कोरोना काळात रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा फटका बसला होता. मात्र, त्यानंतर कमी झालेल्या किंमती व अनेक राज्य सरकारांकडून मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीनंतर रिअल इस्टेट क्षेत्रात भरभराट पाहायला मिळत आहे. घरांच्या वाढत्या किंमतीनंतर देखील मागील 2-3 वर्षात घरांच्या विक्रीने उच्चांक गाठला आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशातील प्रमुख 18 बिल्डर्सने तब्बल 1.17 लाख कोटी रुपये किंमतीच्या मालमत्तेची विक्री केली आहे. गेल्याकाही वर्षातील रिअल इस्टेट क्षेत्रात एका वर्षात झालेली ही सर्वाधिक विक्री आहे.
कोणत्या बिल्डरने केली सर्वाधिक मालमत्तेची विक्री?
रिपोर्टनुसार, 2023-24 मध्ये देशातील प्रमुख 18 बिल्डर्सने तब्बल 1.17 लाख कोटी रुपये किंमतीच्या मालमत्तेची विक्री केली. यामध्ये गोदरेज प्रॉपर्टीज आघाडीवर आहे. गोदरेज प्रॉपर्टीजने आर्थिक वर्षात जवळपास 22,567 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे बुकिंग केले. याशिवाय, 18 मधील बहुतांश कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2022-23 च्या तुलनेत अधिक किंमतीचे बुकिंग केले आहे.
शेअर बाजारात सुचीबद्ध असलेल्या या 18 कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 88 हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचे बुकिंग केले होते. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये यात 33 टक्क्यांनी वाढ होऊन आकडा 1,16,635 कोटी रुपयांवर पोहचला आहे. गोदरेज प्रोपर्टीज पाठोपाठ या यादीत प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट्स कंपनीचे नाव आहे. या कंपनीने आर्थिक वर्षात 21,040 कोटी रुपयांच्या मालमत्तेची बुकिंग केले.
या यादीत डीएलएफ, मॅक्रोटेक डेव्हलपर्स, सिग्नेचर ग्लोबल, शोभा लिमिटेड, ब्रिगेड इंटरप्राइजेस, पुर्वांकारा लिमिटेड, ओबेरॉय लिमिटेड, कोलते पाटील डेव्हलपर्स, महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड, कीस्टोन रिअल्टर्स (रुस्तमजी), सनटेक रियल्टी, आशियाना हाउसिंग, अरविंद स्मार्टस्पेस लिमिटेड, अजमेरा रियल्टी अँड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड सारख्या रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे.
तुम्ही रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायला हवी का?
अनेकदा बिल्डर्सकडून खरेदीदारांकडून घर बुकिंगसाठी मोठी रक्कम घेतली जाते. परंतु, वेळेवर घराचा ताबा दिला जात नाही. त्यामुळे घर खरेदी करताना नावलौकिक असलेल्या बिल्डर्सकडून घर खरेदी करण्याला सर्वसामान्यांकडून सर्वाधिक प्राधान्य दिले जाते.
कोरोना महामारीनंतर घरांच्या किंमतीत प्रचंड मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमधील मालमत्तेच्या किंमतीत मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. घरांच्या किंमती वाढत असल्या तरीही सर्वसामान्यांकडून गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिले जात आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ही सर्वसामान्यपणे सुरक्षित मानली जाते. तुम्ही देखील मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. मात्र, त्याचवेळी तुमचे उत्पन्न, खर्च व बँक लोन या गोष्टींचाही विचार करायला हवा.