रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक पदावरुन मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी पायउतार झाल्या आहेत. नीता अंबानी यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला. याबाबत आज सोमवारी 28 ऑगस्ट 2023 रोजी पार पडलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषणा करण्यात आली. याच वेळी इशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांची संचालक म्हणून शिफारस करण्यात आली आहे.
आज रिलायन्स वार्षिक सर्वसाधारण सभा आभासीपद्धतीने पार पडली. यावेळी अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. यात नीता अंबानी यांनी रिलायन्सच्या संचालक मंडळातून पायउतार होणे ही महत्वाची घोषणा ठरली.
नीता अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला. हा राजीनामा संचालक मंडळाने मंजूर केला. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक पदावरुन पायउतार झाल्या असल्या तरी नीता अंबानी या रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष म्हणून कायम राहतील, असे कंपनीने म्हटले आहे.
रिलायन्सच्या संचालक मंडळाने इशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांची नवे संचालक म्हणून शिफारस केली आहे. आकाश अंबानी हे रिलायन्स जिओचे अध्यक्ष आहेत. इशा अंबानी यांच्याकडे रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची जबाबदारी आहे.
आजच्या सभेत रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रिलायन्स समूहाच्या मागील वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेतला. मागील 10 वर्षात रिलायन्स समूहाने 150 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली. आर्थिक वर्ष 2023 मध्ये रिलायन्सने 2.6 लाख रोजगार संधी उपलब्ध केल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले.
रिलायन्सला आर्थिक वर्ष 2023 मध्ये एकूण 9 लाख 74 हजार 864 कोटींचा महसूल मिळाला. कंपनीला 1 लाख 53 हजार 920 कोटींचा करपूर्व नफा मिळाला तर निव्वळ नफा 73 हजार 670 कोटी इतका होता.
अंबानी यांनी जिओ 5G सेवेबाबत समभागधारकांना महत्वाचे अपडेट्स दिले. भारतातील 5G सेलमध्ये 85% हिस्सा जिओ नेटवर्कचा आहे. डिसेंबरअखेर 10 लाख 5G सेल्स कार्यरत होतील, असा विश्वास अंबानी यांनी व्यक्त केला. जिओने सर्वात वेगवान 5Gचा विस्तार केला असल्याचा दावा अंबानी यांनी केला.
जिओ फायनान्स लवकरच विमा व्यवसायात उतरेल, अशी घोषणा अंबानी यांनी केली. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे रिलायन्स ग्रुपमध्ये समावेश करताना आनंद होत असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रत्येक शेअरवर जिओ फायनान्शिअलचा शेअर वितरित करण्यात आला आहे. दीर्घकाळ सोबत राहिलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा मिनी बोनस असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले. भारतीयांना टेक्नॉलॉजीवर आधारित सुलभ वित्तीय सेवा देण्याबाबत रिलायन्स इंडस्ट्रीज कटिबद्ध असल्याचे अंबानी यांनी सांगितले.
गणेश चतुर्थीला जिओ एअरफायबरचा शुभारंभ
येत्या गणेश चतुर्थीला जिओ एअरफायबर सेवा सुरु करण्याची घोषणा अंबानी यांनी केली. ते म्हणाले की कोव्हीडचे संकट असताना देखील जिओ फायबरची 1 कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचली. या ग्राहकांनी जिओ फायबरमधून दर महिन्याला 280 जीबी डेटा वापरला. रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी जिओ स्मार्ट होम या सेवेची घोषणा केली. जिओ स्मार्ट होममुळे ग्राहकांचा डेटा सेवेचा अनुभव आणखी वृद्धिंगत होईल, असा विश्वास आकाश अंबानी यांनी व्यक्त केला.