फेडरल रिझर्व्हची व्याजदर वाढ, शेअर मार्केटमधील मोठी घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतल्याने आज चलन बाजारात रुपयाचे प्रचंड अवमूल्यन झाले. आज शुक्रवारी 23 सप्टेंबर 2022 रोजी डॉलरसमोर रुपया 83 पैशांनी घसरला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच रुपयाने 81 ची पातळी ओलांडली. रुपयाचे मूल्य डॉलरसमोर 81.23 या सार्वकालीन नीचांकी पातळीपर्यंत घसरले. रुपयाच्या या मूल्य घसरणीने भारतीयांसमोर नव संकट उभं राहिलं आहे. देशात आयात वस्तूंसाठी आता जादा खर्च करावा लागणार असून ऐन दिवाळीत महागाईचा भडका उडणार आहे.  (Rupees hits all time low against dollar)
केवळ रुपयाच नाही तर आशियातील बहुतांश चलनांचे दर डॉलरसमोर कोसळले आहेत. याला मुख्य कारण फेडरल रिझर्व्हने केलेली व्याजदर वाढ आहे. फेडरल रिझर्व्हने बुधवारी व्याजदरात 0.75% वाढ करत तो 3% ते 3.25% केला. यामुळे डॉलरचे मूल्य वधारले. डॉलर इंडेक्स 20 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर गेला. बॉंड यिल्ड 4.1% वर गेले असून त्याचा दर दोन वर्षांतील उच्चांकावर आहे.
भारतीय रुपयाचा विचार केला तर मागील सात महिन्यांत एकाच दिवसात मोठी घसरण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आज डॉलरसमोर रुपयाचे 83 पैशांनी अवमूल्यन झाले. यापूर्वी 24 फेब्रुवारी 2022 रोजी रुपयामध्ये 99 पैशांचे अवमूल्यन झाले होते. काल गुरुवारच्या सत्रात 22 सप्टेंबर 2022 रोजी डॉलरेसमोर रुपया 80.79 वर बंद झाला होता. त्यात 83 पैशांची घसरण झाली होती.
ऐन दिवाळीत महागाईचा भडका
- रुपयाच्या घसरणीचा सर्वात मोठा परिणाम आयातीवर होणार आहे.
- भारतात आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढतील. देशात 80% ते 85% कच्चे तेल आयात केले जाते.
- कच्च्या तेलासाठी सरकारला जास्त किंमत मोजावी लागेल. यासाठी जादा परकीय चलन खर्च करावे लागणार आहे.
- कच्च्या तेलाची आयात महागली तर पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, सीएनजी, पीएनजी या इंधनांच्या दरात वाढ होण्याची शक्यता.
- मालवाहतूक महागली तर भाजीपाला, अन्नधान्यांच्या किंमतीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
- मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी युनियनने भाडेवाढीसाठी बेमुदत संपाची घोषणा केली आहे.
- दिवाळी तोंडावर असून वस्तूंच्या किंमती वाढल्या तर त्याचा मोठा परिणाम ग्राहकांवर खरेदीवर होऊ शकतो.
- परदेशी शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना आता जादा खर्चाचा भार सहन करावा लागणार आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            