एक फोन कॉल तुमचं संपूर्ण डीमॅट खातं (Demat account ) कसं रिकामं करू शकतो, याची अनेक उदाहरणे अलिकडे दिसून येत आहेत. सायबर ठग तुमच्या डीमॅट खात्याला लक्ष करून तुमच्या कष्टाचे पैसे ऑनलाइन पद्धतीनं लुबाडू शकतात. उच्चशिक्षित, आयटी तज्ज्ञदेखील याला बळी पडल्याची उदाहरणं आहेत. नियमांनुसार, तुम्ही डीमॅट खात्यातून तुमचे शेअर्स विकल्यानंतर पैसे त्याच्याशी संबंधित खात्यात जमा करायला हवेत. त्याचबरोबर डीमॅट खात्यात ठेवलेल्या पैशातून शेअर्स (Shares) खरेदी करणं अपेक्षित आहे. यात सायबर ठग अशा काही युक्त्या वापरतात, की त्यामुळे डीमॅट खातेधारकास डोक्याला हात लावण्याची वेळ येते.
Table of contents [Show]
केवळ एक क्लिक, आणि...
याविषयी मिनिस्टर फिनमार्टचे संस्थापक अरुण मंत्री म्हणतात, की तुमच्या डीमॅट खात्यावर सायबर ठगांचं लक्ष असतं. या ठगांनी अनेकांची लूट केलीय. घरावर दरोडा पडतो त्यावेळी दरोडेखोर समोरून हल्ला करतात. सायबर ठग मात्र तुमच्यावर मागून हल्ला करतात. अशाप्रकारे व्हर्चुअल किंवा ऑनलाइन पद्धतीनं दरोडा टाकल्यानंतर आपल्याला अशा ठगांचा शोध घेणं कठीण होऊन बसतं. केवळ एका क्लिकच्या सहाय्यानं डीमॅट खातं हॅक करता येवू शकतं. त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमधले सर्व शेअर्स काही सेकंदात विकून टाकावे. कारण डीमॅट खातेधारकाच्या छोट्या चुकीमुळे सर्व प्रकारची माहिती सहज उपलब्ध होण्याचा धोका असतो.
एनीकॉलरवरून माहितीची विचारपूस
एनीकॉलर (Anycaller) यासारख्या वेबबेस्ड कॉलिंग अॅपवरून तुम्हाला कॉल येतो. त्यावेळी हा कॉल ब्रोकरनं केलाय की काय, असं तुम्हाला वाटू शकतं. मात्र प्रत्यक्षात तो कॉल हॅकरनं केलेला असतो. ब्रोकरकडे तुमचा वैयक्तिक डेटा तसंच तुमच्या पोर्टफोलिओची सर्व माहिती असते. त्याचप्रमाणं हॅकरही चाल खेळू शकतो. तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी तो तुमची माहिती चलाखीनं मिळवतो. तुमचे पर्सनल डिटेल्स विचारून त्यात काही बदलायचं आहे का, असंही बिनदिक्कतपणे विचारतात. हे सर्व पूर्ण विश्वास संपादन झाल्यानंतरच विचारलं जातं. शेवटी ओटीपी मागितला जातो. एकदा का तुम्ही ओटीपी शेअर केला, की दुसऱ्या क्षणात तुमच्या खात्यातून पैसे गायब होतात.
...तोवर खूप उशीर झालेला असेल
तुम्ही ओटीपी शेअर केला नाहीत, तर तुम्ही सुटलात असं नाही. तो हॅकर तुम्हाला सहजासहजी सोडत नाही. कोणत्या ना कोणत्या मार्गानं तरी तो तुमची माहिती विचारेलच. केवायसीच्या उद्देशानं विचारत असल्याचंही तो म्हणेल. ब्रेनवॉश करता करता संपूर्ण माहिती विचारून तुम्हाला रिकामं करेल. मात्र तुम्हाला समजेपर्यंत खूपच उशीर झालेला असेल. हे सर्व हॅकरनं केल्याचं तुम्हाला वाटलं तरी तुम्ही ते सिद्ध करू शकणार नाहीत. त्यामुळे सावध राहणं हाच ऑनलाइन फसवणूक रोखण्याचा मार्ग आहे.
काही महत्त्वाच्या टिप्स
- तुमचे शेअर्स ब्रोकरच्या पूल खात्यात कधीही ठेवू नका. तुम्ही स्टॉक खरेदी करत असता त्यावेळी ते तुमच्या डीमॅट खात्यात असायला हवे.
- ओटीपी (OTP) कधीही आणि कोणाशीही शेअर करू नका. ओटीपी शेअर न केल्यानं फसवणूक होण्याची शक्यता खूपच कमी होते.
- गरज नसेल तर अनावश्यक असलेलं डीमॅट खातं वेळेत बंद करावं, त्याचा गैरवापर होण्याच्या आत...