Farming Idea: सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे राहणारे कैलास माळी यांच्याकडे वडिलोपार्जित केवळ दोन एकर शेती आहे. त्यांनी आधीपासून प्रामुख्याने केवळ ऊसाची शेती केली. ऊस पिकाचे पैसे हाती यायला 19 महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे हाताशी पैसा खेळता राहावा, यासाठी ते ऊस बरोबर भाजीपाल्याचे पिक घेत असे. मात्र यामधून त्यांना फारसा नफा मिळत नसे.
Table of contents [Show]
रेशीम अधिकाऱ्यांनी दिली माहिती
शेती मधून अधिक नफा मिळवण्यासाठी कैलास यांना पूरक व्यवसायाची जोड देणे गरजेचे वाटले. याच शोधात असतांना 2016 मध्ये सांगली येथील रेशीम कार्यालयातील अधिकारी रेशीम शेतीचा प्रसार करण्यासाठी वाळवा ग्रामपंचायतीत आले होते. त्यावेळी त्यांनी रेशीमकोष निर्मितीतील गटशेतीसाठी गावकऱ्यांना प्रोत्साहित केले. कैलास यांना हा व्यवसाय खूप आवडला.
संपूर्ण अभ्यास केला
रेशीम शेती सुरु करण्याआधी कैलास यांनी अनुभवी शेतकरी आणि अधिकाऱ्यांकडून ज्ञान घेतले. रेशीमची यशस्वीपणे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संगोपन शेडला भेट देऊन बारकावे समजून घेतले. त्यानंतर त्यांना मनरेगा अंतर्गत 1 लाख रुपयांचे अनुदानही मिळाले.
रेशीम शेतीचे व्यवस्थापन
कैलास यांनी 45 बाय 25 फूट असे शेड रेशीम अळी संगोपनासाठी उभारले. त्यात 25 बाय 4 फूट आकारमानाच्या तीन रॅक्स होत्या. 14 महिन्यांमध्ये याच्या 5 बॅचेस घेतल्या जातात. प्रति बॅच 150 अंडीपुजांची असते. सांगली येथील रेशीम कार्यालयाकडून त्यांचा पुरवठा होतो. प्रति शंभर अंडीपुजांचा दर एक हजार 300 रुपये आहे. यासाठी अनुदानही दिले जाते. कैलास यांनी व्ही वन तुती वाणाची लागवड पंचवीस गुंठ्यात केली. छाटनीनंतर तुती 20 पानांवर आल्यानंतर बॅचची तयारी सुरु होते. प्रत्येक बॅच आटोपल्यानंतर एक ते पावणेदोन महिन्यांची विश्रांती देण्यात येते. शेडचे दोन वेळा निर्जंतुकीकरण होते. रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी चुना आणि विजेता पावडरची धुरळणी करण्यात येते. दोन वर्षातून शेणखत दिले जाते.
उत्पादन आणि बाजारपेठ
एका 150 अंडीपुंजांच्या बॅचमधून सरासरी 130 ते 140 किलो कोषांचे उत्पादन मिळते. पैकी 80 ते 90 टक्के उत्पादन 'ए ग्रेड'चे असते. कैलास हे कऱ्हाड तालुक्यातील वाठार येथे असलेल्या रेशीम धागा निर्मितीच्या युनिटला कोषांचा पुरवठा करतात. त्याला प्रति किलो 550 ते 600 रुपये दर मिळत आहे. प्रति बॅचला सुमारे 15 हजार खर्च येतो. कैलास यांना चौदा वर्षात दोन लाखांहून अधिक नफा मिळतो.