PPF Loan Vs Personal Loan: प्रत्येकाच्या आयुष्यात आर्थिक चढ-उतार येत असतात. अशावेळी त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण आपल्या नातेवाईकांकडून किंवा मित्रमंडळींकडून उसने पैसे घेतो. पण प्रत्येकालाच असे ओळखीच्या लोकांकडून पैसे घ्यायला आवडत नाही. मग अशा व्यक्ती बँकेतून पर्सनल लोन (वैयक्तिक कर्ज) घेतात. पगारदार व्यक्तींना पर्सनल लोन (Personal Loan) लगेच मिळते. पण पर्सनल लोनचा व्याजदर अधिक असल्याने तुमच्यावर जास्तीच्या ईएमआयमुळे आर्थिक ताण येऊ शकतो. अशावेळी कमी व्याजदराचे इतर कोणते पर्याय उपलब्ध आहेत का? हे तपासणे गरजेचे आहे. तर आज आपण अशाच एका पर्यायाविषयी अधिक जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
बँकांच्या कर्जाचा व्याजदर अधिक
बँकांकडून ग्राहकांना सर्व प्रकारची कर्जे दिली जातात. जसे की, घरासाठी होमलोन, नवीन गाडी खरेदी करण्यासाठी कारलोन, तर शिक्षणासाठी एज्युकेशनल लोन आणि इतर आर्थिक गरजा किंवा अडचणी पूर्ण करण्यासाठी पर्सनल लोन देतात. पण या कर्जावर बँका व्याजसुद्धा चांगलेच घेतात. या कर्जांवर अनेकवेळा कर्जाच्या रकमेपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट रक्कम ग्राहकांना भरावी लागते. त्यात अनेक वर्षे ईएमआय भरावा लागतो.
पीपीएफमधील गुंतवणुकीवर 7.1 टक्के व्याज
अशावेळी तुम्ही जर पब्लिक प्रोव्हिडंट फंडमधून (Public Provident Fund-PPF) कर्ज घेतले तर तुम्हाला ते स्वस्तात मिळू शकते.सध्या पर्सनल लोनवर जो व्याजदर (Interest Rate) आकारला जातो. त्याच्या तुलनेत पीपीएफवर मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर तुलनेने कमी आहे. पीपीएफ खात्यावर सरकारकडून गुंतवणूकदारांना 7.1 टक्के व्याज दिले जाते आणि पीपीएफवर कर्ज काढले तर त्याच्या कर्जाचा व्याजदर आहे, 8.1 टक्के. हा व्याजदर वैयक्तिक कर्जाच्या (Personal Loan) तुलनेत खूपच कमी आहे. बँका पर्सनल लोनवर 10.50 टक्क्यांपासून 18 टक्क्यापर्यंत व्याज आकारतात.
कर्जाचा कालावधी 3 वर्षे
पीपीएफवर कर्ज घेताना त्याचे काही नियम आहेत. त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. जसे की, पीपीएफवर घेतलेले कर्ज हे 3 वर्षात म्हणजे 36 महिन्यात फेडावे लागते. यामध्ये सर्वप्रथम कर्जाची मूळ रक्कम फेडली जाते. मूळ रक्कम फेडल्यानंतर उर्वरित कालावधीनुसार व्याज आकारले जाते. 3 वर्षांच्या कालावधीत एखाद्या कर्जदाराने कर्जाची संपूर्ण रक्कम भरली नाही तर त्याच्याकडून अधिक दराने रक्कम वसूल केली जाते. पीपीएफच्या कर्जाची रक्कम कर्जदार एकाचवेळी फेडू शकतो. यासाठी कोणतेही जास्तीचे शुल्क भरावे लागत नाही.
कोणाला मिळू शकते पीपीएफवर कर्ज
- पीपीएफ खाते सुरू करून 1 वर्षे पूर्ण झालेल्या खातेधारकाला कर्जासाठी अर्ज करता येतो.
- पीपीएफ खाते सुरू करून 5 वर्षे पूर्ण झालेल्या खातेधारकाला कर्ज दिले जात नाही.
- 5 वर्षे पूर्ण झालेल्या खातेधारकाला त्यातून काही रक्कम काढता येते.
- पीपीएफ खात्यात जेवढी रक्कम उपलब्ध आहे. त्याच्या 25 टक्के रक्कम कर्जरुपात घेता येते.
- पीपीएफ खात्यातून फक्त एकदाच लोन घेता येते. पहिले कर्ज फेडले असले तरी दुसऱ्यांदा कर्ज दिले जात नाही.