तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी (Systematic Investment Plan-SIP)द्वारे गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात का? त्यापूर्वी ही गुंतवणूक रेग्युलर की डायरेक्ट (Regular Plan or Direct Plan) यापैकी कोणता पर्याय निवडणे योग्य आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. कारण म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही दोनप्रकारे केली जाते. त्यातील रेग्युलर प्लॅन हा म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटरद्वारे राबवला जातो. यामध्ये बॅंका, वेल्थ मॅनेजर्स, वैयक्तिक आणि कॉर्पोरेट डिस्ट्रिब्युटर्स सहभागी असतात. यांना म्युच्युअल फंडच्या योजनांची विक्री केल्यानंतर त्यावर कमिशन मिळते. हे कमिशन म्युच्युअल फंड हाऊसकडून दिले जाते. यासाठी ते गुंतवणूकदारांकडून काही रक्कम घेतात.
डिस्ट्रिब्युटर्सना कमिशन मिळते
म्युच्युअल फंड कंपनी किंवा त्या फंड हाऊस व्यतिरिक्त इतर जे कोणी म्युच्युअल फंडची विक्री करतात, त्यांना डिस्ट्रिब्युटर्स म्हणतात. या डिस्ट्रिब्युटर्सना म्युच्युअल फंड हाऊसकडून कमिशन दिले जाते. हे कमिशन म्युच्युअल फंड हाऊस गुंतवणूकदाराकडून घेत असते. गुंतवणूकदाराकडून घेत असलेल्या शुल्कामध्ये डिस्ट्रिब्युटर्सचे कमीशन, फंड मॅनेजरचा फंड मॅनेजमेंट चार्ज, मार्केटिंग कॉस्ट आदी गोष्टींचा समावेश असतो. गुंतवणूकदाराला गुंतवणूक करण्यासाठी डिस्ट्रिब्युटर्स अनेकप्रकारे मदत करत असतात. याचप्रमाणे सेबी नोंदणीकृत सल्लागारही आर्थिक गुंतवणूक करण्याबाबत मार्गदर्शन करत असतात. पण ते गुंतवणूकदाराला हव्या असलेल्या गुंतवणुकीचे विविध पर्याय आणि त्याची फायदे-तोटे सांगतात. त्यासाठी त्यांना कोणाकडून कमिशन मिळत नाही. सेबी नोंदणीकृत सल्लागार हे अधिकृतपणे गुंतवणूकदारांकडून फी आकारतात.
तुमच्यासाठी योग्य काय आहे?
तुम्ही जर एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल, तर तुमच्यासाठी रेग्युलर प्लॅन की डायरेक्ट यापैकी कोणता प्लॅन योग्य आहे. या प्रश्नाचे थेट उत्तर देणे अवघड आहे. यासाठी आपण त्यातून मिळणारे फायदे जाणून घेणार आहोत. जसे की रेग्युलर प्लॅनमध्ये गुंतवणूक करणे महाग पडू शकते. पण याचा फायदा असा आहे की, डिस्ट्रिब्युटर्स गुंतवणूकदाराला गुंतवणूक करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करतो. त्यामुळे गुंतवणूकदाराला गुंतवणूक करताना काही मदत हवी असेल तर त्याच्यासाठी रेग्युलर प्लॅन योग्य आहे. बऱ्याचवेळा गुंतवणूकदारांना सर्व गोष्टी स्वत: पाहायच्या नसतात. अशावेळी ते डिस्ट्रिब्युटरला ती जबाबदारी देऊन त्याच्याद्वारे गुंतवणूक करण्यावर भर देतात.
अधिकृत सल्लागारांची मदत घेता येते
गुंतवणूकदाराला गुंतवणूक करताना परिपूर्ण माहिती हवी असेल तर तो अधिकृत आर्थिक सल्लागारांची मदत घेऊ शकतो. हे सल्लागार गुंतवणूकदाराला गुंतवणुकीतील जोखीम, गुंतवणुकीचे उद्दीष्ट, उत्पन्नाचे स्त्रोत, टॅक्स अशी सर्व प्रकारची माहिती देतात. यासाठी गुंतवणूकदारांकडून शुल्क घेतात आणि त्यानुसार ते गुंतवणूकदाराला मार्गदर्शन करतात. अशावेळी गुंतवणूकदार डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.
जर तुम्हाला अधिकृत सल्लागार किंवा डिस्ट्रिब्युटरची मदत घ्यायची नाही आणि तुम्ही स्वत: गुंतवणूक करण्यासाठी सक्षम असाल तर डायरेक्ट प्लॅन निवडू शकता. रेग्युलर प्लॅनच्या तुलनेत डायरेक्ट प्लॅनमधून थोडेफार रिटर्न अधिक मिळतात. कारण त्याचा खर्च कमी असतो. डायरेक्ट प्लॅनमध्ये डिस्ट्रिब्युटर्सचे कमिशन नसते. अशाप्रकारे तुम्ही दोन्हीपैकी एकाची निवड करू शकता.