Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Federal Reserve Rate Hike: फेडरल रिझर्व्हची दरवाढ; शेअर बाजार गडगडले

Federal Reserve Rate Hike

Federal Reserve Rate Hike: अमेरिकेतील महागाई नियंत्रणाबाहेर गेली आहे. तिला आटोक्यात आणण्यासाठी तेथील केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने पुन्हा एकदा प्रमुख व्याजदरात मोठी वाढ केली. फेडरल रिझर्व्हने आणखी व्याजदर वाढ करण्याचे संकेच दिले. त्याचे पडसाद जगभरातील शेअर मार्केटवर उमटले.

अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने बुधवारी प्रमुख व्याजदरात 0.75% वाढ केली. यानंतर फेडरल रिझर्व्हचा व्याजदर 3% ते 3.25% इतका झाला आहे. झपाट्याने वाढणाऱ्या महागाईला रोखण्यासाठी फेडरल रिझर्व्हने नजिकच्या काळात आणखी व्याजदर वाढीचे संकेत दिले. याचा अर्थ 2023 अखेर 'फेडरल'चा व्याजदर 4.60% पर्यंत वाढणार असल्याचे बोलले जात आहे. (Federal Reserve Hike rate by 75 basis points)

फेडरल रिझर्व्हच्या 12 सदस्यांनी एकमुखाने 0.75% व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी इतकी मोठी वाढ बँकेने वर्ष 2008 च्या सुरुवातीला केली होती. जोपर्यंत महागाई कमी होत नाही, तोवर 'फेडरल'कडून व्याजदर वाढीची मात्रा कायम ठेवण्यात येईल, असे फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत बँकेकडून व्याजदर वाढवले जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी महागाई नवं संकट बनली आहे. कोरोना संकटातून सावरणारी अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत सापडेल, अशी भीती व्यक्त होत आहे. फेडरल रिझर्व्हने 2023 या वर्षात अमेरिकेचा जीडीपी 1.2% इतका राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. 2023 मध्ये बेरोजगारी दर 4.4% इतका राहण्याची शक्यता आहे. दिर्घ कालावधील वृद्धी दराची गती कमी होईल, असे बँकेने म्हटलं आहे.1970 आणि 1980 च्या दशकात अमेरिकेत महागाईचा भडका उडाला होता. ही परिस्थिती टाळण्यासाठी बँकेला व्याजदर वाढ करावी लागेल, असे जरोम पॉवेल यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेला आणखी तीन वर्ष महागाईशी सामना करावा लागेल, असे पॉवेल यांनी म्हटले आहे. वर्ष 2025 अखेर महागाईचा दर 2% पर्यंत खाली येईल, असा अंदाज 'फेडरल'ने व्यक्त केला. 2022 च्या चौथ्या तिमाहीत महागाई 5.4% पर्यंत वाढेल, असे भाकीत बँकेने व्यक्त केले. वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीपासून महागाई दर कमी होण्यास सुरुवात होईल, असे बँकेने म्हटलं आहे.  

शेअर बाजार कोसळले (Stock Market Fall)

फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीनंतर धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातून पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला. अमेरिकेतील शेअर बाजारात बुधवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. डाउ जोन्स, नॅसडॅक, एसअॅंडपी 500 हे निर्देशांक घसरणीसह बंद झाले. आज गुरुवारी 22 सप्टेंबर रोजी आशियातील प्रमुख शेअर बाजारात घसरण झाली. शांघाई, टोकियो, हॉंगकॉंग, सिडनी येथील शेअर निर्देशांकात घसरण झाली. भारतात सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला तर निफ्टी 150 अंकांनी कोसळला.  

चलनांचे मूल्य घसरले, डॉलर वधारला (Rupees hits new low against Dollar)

फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीचे पडसाद चलन बाजारात देखील उमटले. आज करन्सी मार्केटमध्ये डॉलरचे मूल्य इतर चलनांच्या तुलनेत प्रचंड वाढले. डॉलरचे मूल्य 20 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले. भारताचा रुपया, दक्षिण कोरियाचा वोन, युरो, पाउंड यांच्या मूल्यामध्ये मोठी घसरण झाली. जून 2002 नंतर प्रथमच डॉलर इंडेक्स 111.72 वर गेला आहे. बुधवारी 21 सप्टेंबर रोजी रुपयात 22 पैशांचे अवमूल्यन झाले होते, तो 79.96 वर स्थिरावला होता. आज गुरुवारी 22 सप्टेंबर रोजी डॉलर समोर रुपयाने 80.62 चा नीचांकी स्तर गाठला. यामुळे भारतात आयात होणाऱ्या वस्तूंसाठी जादा पैसे मोजावे लागतील. भारतात महागाईचा दर 7% वर आहे. तो आणखी वाढू शकतो. 

सोनं झालं स्वस्त (Gold Price Fall)

इंटरनॅशनल कमॉडिटी बाजारात देखील फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीचा परिणाम दिसून आला. कमॉडिटी मार्केटमध्ये सोन्याचा भाव 0.2% ने घसरला आणि तो प्रती औंस 1,662.40 डॉलर इतका खाली आला. अमेरिकेत महागाईचा दर 40 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. रशिया-युक्रेन युद्धाची झळ, क्रूड आणि नॅचरल गॅस या महत्वाच्या कमॉडिटींचा युरोप-अमेरिकेला होणारा अपुरा पुरवठा, यामुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. महागाई नियंत्रणासाठी 'फेडरल'ने  आक्रमक भूमिका घेत व्याजदर वाढवण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे चलन बाजारात डॉलरचे मूल्य वधारत आहे. भारतीय बाजारात मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव 49,518 रुपये इतका होता. त्यात किंचित वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव 57,310 रुपये इतका आहे.

क्रिप्टो करन्सीचे मूल्य गडगडले (Crypto Currencies fall)

महागाईमुळे बेजार झालेला युरोप मंदीच्या उंबरठ्यावर आहे. अमेरिकेतही महागाईचा आगडोंब उसळला आहे. यामुळे फेडरलने व्याजदर वाढीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. मागील 20 वर्षांतील सर्वात मोठी व्याजदर वाढ फेडरल रिझर्व्हने बुधवारी केली. याचे परिणाम क्रिप्टो मार्केटवर दिसून आले. क्रिप्टोमधील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक ट्रेडिंग व्हॉल्यूम असणाऱ्या बिटकॉइनच्या किंमतीत घसरण झाली. न्यूयॉर्कमध्ये बुधवारी बिटकॉइनचा भाव 19000 डॉलरखाली घसरला. इथर, सोलाना, अलव्हान्चे या डिजिटल कॉइन्सच्या किंमतीत देखील घसरण झाली. 

Image source: Ting Shen/Bloomberg