फेडरल रिझर्व्ह बँकेने केलेल्या व्याजदर वाढीच्या दणक्यातून शेअर मार्केट अद्याप सावरलेले नाही. व्याजदर वाढीच्या भीतीने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी आज सोमवारी 26 सप्टेंबर रोजी चौफेर विक्रीचा सपाटा सुरुच ठेवला. यामुळे सेन्सेक्समध्ये 950 अंकांची आणि निफ्टीत 300 अंकांची घसरण झाली. परदेशी गुंतणूकदारांनी (FII Pull Out Money From Emerging Market) गुंतवणूक काढून घेतल्याचा परिणाम भारतीय चलनावर झाला. आज डॉलरसमोर रुपयाने 81.55 चा नवा सार्वकालीन नीचांकी स्तर गाठला. रुपया 83 पर्यंत खाली घसरेल, अशी भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे.
यापूर्वी शुक्रवारी 23 सप्टेंबरच्या सत्रात रुपया डॉलरसमोर 81.22 या नीचांकी पातळीपर्यंत घसरला होता. रुपयाची पडझड रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने चलन बाजारात हस्तक्षेप केला होता. चलन बाजारातील करन्सी ट्रेडर्सच्या मते रिझर्व्ह बँकेने डॉलरची विक्री करत रुपयाला सावरले होते. रिझर्व्ह बँकेने रुपयासाठी लाखो डॉलर्स खर्ची केले. त्यामुळे रुपयाच्या अवमूल्यनाला लगाम लागला. बाजार बंद होताना तो 81.09 वर स्थिरावला होता. रुपयात शुक्रवारी 30 पैशांचे अवमूल्यन झाले होते. रुपयासाठी खर्च झालेल्या डॉलरमुळे रिझर्व्ह बँकेची परकी गंगाजळी 5.22 बिलियन डॉलरने कमी झाली. रिझर्व्ह बँकेकडे 545.65 बिलियन डॉलरचे परकीय चलनसाठा आहे.
डॉलर-रुपयाचा विचार केला तर मागील सात महिन्यांत सलग तीन सत्रात मोठी घसरण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुरुवारच्या सत्रात 22 सप्टेंबर 2022 रोजी डॉलरेसमोर रुपया 80.79 वर बंद झाला होता. गुरुवारी रुपयात 83 पैशांचे अवमूल्यन झाले होते. जुलै 2022 पासून रुपयात 10% अवमूल्यन झाले आहे. 2008 नंतर रुपयासाठी चालू तिमाही सर्वात निराशाजनक ठरली आहे. फेडरल रिझर्व्हचे भविष्यात आणखी व्याजदर वाढवण्याचे संकेत, युरोपात मंदीची शक्यता यामुळे रुपयावरील दबाव वाढला आहे.
आज सोमवारी करन्सी मार्केट सुरु होताच रुपयाने नकारात्मक सुरुवात केली. डॉलरसमोर रुपयाने 81.55 चा नवा सार्वकालीन नीचांकी स्तर गाठला. शुक्रवारच्या तुलनेत त्यात 0.68% घसरण झाली. दुसऱ्या बाजूला डॉलरचे मात्र मूल्य मजबूत झाले. डॉलरची स्थिती दर्शवणारा डॉलर इंडेक्स 114 वर गेला. मागील 20 वर्षांतला डॉलर इंडेक्सचा हा सर्वाधिक स्तर आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदर 0.75% ने वाढवला होता. त्यानंतर डॉलरचे मूल्य इतर चलनांच्या तुलनेत वधारले आहे. त्याचबरोबर 2 वर्ष मुदतीचा यूएस ट्रेझरीवरील परतावा (2 Year US Treasury yield) 4.2% गेला आहे.
दरम्यान, रुपयाच्या अवमूल्यनाबाबत अर्थमंत्री निर्मला सितारामन म्हणाल्या की इतर चलनांच्या तुलनेत रुपयाची कामगिरी डॉलरसमोर तितकी वाईट नाही. डॉलरचे मूल्य वधारत आहे. त्यामुळे रुपयालाही फटका बसला. जर कोणत्या चलनाला या अस्थिरतेची फारशी झळ बसली नसेल तर तो रुपया आहे, असे सांगत सितारामन यांनी रुपया मजबूत असल्याचे स्पष्ट केले. अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक चलन बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याचे सितारामन यांनी सांगितले.
रुपया 83 पर्यंत खाली घसणार
फेडरल रिझर्व्हच्या पतधोरणानंतर डॉलर मजबूत होण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे.अशीच परिस्थिती कायम राहिली तर रुपयात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करत रुपयाला सावरले होते. काहींच्या मते नजीकच्या काळात रुपया 83 च्या पातळीपर्यंत खाली जाऊ शकतो. महिनाअखेर सुरु होणाऱ्या पतधोरण बैठकीत रिझर्व्ह बँकेला रुपयाबाबत ठोस उपाययोजना कराव्या लागतील.
तिजोरीवर भार, तूट वाढणार
रुपयाच्या मूल्य घसरणीने देशाची वित्तीय तूट वाढण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या महागाईने आयात बिलात मोठी वाढ झाली आहे. त्यात आता रुपयाचे मूल्य कमकुवत झाल्याने आयातीचा खर्च आणखी वाढणार आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2022-23 साठी वित्तीय तूट ही'जीडीपी'च्या तुलनेत 6.4% पर्यंत नियंत्रित ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आयात होणाऱ्या प्रत्येक वस्तूला आयातदार कंपन्यांना जादा पैसे मोजावे लागतील. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जसे की एलईडी टीव्ही, टीव्ही पॅनेल, कॉम्प्युटर चिप्स, वाहनांचा सुटे भाग, एसी, फ्रिज अशा वस्तूंची आयातीसाठी कंपन्यांना जादा खर्च करावा लागेल. यामुळे कंपन्याकडून भाववाढ केली जाईल.