क्रिकेटच्या मैदानावरचा भारताचा यशस्वी कर्णधार, भारतीय संघाला एक नवी ओळख मिळवून देणारा 'दादा'गिरी करणारा कर्णधार म्हणून सौरव गांगुलीकडे पाहिलं जातं.भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणूनही सौरव गांगुलीला ओळखलं गेलं आहे. आता मात्र हाच दादा क्रिकेटव्यतिरिक्त एका नव्या क्षेत्रात दादागिरी करण्यास सज्ज झाला आहे. नुकतीच याची घोषणाही सौरव गांगुलीने केली आहे. आता तो ज्या मैदानात आपला जम बसवू पाहाणार आहे तिथे टाटा आणि मित्तल यांची आधीच मक्तेदारी पाहायला मिळतेय.
Table of contents [Show]
सध्या सौरव गांगुली स्पेनच्या माद्रिद इथं आहेत. तिथेच त्यांनी बंगाल बिझनेस समिटच्या वेळेस आपल्या नव्या इनिंगची घोषणा केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही तिथं गेल्या आहेत. किंबहुना ममता बॅनर्जी यांच्यासोबत गेलेल्या शिष्टमंडळात सौरव गांगुली यांचाही समावेश आहे.ममता बॅनर्जी आपल्या राज्यात म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये जास्तीत जास्त रोजगार आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्या १२ दिवसांच्या स्पेन आणि दुबई दौऱ्यावर आहेत.
कोणत्या क्षेत्रात गांगुली रोवणार पाय?
बंगाल बिझनेस समिटच्या वेळेस गांगुली यांनी आपण स्टील इंडस्ट्रीत पदार्पण करत असल्याचं जाहीर केलं.म्हणजेच आता गांगुली थेट टाटा आणि मित्तल यांच्याशी स्पर्धा करणार आहेत. सौरव गांगुली यांच्या म्हणण्यानुसार ते पश्चिम बंगालमधल्या मेदीनीपूर जिल्ह्यातल्या सालबोनी इथं एक स्टील फॅक्टरी उभी करणार आहेत.
हा काही पहिलाच प्लांट नाही-गांगुली
सौरव गांगुली यांनी या दरम्यान एक गोष्ट मात्र स्पष्ट केली की ते या उद्योग क्षेत्रात पहिल्यादा प्रवेश करत नाहीत. गांगुली यांचं कुटुंब उद्योगपतींचं कुटुंब म्हणून ओळखलं जातं. गांगुली परिवाराने आजपासून साधारण 55 वर्षांपूर्वीच स्टील उद्योगात झेप घेतली होती. सध्या गांगुली जो स्टील प्लांट टाकण्याची घोषणा करत आहेत तो त्यांच्या परिवाराचा तिसरा प्रकल्प असणार आहे.याचं काम येत्या 6-7 महिन्यात सुरू होणार असून त्यानंतर साधारणपणे एका वर्षात हा प्लांट बनून तयार होईल.
किती आहे सौरव गांगुलीचा आजचा नेटवर्थ?
क्रिकेट कप्तान असताना सौरव गांगुली जाहीरात क्षेत्रातही आघाडीवर होता. एक सर्व्हेनुसार सौरव गांगुलीचं आजचं नेटवर्थही 85 मिलियन डॉलर्स म्हणजेच 700 कोटी रुपये इतकं आहे.