नवी दिल्ली IIT (IIT New Delhi) आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातले (JNU) 38 च्या वर प्राध्यापक मागची सात वर्षं त्यांच्या स्वप्नातल्या घरासाठी वाट पाहात होते. JNU च्याच एका माजी कर्मचाऱ्याकडे भरलेल्या पैशाची आणि वचन दिलेल्या घराची चौकशी करत होते. पण, मिळाली फक्त आश्वासनं. अखेर कंटाळून सात वर्षांनंतर या प्राध्यापकांनी मिळून पोलीस स्थानकात तक्रार केली. आणि त्यातून समोर आला दिल्लीतला एक मोठा रिअल इस्टेट घोटाळा (Real Estate Fraud).
दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी अर्थात, DDA अंतर्गत प्लॉट घेऊन त्यावर घर बांधून देतो असं या प्राध्यापकांना सांगण्यात आलं होतं. आणि त्यासाठी प्रत्येकाकडून लाखो रुपयेही घेण्यात आले. पण, प्रत्यक्षात त्यांना साधं जमिनीचं दर्शनही झालं नाही.
कसा झाला हा रिअल इस्टेट घोटाळा?
जवाहरलाल नेहरु विद्यापीठात पर्यावरणशास्त्र विभागात काम करणारे एक कर्मचारी डी पी गायकवाड स्वत: तेव्हा निवृत्तीच्या जवळ पोहोचले होते. 2015मध्ये त्यांनी बरोबरचे काही प्राध्यापक आणि त्यांच्या ओळखीतून IIT चे काही लोक यांना संपर्क साधला. या सगळ्यांनी मिळून नोबल सोशिओ-सायन्टिफिक वेलफेअर ऑर्गनायझेशन या नावाने एका संस्थेची नोंदणीही केली.
आणि या संस्थेचे शेअर गायकवाड यांनी आपल्या संपर्कात आलेल्या या लोकांमध्ये वाटले. वाटले म्हणजे, विकत दिले. हे शेअरच्या बदल्यात प्रत्येकी दोन लाख ते सोळा लाख रुपये गायकवाड यांनी लोकांकडून जमा केले. असं तीन वर्षं चाललं. आपल्या प्रकल्पाचं काम चालू आहे, असं हा इसम सगळ्यांना सांगायचा.
‘आम्हाला खरं वाटावं म्हणून त्याने एकदा सगळ्यांना नेऊन प्लॉटही दाखवला होता. त्यावर सोसायटीची पाटी होती. पण, नंतर आम्हाला कळलं की, तो प्लॉट सोसायटीच्या मालकीचा नव्हताच,’ फसवले गेलेले एक प्राध्यापक गोवर्धन दास यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
2019 पर्यंत लोकांकडून पैसे जमा केल्यानंतर गायकवाड हा इसम आधी लोकांचे फोन घेईनासा झाला. मग त्याने सगळ्यांचा नंबर ब्लॉक केला. आणि शेवटी फोनच बदलला.
एकाच व्यक्तीकडून दुसऱ्यांदा फसवणूक
काही महिने असे गेल्यानंतर प्राध्यापक लोकांनी एकत्र येऊन काही व्यूहरचना आखली. आणि गायकवाडला शोधूनही काढलं. यावेळी दिल्लीजवळ गुरुग्राममध्ये तो राहत होता. फसवणूक झालेल्या लोकांनी त्याच्याकडे जाब विचारला. तर यावेळी गायकवाडने त्यांना दुसऱ्या एका सोसायटीचं आमीष दाखवलं. सिद्धार्थ ऑफिसर्स हाऊसिंग अँड सोशल वेलफेअर सोसायटी, असं या नव्या सोसायटीचं नाव होतं. या सोसायटीत घर देतो, असं तो म्हणायला लागला. आणि इथं घरांचे दर जास्त असल्यामुळे जास्तीचे पैसे द्यावे लागतील, असं त्याने या लोकांना सांगितलं.
‘सोसायटी असल्यामुळे सर्वसाधारण सभा तरी बोलव असं आम्ही त्याला सांगत होतो. काम कुठवर आलंय ते कळवण्यासाठी त्याला फोन करत होतो. पण, त्याने वाटाण्याच्या अक्षता लावल्या.’ IIT दिल्लीचे एक प्राध्यापक बिश्वजीत कुंडू यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
काही लोकांनी गायकवाडकडे खूपच आग्रह केला अशा काही थोडक्या लोकांना त्याने गुंतवणुकीची 50 ते 80% रक्कम परत केली. बाकीचे पैसे बुडाले. शेवटी सात वर्षं वाट पाहिल्यावर काही प्राध्यापकांनी एकत्र येऊन डी पी गायकवाड यांच्याविरोधात पोलीस तक्रार केली आहे. आणि पोलिसांनी आपला तपासही सुरू केला आहे. यात पोलिसांना या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असल्याचं दिसून आलं आहे. कारण, अशीच आणखी अनेक प्रकरणं निघाली. आणि यात केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातले एक संशोधक डॉ, बिंदू डे यांनाही गायकवाडने 8 लाखांना फसवलं आहे. दिल्लीच्या आणखी काही पोलीस ठाण्यांमध्ये गायकवाडविरोधात फिर्याद दाखल झाल्या आहेत. आणि त्यामुळे हा मोठा रिअल इस्टेट घोटाळा असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.