Pre-Approved Personal Loan: प्री अप्रूव्हड वैयक्तिक कर्जाची ऑफर तुम्हाला बँक किंवा बिगर बँकिंग वित्त संस्थेकडून मिळते. असे कर्ज विना तारण असते. तसेच ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तसेच बँकेसोबतचे आधीचे व्यवहार चोख असतील तर अशी ऑफर मिळण्याची शक्यता जास्त असते.
फक्त पात्र खातेधारकांनाच अशी ऑफर मिळू शकते. तुम्ही बँकेशी संपर्क साधून प्री अप्रूव्हड लोन ऑफर आहे का ते तपासू शकता. कर्जाची ऑफर तुम्हाला आधीपासून मंजूर असल्याने तत्काळ कर्ज मिळते. अचानक उद्भवलेले खर्च भागवण्यासाठी तुम्ही हे कर्ज घेऊ शकता.
प्री अप्रूव्ह लोन मंजूर होण्यास किती कालावधी लागतो?
तुमची आर्थिक पत पाहून बँकेने कर्ज आधीच मंजूर केलेले असते. (Who gets pre-approved loan offer) त्यामुळे तुम्ही अर्ज केल्यास काही तासांत कर्ज मंजूर होऊ शकते. बजाज फेनसर्व्ह ही कंपनी चार तासात प्री अप्रूव्ह कर्ज देण्याचा दावा करते. इतर आघाडीच्या बँका आणि वित्त संस्था एक किंवा दोन तासात कर्ज देण्याचाही दावा करतात. सहसा एक दिवसाच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन तुम्हाला पैसे मिळू शकतात. 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त पर्सनल लोनही मिळू शकते.
प्री अप्रूव्हड लोन कोणाला दिले जाते?
बिल पेमेंटमध्ये दिरंगाई न करणारे ग्राहक. आधीचे सर्व बिल वेळेवर चुकती केली असल्यास बँक अशी ऑफर सहसा देते.
पुरेसे उत्पन्नाचे साधण असणाऱ्या ग्राहकांना ऑफर मिळू शकते.
खात्यात किमान रक्कम मर्यादेपेक्षा जास्त बॅलन्स ठेवणाऱ्या ग्राहकांना ऑफर मिळू शकते.
चांगला पतदर्जा आणि EMI भरण्यास कधीही दिरंगाई केला नसल्यास बँक ऑफर देते.
प्री अप्रूव्हड कर्ज मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? (Documents required to get loan)
जेव्हा तुम्हाला अशा कर्जाची ऑफर असते तेव्हा बँकेकडे तुमची KYC (Know Your Customer) कागदपत्रे आधीपासूनच असतात. तसेच आर्थिक व्यवहारांची माहितीही असते. त्यामुळे बँक कागदपत्रे मागण्याची शक्यता कमी असते. काही परिस्थितीत खालील कागदपत्रे बँक मागू शकते.
रद्द केलेला चेक.
मतदान, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट इ. केवायसीसाठी कागदपत्रे
मासिक उत्पन्न पाहण्यासाठी बँक स्टेटमेंट
प्री अप्रूव्हड लोनचे काय फायदे मिळू शकतात? (benefit of pre approved loan)
तत्काळ कर्ज मंजूर - इतर प्रकारचे कर्ज मिळवताना तुम्हाला वाट पाहावी लागू शकते. स्वत:हून कर्जासाठी अर्ज केला असल्यास हा कालावधी जास्त असेल. मात्र, जर कर्ज आधीपासून मंजूर असेल तर ही प्रक्रिया वर म्हटल्याप्रमाणे एका दिवसातही होते.
स्पर्धात्मक व्याजदर - बँकेचा तुमच्यावर विश्वास असल्याने तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज मिळते. इतर बँकांपेक्षा हे दर कमी असू शकतात. कमी व्याजदर असल्याने तुम्हाला इएमआय देखील कमी द्यावा लागेल.
कर्जफेड करण्यातील सुलभता- प्री अप्रूव्हड पर्सनल लोन फेडण्याचा कालावधी 24 महिने ते 60 महिन्यापर्यंत (5 वर्षापर्यंत) असू शकतो. सुलभ हप्त्यांमध्ये तुम्ही कर्जफेड करू शकता. जर जास्त कालावधीची निवड केली तर तुम्हाला व्याजही जास्त द्यावे लागेल. मात्र, अल्प कालावधी निवडला तर EMI जास्त येईल, मात्र, कमी व्याज भरावा लागेल. ही बाब ध्यानात घेऊन तुमच्या उत्पन्नानुसार कालावधी निवडावा.
प्री अप्रूव्हड लोनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया? (Process of applying pre approved loan)
जेव्हा तुम्हाला पर्सनल लोनची ऑफर येते तेव्हा ऑनलाइन अर्ज करू शकता.
सर्वप्रथम ऑफर खरी आहे का? सत्यता पडताळून पाहा. बनावट ऑफर सुद्धा येऊ शकतात. खात्री केल्यानंतर ज्या बँकेची ऑफर आहे त्या बँकेच्या संकेतस्थळावर जा.
प्री अप्रूव्हड लोन सेक्शनवर जाऊन तुमची माहिती समाविष्ट करा. OTP द्वारे तुमची ओळख पटवा.
तुमच्यासाठी असलेल्या ऑफरपैकी योग्य ऑफर निवडा.
कर्जाची रक्कम आणि कालावधी निवडा. इतर शुल्क आणि नियम वाचा.
अर्ज कन्फर्म करा.
प्री अप्रूव्हड लोन घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?
अर्ज करण्यात दिरंगाई करू नका. अशा ऑफर मर्यादित कालावधीसाठी असतात.
पार्ट पेमेंट किंवा फोरक्लोजरसाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल का याची चौकशी करा.
झिरो प्रोसेसिंग फी असणाऱ्या बँकेची ऑफर निवडा
विविध बँकांचे व्याजदर आणि शुल्क तपासूनच ऑफर निवडा.