Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI Monetary Policy: पुन्हा व्याजदर वाढणार? रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सुरु

RBI Monetary Policy

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठक आज 6 फेब्रुवारी 2023 पासून सुरु झाली. 8 फेब्रुवारी रोजी बॅंकेकडून पतधोरण जाहीर केले जाणार आहे.

मागील 10 महिन्यात महागाई नियंत्रणासाठी व्याजदर वाढीचा दणका देणाऱ्या रिझर्व्ह बँकेकडून या आठवड्याअखेर आर्थिक वर्षातील अखेरचे पतधोरण जाहीर केले जाणार आहे. बँकेच्या पतधोरण समितीची आजपासून मुंबईत बैठक सुरु झाली असून 8 फेब्रुवारी 2023 रोजी पतधोरण जाहीर केले जाणार आहे. महागाईचा विचार करता यावेळी देखील आरबीआय रेपो दर वाढवेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. (RBI may Increased one more time repo rate in upcoming policy)

नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये महागाईचा पारा कमी झाला आहे. मात्र मूळ महागाईचा दर अजूनही धोकादायक पातळीवर आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला व्याजदर वाढीचे सत्र थांबवण्यापूर्वी एकदा रेपो दरात वाढ करावी लागेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. बँकेने व्याजदर वाढवला तर कर्जे पुन्हा महाग होती. ज्याचा फटका कर्जदारांना बसेल.

सध्या रिझर्व्ह बँकेचा रेपो दर हा 6.25% इतका आहे. डिसेंबर 2022 मधील पतधोरणात आरबीआयने रेपो दरात 0.35% वाढ केली होती. त्याआधीच्या सलग तीन पतधोरणांमध्ये आरबीआयने 0.50% ने रेपो दर वाढवला होता. गेल्या 10 महिन्यात बँकेने रेपो दरात 2.25% वाढ केली आहे. त्यामुळे कर्जांचा ईएमआय देखील वाढला होता. गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सर्वच प्रकारच्या कर्जांचे व्याजदर वाढले होते.

दरम्यान, अर्थसंकल्पानंतर पतधोरण जाहीर होणार असल्याने त्याकडे गुंतवणूकदारांचे देखील लक्ष लागले आहे. बजेटमध्ये टॅक्सपेअर्ससाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली होती. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवतानाच नवीन कर प्रणाली अधिक आकर्षक केली होती. त्यामुळे आता पतधोरणात देखील सामान्यांना दिलासा मिळेल, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.

किती आहे महागाईचा दर (Inflation Rate)

सरकारच्या आकडेवारीनुसार डिसेंबर महिन्यात महागाई दर 5.7% इतका आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये तो 5.9% इतका होता. अन्नधान्य महागाईत घसरण झाल्याने ग्राहक मूल्यावर आधारिक महागाई दरात घट झाल्याचे दिसून आले होते. सलग दोन महिने महागाईचा पारा 6% खाली असल्याने सरकारला दिलासा मिळाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत महागाई दर सरासरी 6.1% इतका राहील, असा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने महागाई दर याच तिमाहीत 6.6% इतका राहील, असे भाकित केले होते. मूळ महागाई दर हा सलग सात महिने 6% वर होता.