SCSS Account: ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) गुंतवणुकीवरील व्याजदर केंद्र सरकारने एप्रिल महिन्यापासून वाढवले आहेत. एप्रिल 2023 पासून गुंतवणूक करणाऱ्यांना 8.2% दराने परतावा मिळेल. ज्या ज्येष्ठ नागरिकांनी जानेवारी 2022 ला SCSS योजनेत गुंतवणूक केली होती त्यांना 7.4% व्याजदराने परतावा मिळत आहे. जास्त परतावा मिळण्यासाठी जुने SCSS चे खाते बंद करून नवे खाते सुरू करावे का? असा सवाल ज्येष्ठ नागरिकांतून विचारला जात आहे.
जुने खाते बंद करुन नवे सुरू करावे का?
उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने मागील वर्षी जानेवारी महिन्यात SCSS योजनेत 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर आतापर्यंत प्रत्येक तिमाहीत 27,750 रुपये व्याज मिळाले असेल असे समजू. म्हणजेच आत्तापर्यंत (27750 रुपये×5) 1,38,750 रुपये व्याज मिळाले असेल. मात्र, आता SCSS योजनेवरील व्याजदर वाढवल्यामुळे नव्याने खाते सुरू करणाऱ्यांना जास्त परतावा मिळेल. जुने खाते बंद करायचे असल्यास किती शुल्क लागू होते ते पाहूया.
वरील उदाहरणाचा विचार करता ज्यांनी जानेवारी 2022 मध्ये SCSS मध्ये 15 लाख रुपये गुंतवणूक केली आहे. त्यांनी जर आता खाते बंद करण्याचा विचार केला तर या गुंतवणुकीवर 1.5% दंड लागू होईल. म्हणजेच 15 लाखांवर खाते बंद करण्याचे शुल्क 22,500 रुपये द्यावे लागेल. मात्र, जर नव्याने खाते सुरू करून पुढील पाच वर्षात जास्त फायदा होणार असेल तर खाते बंद करावे की नाही? हा प्रश्न उभा राहतो.
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या व्याजदरात आता वाढ झाली आहे. त्यामुळे नव्याने खाते सुरू करून जास्त फायदा होणार असेल तर नागरिकांनी जुने खाते बंद करावे, असा सल्ला जाणकार देतात. एक वर्षापेक्षा जास्त आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी झाला असेल तर खाते बंद करताना 1.5% दंड आकारला जातो. मात्र, जुने खाते बंद केल्यास नव्या खात्यावर 8.2 टक्के व्याजदर मिळेल तसेच 0.80% अतिरिक्त व्याजदर देखील मिळेल. अशा परिस्थितीत जुने खाते बंद केले तर पुढील दोन वर्षात दंडाची रक्कम भरून निघेल, असे आर्थिक सल्लागारांचे मत आहे.
दीड लाख रुपयापर्यंतच्या SCSS खात्यातील गुंतवणुकीवर आयकर कायद्यातील 80C कलमानुसार कर वजावट मिळते. मात्र, ज्येष्ठ खातेदाराने कर वजाटीसाठी आधीच दावा केला असेल तर जुन्या खात्यात दीड लाख रुपये रक्कम ठेवून साडेतेरा लाख रुपये नव्या खात्यात गुंतवता येतील, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
SCSS योजनेंतर्गत 2020 सालापासून मिळणारे व्याजदर
सिनियर सिटिझन सेविंग स्कीमधील गुंतवणुकीवर सप्टेंबर 2020 ते डिसेंबर 2022 दरम्यान 7.4% व्याजदर मिळत होता. मात्र, ऑक्टोबर 2022 ते मार्च 2023 दरम्यान व्याजदर 8% झाला. मात्र, नव्याने सुरू झालेल्या आर्थिक वर्षात व्याजदर 8.2% करण्यात आला आहे. दर तीन महिन्यांनी सरकार या योजनेवरील व्याजदराचा आढावा घेते.
SCSS खाते कायमचे बंद करण्यासाठी दंड किती? (SCSS Premature Closure Penalty)
- SCSS योजनेच्या नियमानुसार 5 वर्षाच्या मॅच्युरिटी (परिपक्वता) आधी खाते कधीही बंद करता येऊ शकते. मात्र, खाते बंद करताना दंड आकारला जातो.
- 1 वर्षाच्या आत खाते बंद केले तर गुंतवणुकीवर काहीच व्याज मिळत नाही. (SCSS account closer charges) जर काही व्याज मिळाले असेल तर खाते बंद करताना व्याजही कापून घेतले जाते.
- एक वर्षानंतर पण 2 वर्षांच्या आत खाते बंद करत असाल तर मूळ गुंतवणुकीच्या 1.5 % रक्कम दंडापोटी कापून घेतली जाईल.
- 2 वर्षानंतर मात्र, 5 वर्षाआधी खाते बंद करत असाल तर गुंतवणुकीच्या 1% रक्कम कापून घेतली जाईल.
- SCSS खाते 5 वर्षानंतर परिपक्व होत असले तरी आणखी तीन वर्षापर्यंत खात्याची मुदत वाढवता येते. मुदत वाढ घेतल्यानंतर 1 वर्षांनी कोणत्याही दंडाशिवाय खाते बंद करता येईल.