डॉलरच्या तुलनेत रूपयाने विक्रमी स्तरावर नीचांकी पातळी गाठली आहे. अमेरिकेत महागाई 9 टक्क्यांच्या वर गेली आहे. याचा परिणाम रूपयावर होत असून डॉलरच्या तुलनेत रूपया लवकरच 80 रूपयांपर्यंत जाईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी (दि.15 जुलै) मार्केट बंद होताना एका डॉलरची किंमत 79.88 रूपये होती.
भारतीय रूपया डॉलरच्या तुलनेत सध्या 80 रूपयांच्या दारावर उभा आहे. शुक्रवारी सकाळी मार्केट ओपन झाले तेव्हा रूपयामध्ये 6 पैशांनी घसरण तो 79.94 वर ओपन झाला होता. त्यानंतर त्याने 79.95 पर्यंत नवीन निचांकी पातळी गाठली. पण त्यानंतर त्यात सुधारणा होत शेवटी 79.88 वर बंद झाला. गुरूवारी (दि. 14 जुलै) रूपया डॉलरच्या तुलनेत 25 पैशांनी घसरून 79.88 वर बंद झाला होता. जुलै महिन्यात एकूणच रूपयामध्ये 1.80 रूपयांची घसरण झाल्याचे दिसून येते. तर या वर्षात डॉलरच्या तुलनेत रूपयामध्ये आतापर्यंत 7 टक्क्यांची घसरण झाली आहे.
अमेरिकेत निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यास आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीला रेपो दरामध्ये वाढ करण्यावाचून दुसरा पर्याय राहिलेला नाही. कारण इतर देशातील सेंट्रल बॅंकासुद्धा महागाई नियंत्रणात आणण्यासाठी याच मार्गाचा अवलंब करत आहेत, असे अनंत नारायण (एस पी जैन इन्सिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्चचे प्रमुख) यांनी CNBC-TV18शी बोलताना म्हटले होते. त्यांच्या मते येत्या दोन महिन्यात महागाई 6 आणि 7 टक्क्यांच्यावर राहील. यावर उपाय म्हणून आरबीआय लवकरच रेपो दरात वाढ करेल, असा अंदाज तज्ज्ञांकडून मांडला जात आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने डॉलरची मागणी वाढली आहे. निर्यातदारांकडूनही सतत डॉलरची मागणी वाढ लागली आहे. त्यात अमेरिकेत मंदीचे वातावरण दिसू लागल्याने डॉलरच्या मागणीत आणखी वाढ होऊ लागली. परिणामी डॉलरच्या तुलनेत जगभरातील अनेक देशांच्या चलनामध्ये घट होत असल्याचे दिसून येत आहे. यात भारतीय रूपयाचाही समावेश असून, 2022 या वर्षात डॉलरच्या तुलनेत रूपयामध्ये एकूण 7 टक्क्यांची घसरण झाली आहे.
14 जुलै रोजी भारतीय मार्केटमध्ये विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 309.06 कोटी रूपयांची खरेदी केली. तर देशांतील संस्थागत गुंतवणूकदारांनी 556.40 कोटी रूपयांची विक्री केली. इक्विटी मार्केटवर नजर टाकली तर आपल्या दिसून येईल की, सतत 4 दिवस मार्केट खाली येते होते, तरीही मार्केट पुन्हा सावरण्याच्या स्थितीत येत असल्याचे दिसून येते. सेन्सेक्स आणि निफ्टी (Sensex & Nifty 50) मध्ये साधारण तेजी पाहायला मिळाली. पण बॅंक निफ्टीवर (Bank Nifty) प्रचंड दबाव असल्याचे दिसत होते. तर एफएमसीजी (FMCG), इन्फ्रा (Infra), रिअल्टी (Reality) कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली खरेदी झाल्याचे दिसून आले. FMCG इंडेक्समध्ये 1 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर दुसरीकडे आयटी (IT), बॅंक (Bank) आणि मेटल (Metal) कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायली मिळाली.
image source - https://bit.ly/3aKskoC