालावधी
जुन्या कार खरेदीसाठी लोन घेताना कर्जफेडीचा कालावधी कमी मिळतो. 5 वर्षापर्यंतचा कालावधी मिळतो. काही ठराविक बँका ओल्ड कार लोनचा कालावधी 5 वर्षांपेक्षा जास्त देतात. नवी कार खरेदी करत असताना कर्जफेडीचा कालावधी 7 वर्षांपेक्षाही जास्त मिळू शकतो.
बँक जास्त व्याजदर का आकारते?
कार लोन हे सुरक्षित प्रकारातील कर्ज आहे. जर तुम्ही कर्ज फेडले नाही तर बँक कार जप्त करू शकते. नव्या कारचे कर्ज थकले तर बँक कार लिलावात विकून पैसे काढून घेईल. मात्र, जुन्या कारचा आधीच घसारा झालेला असतो. अशा कारचे कर्ज थकले तर कार विकूनही कर्जाची रक्कम मिळेल की नाही, याची शाश्वती नाही.
जुनी कार खरेदी करताना कार लोनशिवाय इतर पर्याय काय?
जुनी कार खरेदी करताना बँक जास्त व्याजदर आकारते. त्यामुळे प्रत्येक वेळी ओल्ड कार लोन फायदेशीर ठरेल असे नाही. त्यामुळे तुम्ही वैयक्तिक कर्ज घेवूनही जुनी कार खरेदी करू शकता. हा व्याजदर कमी ओल्ड कार लोनपेक्षा कमी असू शकतो. तसेच मुदत ठेवी, म्युच्युअल फंड, गोल्ड लोनवर तुम्ही कर्ज घेऊ शकता. त्याचा व्याजदरही कमी असू शकतो.
टीप - वर दिलेले विविध बँकाचे व्याजदर जुलै 2023 महिन्यातील आहेत. व्याजदरात बदल होऊ शकतो. अधिक माहितीसाठी बँकेशी संपर्क साधा.