देशातील सर्वात मोठा उद्योग समूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजला 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत 19299 कोटींचा नफा कमावला. यात गतवर्षाच्या तुलनेत 19% वाढ झाली.चौथ्या तिमाहीत एकूण महसूल 2.16 लाख कोटी इतका वाढला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तिमाही निकालांकडे बाजाराचे लक्ष लागले होते. रिलायन्सचे अपेक्षेपेक्षा दमदार कामगिरी करत जाणकारांचे अंदाज फोल ठरवले. गेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजला 16203 कोटींचा नफा झाला होता. 31 डिसेंबर 2022 अखेर संपलेल्या तिमाहीत 15792 कोटींचा नफा झाला होता.रिलायन्स इंडस्ट्रीजला करपूर्व नफा 41389 कोटींचा मिळाला आहे.यात 22% वाढ झाली. डिजिटल सेवा आणि तेल आणि वायूमधील मार्जिन वाढल्याने कंपनीच्या एकूण आर्थिक कामगिरीत सुधारणा झाली.
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा एकूण महसूल 9.67 लाख कोटींपर्यंत वाढला आहे. त्यात 23% वाढ झाली.डिजिटल सेवांचा व्यवसाय 20% वाढला असून रिटेल बिझनेसमध्ये 30.4% वाढ दिसून आली आहे. जागतिक पातळीवर नैसर्गिक वायूंच्या किंमतीत तेजी दिसून आल्याने रिलायन्सचा चांगला फायदा झाला आहे. रिलायन्सच्या ऑईल अॅंड गॅस बिझनेस मार्जिनमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. रिलायन्सची प्रमुख गॅस फिल्ड केजी डी-6 मधील गॅस उत्पादनात 11% वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.
रिलायन्सचा एकूण भांडवली खर्च 1.42 लाख कोटी इतका झाला. 31 मार्च 2023 अखेर रिलायन्सवर 1.10 लाख कोटींचे निव्वळ कर्ज असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीवरील एकूण कर्ज 3.15 लाख कोटी असून रोकड 2.04 लाख कोटी इतकी आहे. आर्थिक निकालांच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी 21 एप्रिल रोजी शेअर मार्केटमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर किंचित वधारला. बीएसई बंद होताना रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 2348.90 रुपयांवर स्थिरावला. त्यात 3.20 रुपयांची किरकोळ वाढ झाली.
या कामगिरीवर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्सने अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीने भारत आणि जगातील ऊर्जेची परिभाषा बदलेल.या वर्षी कंपनी वित्तीय सेवा क्षेत्रात पदार्पण करेल. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस या नव्या कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळेल, असे अंबानी यांनी यावेळी सांगितले.
रिलायन्स रिटेलला 2415 कोटींचा नफा
रिलायन्स रिटेलला चौथ्या तिमाहीत 2415 कोटींचा नफा झाला आहे. यात 12.9% वाढ झाली. चौथ्या तिमाहीत रिलायन्स रिटेलचा एकूण महसूल 69267 कोटी इतका वाढला आहे. त्यात गतवर्षाच्या तुलनेत 19.4% वाढ झाली. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स ही रिटेल व्यवसायात झपाट्याने वाढणारी कंपनी आहे. ग्राहक केंद्रीत सेवा देण्यासाठी रिलायन्स समूहाने नवतंत्रज्ञान आणि नव्या व्यवसायात मोठी गुंतवणूक केली असल्याचे रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या कार्यकारी संचालक ईशा अंबानी यांनी सांगितले.
रिलायन्स जिओच्या नफ्यात 14.3% वाढ
भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओला चौथ्या तिमाहीत 29871 कोटींचा नफा झाला आहे. नफ्यात 14.3% वाढ झाली. कंपनीच्या ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये 16% वाढ झाली असून 12767 कोटी मिळाले आहेत. जिओला प्रती युजर 178.8 रुपयांचा सरासरी महसूल मिळाला आहे. मार्चच्या तिमाहीत जिओकडील एकूण ग्राहकांची संख्या 43 कोटी 93 लाख इतकी आहे. 5 जी सेवेना जिओकडील ग्राहक सेवेत इतर कंपन्यांच्या तुलनेत आघाडी घेतल्याचे दिसून आले.