देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज सोमवारी 28 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे. आजच्या सभेत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी कोणत्या घोषणा करणार याकडे गुंतवणूकदारांनाचे लक्ष लागले आहे. आजच्या सभेत अंबानी यांच्याकडून न्यू एनर्जी, जिओ 5G सेवेबाबत महत्वाच्या घोषणा केल्या जातील.
नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीजमधून विभक्त झालेल्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसने शेअर मार्केटमध्ये पदार्पण केले होते. जिओ फायनान्शिअलचा शेअरमध्ये लिस्टींगनंतर सातत्याने घसरण झाली आहे. आजच्या बैठकीत जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या विस्ताराबाबत अंबानी यांच्याकडून आराखडा जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
मागील काही वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजने वेगवेगळ्या क्षेत्रात विस्तार केला आहे. त्याची घोषणा वार्षिक सभेत करण्यात आली होती. यंदाही रिलायन्सकडून न्यू एनर्जीबाबत गुंतवणूक आणि इतर महत्वाच्या घोषणा केल्या जाऊ शकतात.
नुकताच रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडमध्ये कतार इन्व्हेस्टमेंटकडून 8278 कोटींची गुंतवणूक केली होती. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स आणि फ्युचर ग्रुपसोबतचा व्यवहार पूर्ण झाला आहे. रिलायन्सने बिग बझारचे मॉल्स ताब्यात घेतले आहेत. त्याशिवाय जिओ रिटेल देखील किरकोळ व्यापाऱ्यांना जोडत आहे. किराणा व्यापारात रिलायन्स इंडस्ट्रीजने लक्ष केंद्रीत केले आहे.
आजच्या बैठकीत रिलायन्स जिओ टेलिकॉम आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स यांच्या आयपीओबाबत अंबानी घोषणा करतील का? याबाबत गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मागील सभेत अंबानी यांनी तशा प्रकारचे सुतोवाच केले होते. त्यामुळे रिलायन्स जिओ टेलिकॉम आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या व्हॅल्यूएशनकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
डिसेंबर 2023 पर्यंत देशभरात जिओची 5G सेवा सुरु करण्याचा निर्धार मागील वार्षिक सभेत व्यक्त करण्यात आला होता. वर्षभरात तशाप्रकारे प्रयत्न करण्यात आले आहेत. या मिशनचे अपडेट अंबानी यांच्याकडून दिली जाईल. त्याचबरोबर जिओ भारत 4G फोन प्रमाणे जिओ 5G फोन लॉंच करण्याबाबत मोठी घोषणा आजच्या सभेत अपेक्षित असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
जिओ लॅपटॉपला लॉंच केल्याने हार्डवेअर मार्केटमध्ये रिलायन्सने आपली दावेदारी सादर केली आहे. आता त्यालाच जोडून जिओ एअरफायबर ही वायरलेस ब्रॉडबॅंड सेवा कोणत्या महिन्यात सुरु करणार याची घोषणा अंबानी यांच्याकडून होऊ शकते.
न्यू एनर्जी इंधनासाठी कटिबद्ध
रिलायन्स इंडस्ट्रीजने पारंपारिक क्रूड उत्पादनाबरोबरच न्यू एनर्जीमध्येही परावर्तीत केले आहे. कंपनीने तीन वर्षांसाठी नव्या इंधनासाठी 10 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. वर्ष 2030 अखेर न्यू एनर्जीमधून रिलायन्स 10 ते 15 बिलियन डॉलर्सचा महसूल मिळवेल, असा अंदाज बर्नस्टेन या ब्रोकिंग कंपनीने व्यक्त केला आहे.
RIL AGM कुठे पाहता येईल?
रिलायन्स इंडस्ट्रीजची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडणार आहे. दुपारी 2 वाजता ही सभा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम या सोशलमिडिया हॅंडल्सवर प्रक्षेपित केली जाणार आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            