रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात 35 बेसिस पॉइंटची वाढ केली आहे. यामुळे बँकांची कर्जही महागणार असून यामुळे कर्ज असणाऱ्या ग्राहकांच्या खिशावरील भार वाढणार आहे.
कर्जदार ग्राहकांच्या खिशावरचा भार वाढणार
RBI ने रेपो दरात 0.35 टक्के इतकी वाढ केली आहे. यामुळे रेपो दर 5.90 टक्क्यावरून 6.25 टक्के इतका झाला आहे. याचा परिणाम होम लोन, ऑटो लोन, पर्सनल लोन यावर होणार आहे. यामुळे आता जास्तीचा इएमयाय भरावा लागणार आहे. समजा, बँकांनीही 0.35 टक्के इतका व्याजदर वाढवला अशा स्थितीत एखाद्या व्यक्तीने 20 वर्षासाठी 10 लाखांचे गृह कर्ज घेतले असेल तर त्याला आता या कालावधीत 50 हजारापेक्षा अधिक रक्कम भरावी लागू शकते. यावरून इएमयाय साधारण किती वाढू शकतो याचा अंदाज येतो.
रेपो दराचा कर्ज महागण्यावर परिणाम कसा होतो? (Repo Rate)
आरबीआय बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दराला रेपो दर म्हणतात. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यास बँकांच्या कर्जाचा खर्च वाढतो. ते कर्ज बँका ग्राहकांना देतील आणि त्यामुळे गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग होतात. बँका देऊ करत असलेली नवीन किरकोळ कर्जे बाह्य बेंचमार्कशी जोडलेली असतात. बहुतांश प्रकरणात ते रेपो दराशी जोडलेले असते. यामुळेच रेपो दरात कोणताही बदल केला की गृहकर्जाच्या व्याजदरावर परिणाम होतो.
चलनविषयक धोरण समितीची बैठक 5 डिसेंबरपासून सुरू होती. व्याजदरांबाबत निर्णय घेण्यासाठी ही बैठक सुरू होती. यानंतर बुधवारी RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधी घोषणा केली. यावेळी महागाई अजूनही चिंतेचे कारण असल्याचे शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले.एमपीसीच्या 6 पैकी 5 सदस्यांनी दर वाढवण्याच्या बाजूने मतदान केले.
होम लोम, ऑटो लोन, पर्सनल लोन अशी वेगवेगळी कर्जे असणाऱ्या ग्राहकांच्या मासिक बजेटवर याचा परिणाम होणार आहे. इएमआय वाढल्याने मासिक बजेट सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.