Mutual Fund Investment Rules Update: म्युच्युअल फंडमध्ये अल्पवयीन मुलांच्या नावे गुंतवणूक करण्यासंदर्भात सेबीने आपल्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. हा नवीन नियम 15 जूनपासून लागू होणार आहे. एखादा पालक किंवा कायदेशीर पालक आता 15 जूनपासून त्याच्या स्वत:च्या बॅंकेच्या खात्यातून आपल्या मुलांसाठी म्युच्युअल फंड स्कीममध्ये पैसे गुंतवू शकणार आहे.
सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) आपल्या 2019च्या परिपत्रकात सुधारणा केली आहे. या नवीन सुधारणेनुसार आता पालकांना 15 जून, 2023 पासून आपल्या स्वत:च्या बॅंक खात्यातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. सेबीने याबाबत म्युच्युअल फंड हाऊस कंपन्यांना 15 जूनपासून अशापद्धतीने बदल करण्याच्या सूचना दिल्याआहेत.
गुंतवणूकदारांच्या हक्कांसाठी सेबीचा नेहमीच हस्तक्षेप
गुंतवणूकदारांचे सर्वप्रकारे संरक्षण करणे, हा सेबीचा मूळ हेतू आहे. त्यानुसार सेबी वेळोवेळी ग्राहकांच्या हक्कांसाठी नियमांमध्ये बदल सुचवत असते. त्यानुसार आता पालकांना आपल्या मुलांच्या नावे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मुलांचे खाते काढावे लागणार नाही. पालक त्यांच्या खात्यातून मुलांच्या नावे गुंतवणूक करू शकतात. ही गुंतवणूक करत असताना सेबीने पालकांना विविध पेमेंट मोड्सचा वापर करण्याचीह सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
रिडिम केलेले पैसे मुलांच्या खात्यात जमा होणार
नवीन नियमानुसार आता मुलांच्या नावे गुंतवणूक करण्यासाठी त्यांचे बॅंक खाते गरजेचे नाही. पण मुलांच्या नावावर असलेले पैसे काढण्यासाठी मात्र त्या मुलाचे बॅंकेत खाते असणे बंधनकारक करण्यात आले आहे. गुंतवणूक केलेले पैसे हे आता त्या मुलाच्या नावे असलेल्या खात्यातच जमा होणार आहेत. सेबीने आपल्या 2019च्या परिपत्रकात याबाबत सुधारणा केली असून, तशा सूचना सर्व म्युच्युअल फंड हाऊस कंपन्यांना देण्यात आलेल्या आहेत.
सेबीने अल्पवयीन मुलांच्या नावे बचत करताना एकाचवेळी दोन गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. अल्पवयीन मुलांच्या नावाने बचत करताना पालकांनी त्यांच्या बॅंकेतून ही गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे अल्पवयीन मुलांचे गुंतवणुकीसाठी बॅंक खाते काढण्याची गरज आता उरली नाही. पण त्याचवेळी ही गुंतवणूक दीर्घकाळ व्हावी किंवा या गुंतवणुकीचा लाभ ज्याच्या नावाने केली आहे. त्याला मिळावा. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी अल्पवयीन मुलांच्या नावे केलेली गुंतवणूक ही काढताना पालकांच्या खात्यात जमा होणार नाही. ती गुंतवणूक रिडीम करण्यासाठी पालकांना मुलाचे बॅंक खाते ओपन करून त्यातच ती रक्कम जमा करावी लागणार आहे.
अशाप्रकारे सेबीने मुलांच्या नावे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या पालकांसाठी नियमांमध्ये बदल केला आहे आणि हा बदल 15 जून 2023 पासून लागू होणार आहे.