Repair a water-dropped phone at home: आपल्या सोबत नेहमी कोण असतं?असा प्रश्न विचारला तर मोबाईल हे एकमताने नक्कीच उत्तर येईल. आपण प्रत्येक ठिकाणी आपला स्मार्टफोन सोबत घेऊन फिरतो. अगदी काही मिनिटांसाठी का होईना आपला स्मार्टफोन जर आपल्या नजरे आड झाला तर, आपला जीव कासावीस होतो. पण हाच स्मार्टफोन कधीतरी आपल्या चुकीने पाण्यात पडला तर मग आपण गुंतवलेले पैसे पाण्यातच जातात आणि आपल्याला नवीन स्मार्टफोन घेण्याशिवाय किंवा आपला हा स्मार्टफोन दुरुस्त करायला देण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्याचा अवलंब करून तुम्ही एकही रुपया खर्च न करता तुमचा स्मार्टफोन (Smartphone) पाण्यात पडल्यावर घरच्या घरी दुरुस्त करू शकता.
जर फोन पाण्यात पडला असेल तर काय करावं?
- फोन ताबडतोब पाण्यातून बाहेर काढा आणि बंदच ठेवा
- फोनमध्ये काढता येण्याजोगी बॅटरी असल्यास ती बाहेर काढा. सिम कार्ड(SIM card) आणि मायक्रोएसडी कार्ड(Micro SD card) देखील बाहेर काढून ठेवा
- फोन कोरड्या कापडाने हलकासा पुसून घ्या, फोनला घासू नका तसे केल्यास पाणी फोनच्या अंतर्गत भागांमध्ये देखील जाऊ शकते
- फोनमधील पाणी सुकवण्यासाठी तुम्ही ड्रायरचा वापरही करू शकता मात्र गरम हवे ऐवजी थंड हवा वापरा
- यासाठी सिलिका जेल(Silica gel) देखील तुम्हाला मदत करू शकते. सिलिका जेलने एक पिशवी भरा आणि त्या पिशवीमध्ये 24 ते 48 तास फोन ठेवा
- फोन पूर्णपणे कोरडा झाल्यानंतर तो चालू करा जर तो लगेच चालू न झाल्यास त्याला पूर्णपणे चार्ज करा आणि नंतर तो चालू करण्याचा प्रयत्न करा
- एका पिशवीत तांदूळ घेऊन त्यामध्ये फोन 24 ते 48 तास ठेवा
- एवढं करूनही फोन ठीक नाही झाला तर तुम्हाला फोन सर्व्हिस सेंटरमध्ये(service center) घेऊन जावा लागेल