टोमॅटोच्या वाढत्या किंमतींनी ग्राहक बेजार झाले आहेत. उत्पादनातील घट आणि अपुरा पुरवठा यामुळे टोमॅटोचा भाव किलोमागे 190 रुपयांपर्यंत गेला होता. टोमॅटोच्या वाढत्या किंमतींनी महागाईचा भडका उडाला आहे. महिनाभरात टोमॅटोचा भाव 300% ने वाढला. अचानक टोमॅटोचे भाव वाढल्याने सरकारची कोंडी झाली. टोमॅटोच्या पुरवठ्यावर सध्या केंद्र सरकारचे लक्ष आहे.
मे महिन्यात सर्वसाधारणपणे 10 ते 15 रुपये प्रती किलो दराने टोमॅटोची विक्री सुरु होती. मात्र जून महिन्यात टोमॅटोची आवक घटली. उत्तरेत आलेली उष्णतेची लाट आणि मे-जूनमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने टोमॅटोचे पिक आडवे केले. ज्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात टोमॅटोच्या किंमतीचा भडका उडाला. गेल्या आठवड्यात टोमॅटोचा भाव प्रती किलोला 190 रुपयांवर गेला होता. चांगल्या प्रतीचा टोमॅटो 220 रुपयांना मिळत होता. सध्या देशभरात हा दर 110 ते 140 रुपयांच्या दरम्यान आहे.
महाराष्ट्रात जुन्नर भागात टोमॅटोची लागवड केली जाते. त्याशिवाय कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेशात टोमॅटोचे पिक घेतले जाते. या ठिकाणाहून देशभरात टोमॅटोचा पुरवठा होतो. त्यामुळे इथल्या वातावरणातील बदलांचे टोमॅटो पिकावर परिणाम होतात. यंदाच्या मार्च-एप्रिलमधील उष्णतेच्या लाटेने या क्षेत्रातील टोमॅटो पिकाला मोठी झळ बसली.
वर्षभरात सर्वसाधारणपणे शेतकरी दोनवेळा टोमॅटोचे उत्पादन घेतो. रबी हंगामतला टोमॅटो मार्च ते ऑगस्ट या काळात बाजारात येतो. मात्र यंदाचा रब्बी हंगाम टोमॅटो पिकासाठी नुकसानकारक ठरला. मार्च आणि एप्रिलमध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेचा टोमॅटो पिकाला फटका बसला. त्यात टोमॅटोवर रोग आल्याने उत्पादनात घसरण झाली.
रब्बी हंगामात टोमॅटो पिकातून नुकसान सहन करावा लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची पुन्हा लागवड केली नाही. त्यामुळे खरीपात टोमॅटोच्या पुरवठ्यात घट झाली आहे. अपुऱ्या पुरवठ्यामुळे देशभरात टोमॅटोचे भाव वधारले.
टोमॅटोच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. सरकारने नाफेड आणि एनसीसीएफ या सहकारी संस्थांकडून 80 रुपये दराने टोमॅटो खरेदी सुरु केली आहे. सरकारकडून हा माल किरकोळ आणि घाऊक बाजारात पाठवला जाणार आहे. त्यामुळे टोमॅटोच्या किंमतीत आणखी घसरण होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. मागील तीन दिवसांत दिल्लीत एनसीसीएफने 50 टन टोमॅटोची विक्री केल्याचे सरकारने म्हटले आहे.
आणखी महिनाभर महाग टोमॅटो खावे लागणार
टोमॅटोचे भाव आणखी महिना ते दीड महिना चढेच राहण्याची शक्यता आहे. मॉन्सून सुरु झाला की टोमॅटोची खरीपासाठी लागवड केली जाते. हे पिक बाजारात येण्यासाठी किमान दीड महिना वाट पहावी लागले. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात खरीपातील टोमॅटो बाजारात दाखल होती. बाजारात नव्या पिकाची आवक वाढल्यास टोमॅटोचे भाव कमी होती, असे बोलले जाते.