चलन बाजारात आज सोमवारी 14 ऑगस्ट 2023 रोजी डॉलरसमोर रुपयात अवमूल्यन झाले. रुपयाने आज 83 ची पातळी ओलांडली. डॉलरसमोर रुपयाचे मूल्य 29 पैशांनी कमी होऊन ते 83.11 इतके खाली गेले. रुपयाच्या अवमूल्यनामुळे केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली आहे. सरकारचा आयातीचा खर्च वाढणार आहे.
चलन बाजारात डॉलरचे मूल्य मजबूत झाले आहे. यूएस डॉलर इंडेक्स 103 वर गेला आहे. डॉलरचे मूल्य रुपयासह सहा चलनांच्या किंमतींच्या तुलनेत मजबूत झाले. यूएस 10 वर्ष मुदतीचे बॉंड यिल्ड 4.18% इतके वाढले आहे. क्रूड ऑईलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम डॉलरवर झाला आहे. त्याशिवाय भारतीय शेअर मार्केटमधून परकीय गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतल्याने रुपया कमकुवत झाला.
फिच या पतमानांकन संस्थेने नुकताच अमेरिेकेचे पत मानांकन कमी केले होते. मात्र त्याचा परिणाम चलनावर दिसून आला आहे. दिर्घकालीन मुदतीच्या रोख्यांचे यिल्ड वाढले आहे.
डॉलरसमोर भारतीय रुपया कमकुवत होणे सरकारसाठी डोकेदुखी वाढवणारे ठरणारे आहे. अमेरिका आणि इतर देशांतून आयात होणाऱ्या वस्तूंसाठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत. यामुळे बॅलन्स ऑफ पेमेंटचा ताळमेळ बिघडण्याची शक्यता आहे.
आजच्या सत्रात रुपयाचे डॉलरसमोर 29 पैशांचे अवमूल्यन झाले. यापूर्वी शुक्रवारच्या सत्रात रुपया 16 पैशांने घसरला होता. सलग दोन सत्रात रुपयाचे मूल्य 45 पैशांनी कमी झाले असून आजच्या घसरणीने तो आजवरच्या सर्वात नीचांकी स्तरावर 83.11 वर स्थिरावला. इंट्रा डेमध्ये रुपयाने 82.94 ते 83.11 ची पातळी अनुभवली.
खासकरुन भारतात इंधनाच्या एकूण खपाच्या जवळपास 80% इंधनाची आयात केली जाते. सरकारने मागील मे 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव 86 डॉलर प्रति बॅरल आहे. त्यात आता रुपयाने 83 पातळी ओलांडल्याने तेल आयातीचा खर्च वाढणार आहे.