वैयक्तिक कर्ज (Personal loan) किंवा क्रेडिट कार्ड कर्ज आता सहजासहजी घेता येणार नाही. कारण आरबीआयनं पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड लोनबाबत नवे नियम बनवले आहेत. या नव्या नियमांमुळे लोन घेणं अधिक अवघड होणार आहे. बँकांकडून ग्राहकांना आतापर्यंत सहजासहजी कर्ज मिळत होतं. म्हणजेच कर्ज मिळवण्याची प्रक्रिया खूप सोपी होती पण आता ही प्रक्रिया अधिक कठीण असणार आहे. कारण पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड लोन घेण्याची प्रक्रिया आणखी मजबूत झाली आहे. टीव्ही 9नं हे वृत्त दिलं आहे.
Table of contents [Show]
तपासणार ग्राहकांची आर्थिक पार्श्वभूमी
आरबीआयच्या नव्या नियमांनुसार, पर्सनल लोन घेण्यापूर्वी बँकांकडून ग्राहकांची पार्श्वभूमी तपासली जाणार आहे. त्यानंतरच ग्राहकांना कर्ज देण्याबाबत विचार केला जाणार आहे. आधी पर्सनल लोन देण्यापूर्वी बँक ग्राहकांचं बॅकग्राउंड चेक करत नव्हती. तसंच काही गहाण ठेवण्याचीदेखील गरज नव्हती. मात्र आता याच नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
का बनवले नवे नियम?
आरबीआयच्या नव्या नियमानुसार आता ग्राहकांना वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी गॅरंटी लागेल. सोप्या प्रक्रियेमुळे वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड कर्ज घेण्याचा कल झपाट्यानं वाढला आहे. यासोबतच अशा कर्ज थकविणाऱ्यांची संख्याही त्या तुलनेत झपाट्यानं वाढली आहे. या कर्जांमध्ये ग्राहकांकडून हमीपत्र घेतलं जात नसल्यानं बँकांना मोठं नुकसान सहन करावं लागत होतं.
आर्थिक स्थितीचा अंदाज
आता आरबीआयनं एक नियम केला आहे. यानुसार सर्वप्रथम ग्राहकांची आर्थिक स्थिती वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड कर्ज घेण्यासारखी आहे का, हे तपासलं जाईल. त्यामुळे थकबाकीदारांची सध्या जी झपाट्यानं वाढणारी संख्या आहे, ती कमी करता येईल.
आकडेवारी काय?
वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड कर्ज घेण्याचं प्रमाण वाढलं ते कोरोना महामारीनंतर... कारण हे कर्ज त्वरीत उपलब्ध होत होतं. या कर्जाची प्रक्रियादेखील खूपच सोपी होती. 2022मध्ये तर वैयक्तिक कर्ज घेणार्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. 7.8 कोटींवरून 9.9 कोटींपर्यंत हा आकडा गेला होता. इतकंच नाही तर क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घेणाऱ्यांची संख्याही 1.3 लाख कोटींवरून 1.7 लाख कोटी झाली.
विविध प्रक्रियेतून जावं लागणार
वर्ष 2022प्रमाणेच यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यातदेखील वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाली आहे. वाढत्या महागाईचा विचार केल्यास येणाऱ्या काळात थकबाकीदारांच्या संख्येत वाढ होईल, अशी शक्यता आरबीआयला वाटत आहे. सेंट्रल बँकेनं नवीन नियम बनवून पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड लोनचे नियम अधिक कठोर केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड कर्ज घेणं आता सोपं असणार नाही. अनेक प्रक्रियेतून ग्राहकांना जावं लागणार आहे.