रिलायन्स इंडस्ट्रीजची टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओला पहिल्या तिमाहीत 4863 कोटींचा नफा झाला आहे. वार्षिक आधारावर यंदा नफ्यात 12.17% वाढ झाली. आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत नफ्यात 3.11% वाढ झाली.
देशातील सर्वाधिक दूरसंचार ग्राहक असलेल्या रिलायन्स जिओला एप्रिल ते जून या तिमाहीत 24042 कोटींचा महसूल मिळाला. त्यात 9.91% वाढ झाली. मार्चच्या तिमाहीच्या तुलनेत महसुलात 2.76% वाढ झाली.
कंपनीने पहिल्या तिमाहीत 17594 कोटींचा खर्च केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तिमाहीतील खर्चात वाढ झाली. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने 16136 कोटी खर्च केले होते.नेटवर्क ऑपरेटिंगसाठी कंपनीने 7379 कोटी खर्च करण्यात आले. पहिल्या तिमाहीत कंपनीने लायसन्ससाठी 2204 कोटी खर्च केले.
एप्रिल महिन्यात रिलायन्स जिओच्या एकूण ग्राहक संख्येत 30 लाखांची वाढ झाली. दूरसंचार नियामक ट्रायच्या आकडेवारीनुसार जिओचे देशभरात 44 कोटी ग्राहक आहेत. त्याखालोखाल भारती एअरटेलचे 37 कोटी ग्राहक आहेत.
रिलायन्स जिओने नुकताच'Jio Bharat V2' हा 4G फोन बाजारात दाखल केला. हा फोन भारतभरात केवळ 999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. रिलायन्स जिओने या मोबाईल फोनला ‘जिओ भारत’ असे नाव दिले आहे. हा मोबाईल ग्राहकांना इंटरनेट सुविधा देणार आहे. युजर्सला 4G इंटरनेट सुविधेचा वापर या मोबाईलद्वारे करता येणार आहे.